Home » श्रीकृष्ण भक्तीत विलीन झालेल्या भक्त मीराबाई

श्रीकृष्ण भक्तीत विलीन झालेल्या भक्त मीराबाई

by Team Gajawaja
0 comment
Sant Mirabai
Share

भगवान श्रीकृष्णाचे भक्त जगभर आहेत.  पण संत मीराबाई (Sant Mirabai) या भगवान श्रीकृष्णाच्या सर्वात मोठ्या भक्त मानल्या जातात.  मीराबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य भगवान कृष्णासाठी समर्पित केले.  याच संत मीराबाईंचा जन्म नेमका कधी झाला याची नोंद नाही.  मात्र संत मीराबाईंचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाल्याची काही पौराणिक ग्रंथात नोंद असल्याची माहिती आहे.  त्यानुसार मीराबाईची जयंती साजरी होते.  यावर्षी 28 ऑक्टोबर 2023 रोजी मीराबाई जयंती साजरी होणार आहे. या दिवशी वैष्णव पंथीय, संत मीराबाईंनी लिहिलेली श्रीकृष्णावरील स्तुती आणि श्लोकांचे पठण करतात. वैष्णव भक्ती चळवळीतील सर्वोत्तम संतांच्या श्रेणीत मीराबाईंचा समावेश करण्यात येतो.  त्यामुळे 28 ऑक्टोबर रोजी या दिवशी मीराबाईंच्या भजनांचा मोठा कार्यक्रम करण्यात येतो.  मीराबाईंना संत-कवयित्री म्हणून मान देण्यात येतो.  त्यांचा जन्म 16व्या शतकात झाला.  राजपूत राजवंशात त्यांचा जन्म झाला.   त्यांनी आपले अवघे जीवन कधीही न पाहिलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या चरणाशी अर्पण केले.  श्रीकृष्ण भक्तीमध्ये मीराबाई (Sant Mirabai) एवढ्या तल्लीन झाल्या की, पुढे त्याच श्रीकृष्णामध्ये त्या विलीन झाल्याचे सांगण्यात येते.   

संत मीराबाईंचे (Sant Mirabai) आयुष्य आजही एका गुढ कथेसारखे आहे.  गीता प्रेस गोरखपूरच्या भक्त-चरितंक नावाच्या पुस्तकामध्ये मीराबाईंच्या जीवनासंबंधी अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला.  या पुस्तकातही मीराबाईंच्या जन्माबाबत ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही.  परंतु त्यांची जयंती पूर्वापार शरद पौर्णिमेला साजरी केली जाते.  ती आजही त्याच तिथीनुसार साजरी होते.  यावर्षी संत मीराबाई यांची जयंती 28 ऑक्टोबर रोजी येत आहे.  मीराबाईचा जन्म 1498 च्या सुमारास राजस्थानमधील मेरहताजवळील कुडकी गावात झाला.  त्या एक राजपूत राजकुमारी होत्या.  त्यांच्या  वडिलांचे नाव रतन सिंह होते. 

जोधपूरच्या रतन सिंह यांची एकुलती एक मुलगी मीराबाई, लहानपणापासूनच कृष्णाच्या भक्तीत तल्लीन होती.  काही पुस्तकात मीराबाई यांच्या आईंचे त्या लहान असतानाच निधन झाल्याचा उल्लेख आहे.  त्यामुळे  मीराबाईंचे पालनपोषण त्यांचे आजोबा राव दुदा जी यांनी केल्याचा उल्लेख आहे.  त्यासाठी त्यांच्या लहानपणी घडलेला एक किस्सा कारणीभूत ठरल्याचा उल्लेख आहे.  त्यांच्या लहानपणी शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबातील व्यक्तीच्या लग्नाची मिरवणूक त्यांनी पाहिली.  या शाही मिरवणुकीला पाहण्यासाठी सर्व महिलांनी गर्दी केली होती.  ही लग्नाची मिरवणूक पाहून मीराबाईंनी त्यांच्या पालकांना विचारले की, माझा वर कुठला आहे.  मी कोणाची वधू होणार.  तेव्हा मस्करी करत पालकांनी मंदिरात असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीकडे बोट दाखवले. या छोट्याश्या घटनेंनं मीराबाईंच्या (Sant Mirabai) मनावार मोठा परिणाम केला.  त्यांनी मनोमन भगवान श्रीकृष्णाला आपला पती मानले आणि कायम त्या भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीसोबत राहू लागल्या.   

मीराबाई लहान असतांना त्याची श्रीकृष्णाप्रती भक्ती सर्वांना काही काळापुरती राहिल असे वाटायचे.  विवाहयोग्य वयात त्यांच्या लग्नाची बोलणी सुरु झाली.  तेव्हा मीराबाईंनी आपला विवाह श्रीकृष्णाबरोबर आधीच झाल्याचे सांगितले. आपण श्रीकृष्णाव्यतिरिक्त कोणाशीही लग्न करणार नाही, असे सांगितले.  मात्र त्यांच्या पालकांनी त्यांचे लग्न राजकुमार भोजराज यांच्याबरोबर केले.  राजा भोजराज यांनाही त्यांनी आपण मनोमन श्रीकृष्णाला मनोमन पती मानले असल्याचे सांगितले.  राजा भोजराज यांचा लवकर मृत्यू झाला.  त्यांच्या मृत्यूनंतर राजघराण्यातून मीराबाई यांना श्रीकृष्ण भक्तीपासून रोखण्यात येऊ लागले. त्यांच्यामुळे राजघराण्याची बदनामी होत असल्याची चर्चा सुरु झाली.  तेव्हा मीराबाईंना (Sant Mirabai) मारण्याचे अनेक प्रयत्न झाल्याचेही सांगण्यात येते.  यातूनच मीराबाईच्या मृत्यूच्या अनेक कथा निर्माण झाल्या आहेत. एका प्रमुख मान्यतेनुसार, एके दिवशी मीराबाई नेहमीप्रमाणे श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर गात असतांना अचानक त्या श्रीकृष्णाच्या मुर्तीमध्ये विलीन झाल्या. भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीमध्ये मीराबाई दिसू लागल्याचे त्या मंदिरातील पुजा-यांनी सांगितले.   

============

हे देखील वाचा : भारतातील 51 शक्तीपीठांपैकी ‘हे’ एक मंदिर

===========

काही ठिकाणी मीराबाईंनी (Sant Mirabai) संत तुलसीदास यांना गुरू मानून श्रीकृष्णाची अनेक भजने लिहिली, असाही उल्लेख आहे.  मीराबाई आणि तुलसीदास यांच्यात पत्राद्वारे संवाद झाला असे काही इतिहासकारांचे मत आहे.  असे मानले जाते की, मीराबाईंनी तुलसीदासजींना पत्र लिहून श्रीकृष्ण चरणी लीन होण्यासाठी उपाय मागितला. तुलसी दास यांच्या सांगण्यावरून मीराने कृष्णाशी संबंधित भक्तिगीते लिहिली, असेही सांगण्यात येते.  यामध्ये “पायो जी मैने राम रमन धन पायो” या  सर्वात प्रसिद्ध भजनाचा समावेश आहे.  याच संत मीराबाईंची जयंती त्यांच्या भजने गाऊन साजरी होणार आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.