पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागामध्ये हिंगलाज माता मंदिर (Hinglaj Mata Temple) आहे. हिंगलाज मातेला दुर्गेचा अवतार समजले जाते. शक्तीची देवता म्हणूनही या हिंगलाज मातेची पूजा केली जाते. मात्र पाकिस्तानमधील या मंदिरानंतर असेच प्रख्यात मंदिर राजस्थानमधील जोधपूर येथे आहे. जोधपूर पासून 20 किलोमिटर अंतरावर असलेल्या सलावास गावात हे हिंगलाज माता मंदिर आहे. हे मंदिर 1000 वर्ष जुने असून या मंदिरावर 500 टन वजनाचा दगड आहे. दोन पर्वतांच्यामध्ये असणा-या या मंदिरावर हा दगड गेली हजारो वर्ष आहे. मातेनं हा दगड आपल्या बोटावर पेलला असल्याचे बोलले जाते. हिंगलाज माता मंदिर हे जागृत स्थान असल्याची माहिती आहे. त्यामुळेच या मंदिरात भाविकांची गर्दी असते. आता नवरात्रौत्सवानिमित्त येथे भक्तांची मोठी गर्दी आहे. हिंगलाज मातेचे भक्त नवरात्रौत्सवात मातेच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून मंदिर परिसरात येत आहेत. (Hinglaj Mata Temple)
राजस्थानमध्ये अनेक पवित्र धर्मस्थळे आहेत. त्यात जोधपूर शहरापासून जवळ असलेल्या सलावास गावातील हिंगलाज माता मंदिर भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. वास्तविक हिंगलाज मातेचे मुळ स्थान पाकिस्तानमधील बलुचिस्थान भागात आहे. याच हिंगलाज मातेचे दुसरे मंदिर जोधपूरमध्ये आहे. या मंदिरातील मातेच्या मूर्तीच्या वर लाखो टन वजनाचा खडक आहे. गेल्या हजारो वर्षापासून मंदिरावर असलेला हा लाखो टनाचा दगड बघण्यासाठीही भाविकांची गर्दी होते. हिंगलाज मातेचे मंदिर (Hinglaj Mata Temple) दोन पर्वतांमध्ये आहे. याच दोन पर्वतांमध्ये मोठा दगड असून तो बरोबर देवीच्या मुर्तीवर येऊन थांबला आहे. देवीनं हा दगड आपल्या बोटावर झेलला असल्याचे भक्त सांगतात. हा दगड नेमका कुठून आला, हे रहस्य आहे. कारण या भागात कुठेही दगडाला चिरा पडलेल्या दिसत नाहीत. पण हा दगड कुठून वेगळा झाला आहे, हे समजत नाही. हे रहस्य जाणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. जिथून दगड बाहेर आला आहे, तो गुहेसारखा आकार आहे. तिथे जाण्याचा काही तरुणांनी प्रयत्न केला आहे. मात्र हे जाणण्यासाठी त्या दगडावर गेलेले कोणीही परत येत नाही, असे स्थानिक सांगतात. असेच देवीचे रहस्य जाणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा मृतदेह काही वर्षापूर्वी मिळाला. तेव्हापासून हा शोध थांबवण्यात आला आहे. या दोन तरुणांच्या समाधी मंदिर वाटेवर बांधण्यात आल्या आहेत. आता मंदिरात जाणारे भाविक या समाधीची पूजा करतात.
समस्त जोधपूरची या हिंगलाज माता मंदिरावर (Hinglaj Mata Temple) श्रद्धा आहे. मंदिराच्या परिसरात असलेल्या सर्व गावांची ही देवता म्हणून ओळखली जाते. या मंदिरात पूजा करुनच मग कुठल्याही शुभ कामाची सुरुवात करता येते. या मंदिर परिसरात राजपुरोहित समाजाचे लोक मोठ्यासंख्येनं रहातात. राजपुरोहीत समाजाची देवता म्हणून हिंगलाज मातेचा उल्लेख करण्यात येतो. नवरात्रीच्या काळात हे राजपुरोहीत समाजाचे लोक देशाच्या कुठल्याही कोप-यात असले तरी देवीच्या सेवेसाठी हजर होतात. या देवीच्या मुर्तीबाबतही अनेक आख्यायिका आहेत. देवीची मुर्ती ही स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. शेकडो वर्षापूर्वी या भागातील वतनदार दुडो जीचे वंशज सेलो जी राजपुरोहित यांना हिंगलाज मातेने स्वप्नात येऊन दर्शन दिले. 1392 मध्ये, सेलो जी राजपुरोहित या हिंगलाज माता मंदिरासमोर येऊन स्थायिक झाले. त्यांच्यापाठोपाठ राजपुरोहित समाजाची आणखीही कुटुंबे या भागात वास्तव्यास आली. या राजपुरोहितांच्या निवासस्थानाला सलावास म्हणतात.
==============
हे देखील वाचा : ‘या’ मंदिरात रचले गेले महाकाली स्तोत्र
==============
या राजपुरोहित समाजांनी आपली देवता म्हणून हिंगलाच मातेची पुजा करण्यास सुरुवात केली. राजपुरोहित समाज येण्याआधीपासूनच हिंगलाज माता मंदिर अस्तित्वात असल्याची माहिती आहे. त्यामुळे मंदिर हजार वर्षांहून अधिक जुने असल्याचे सांगण्यात येते. शिवाय हिंगलाज मातेची मुर्तीही स्वयंभू आहे. ही माता कधीही तिच्या भक्तांना रिकाम्या हातानं पाठवत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिर जमिनीपासून सुमारे दीडशे फूट उंचीवर आहे. मंदिरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. याकाळात देवीची आठवेळा आरती होते. यावेळी देवीच्या समोर धान्य पेरुन पडदा लावण्यात येतो. अष्टमीला हवन केल्यावर हा पडदा दूर केला जातो. हा पडदा दूर केल्यावर मातेच्या मूर्तीसमोर पेरलेले धान्य कसे उगवले आहे, यावर शेतातील धान्य कसे असेल याची भविष्यवाणी केली जाते. यावेळी संपूर्ण जोधपूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. या हिंगलाज मातेवर स्थानिकांची नितांत श्रद्ध आहे. मातेच्या मंदिराच्यावर जाईल अशी कुठलीही वास्तु या भागात बांधत नाहीत. तसे झाले तर मातेचा कोप होतो, असे मानले जाते. येथे बांधलेली सर्व घरे आणि इमारती या डोंगराच्या उंचीपेक्षा खूपच कमी आहेत. यामुळे मातेची सर्वांवर कृपा असल्याचे सांगितले जाते.
सई बने