Home » आज होणार भारत-पाकचा महासंग्राम !

आज होणार भारत-पाकचा महासंग्राम !

by Team Gajawaja
0 comment
INDvsPAK
Share

एखाद्या स्पर्धेपेक्षा एखादा सामना जेव्हा महत्वपूर्ण होतो तेव्हा त्या सामन्याचे महत्व आपसूकच जाणून येते. विश्वचषक स्पर्धा, मग ती कुठलीही असो वनडे किंवा टी-ट्वेंटी त्या स्पर्धेत भारत – पाक सामन्याचे महत्व त्या स्पर्धेइतकेच किंबहुना स्पर्धेपेक्षादेखील जास्त असते. भारतात सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयममध्ये भारत पाकिस्तान यांच्यात घमासान रंगणार आहे. जगभरातून या सामन्यासाठी प्रेक्षक अहमदाबाद येथे दोन दिवसांपासूनच जमायला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. आतापर्यंत स्पर्धेत दोन्ही संघांनी आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला धूळ चारून अहमदाबादला दाखल झाला आहे. तर पाकिस्तान संघाने श्रीलंका आणि नेदरलँड्सला हरवत स्पर्धेत चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे अहमदाबाद येथे होणारा हा सामना चुरशीचा होईल यात शंका नाही.(INDvsPAK)

पहिल्या दोन सामन्यातील भारताची कामगिरी पाहता भारताचे या सामन्यात पारडे जडच असेल. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघ अडचणीत असतांना के एल राहुल आणि चेसमास्टर विराट कोहली यांनी चिवट कामगिरीचे प्रदर्शन करत संघाला विजयापर्यंत नेवून पोहोचवले होते. अवघड परीस्थितीदेखील भारतीय संघ चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करू शकतो हे त्या सामन्यातून सिद्ध झाले. तसेच वरच्या फळीतील फलंदाज अपेक्षित कामगिरी करण्यास अपयशी ठरले तर मध्यक्रमातील फलंदाजी संघाची नाव पैलतीरी लावू शकते याचा विश्वास संपूर्ण संघव्यवस्थापनाला आला.(INDvsPAK)

अफगानिस्तान विरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने अक्षरशः मैदान गाजवले. कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमी आणि तुफानी शतकी खेळीच्या बळावर भारताने त्या सामन्यात एकहाती विजय मिळवला. रोहितच्या या आक्रमक खेळीमुळे त्याला लय सापडल्याचे दिसून आले. दुसरीकडे भारताच्या गोलंदाजांनीदेखील आतापर्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीत कुठेही चूक काढायला जागा नाही, एवढी त्याने तोलून मापून गोलंदाजी केली आहे. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकी जोडगोळीने फलंदाजांना वेळोवेळी आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले आहे. मोहम्मद सिराज अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात जरा महागडा ठरला परंतु त्याच्यात फलंदाजांना रोखण्याची क्षमता आहे. एकंदरीत काय तर भारतीय संघ कागदावर तरी तगडा भासत आहे.(INDvsPAK)

दुसरीकडे पाकिस्तानने देखील आपल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तीनशे पारच्या लक्षाचा त्यांनी यशस्वी पाठलाग केला असल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला असेल. रिझवानने दोन्ही सामन्यात चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. कर्णधार बाबर आझमला मात्र अजूनही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला या सामन्यात चांगल्या कामगिरीची आशा असेल. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज देखील अजूनपर्यंत लयीत नजर आलेले नाहीत. आजच्या सामन्यात सगळ्या गोष्टी योग्य जागी बसाव्यात याची आशा पाकिस्तान संघव्यवस्थापनाला असेल.(INDvsPAK)

===========

हे देखील वाचा : पाकिस्तानातील ‘या’ पंतप्रधानांनी भारतात सादर केले होते हिंदू विरोधी बजेट

===========

पाकिस्तानविरुद्धचा भारताचा विश्वचषक स्पर्धेचा इतिहास एकतर्फीच राहिला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत सात वेळा समोरासमोर आले आहेत. यामध्ये सातही सामन्यात भारतानेच बाजी मारली आहे. आजच्या सामन्यात भारताला लोळवत पाकिस्तान इतिहास घडवेल की भारत आपला रेकॉर्ड कायम राखेल याकडे क्रिकेटविश्वाच्या नजरा लागलेल्या आहेत.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.