भगवान शंकराची काशी नगरी भक्तांनी कायम गजबजलेली असते. येथील काशी विश्वनाथाचे मंदिर हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. काशी विश्वेनाथाची ओळख विश्वाचा परमेश्वर अशीही आहे. या मंदिरात जाऊन पवित्र गंगेत स्नान केले तर मोक्ष प्राप्त होतो, अशी भक्तांची भावना आहे. त्यामुळेच काशी विश्वनाथाचे आयुष्यात एकदा तरी दर्शन घेण्याची इच्छा तमाम हिंदु धर्मियांची असते. यासोबत काशी नगरीतील आणखी एक स्थळ तामाम हिंदु धर्मियांसाठी पूजनीय आहे. हे स्थळ म्हणजे एक रहस्यमयी विहिर आहे. या विहिरीला स्थानिक भाषेत नागकूप असे म्हणतात. (Snakewell)
खूप खोल असलेली ही विहीर काशीच्या जैतपुरा भागात आहे. या विहिरीच्याही खाली अनेक विहिरी असून येथील अंतिम विहिरीचे टोक थेट नागलोकाला जोडले असल्याचे बोलले जाते. ही नागकूप म्हणजे, नागलोकाला जोडण्याचा मार्ग असून येथेच नागराज तक्षक याचा निवास असल्याची भावना भक्तांची आहे. या विहीरीचे नुसते दर्शन घेतले तरी सर्व दोष दूर होतात, असे सांगण्यात येते. नागपंचमीच्या दिवशी या विहिरीमध्ये जाऊन पूजा करण्याची संधी भक्तांना मिळते. रहस्यमयी अशा या विहिरीबाबत स्थानिकांमध्ये अनेक कथा प्रचलित आहेत. (Snakewell)
भगवान शंकराची नगरी असलेल्या काशीमध्ये अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत. यामध्ये सर्वात रहस्यमय विहिर भक्तांना कायम आकर्षित करुन घेते. काशीच्या जैतपुरा भागात असलेल्या विहिरीला नागकूप असे म्हटले जाते. या विहिरीचे टोक थेट नागलोककडे जात असल्याची माहिती आहे. काशी खंडोक्त या काशीवर आधारित ग्रंथांमध्ये याबाबत माहिती आहे. तसेच धर्मग्रंथांमध्येंही या विहिरीचा उल्लेख नागलोकांचे प्रवेशद्वार म्हणून केल्याचा उल्लेख आहे. या विहिरीची नेमकी खोली किती आहे, हे तपासण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. पण त्यात यश आले नाही. मात्र या विहिरीच्या आत आणखी 7 विहिरी असल्याचं सांगितलं जातं. त्यातील शेवटच्या विहिरीचे टोक थेट पाताळ लोकात म्हणजेच नाग लोकापर्यंत जोडले गेल्याचे सांगण्यात येते. कालसर्प दोषापासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण जगात जी 3 मुख्य ठिकाणे आहेत, त्यापैकी काशीमधील ही नागकूप एक आहे. (Snakewell)
या विहिरीचे नुसते दर्शन केल्याने सर्पदंशाच्या भीतीपासून मुक्ती मिळतेच पण जन्मकुंडलीतून कालसर्प दोषही दूर होतो, असेही सांगितले जाते. ज्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार नाग किंवा नागदेवतेचे दर्शन होते, त्यांनी या कुंडाचे पाणी घरात शिंपडल्यास हे दोष दूर होतो, असेही सांगितले जाते. ही विहीर हजोरो वर्षापूर्वीची आहे. या विहिरीच्या बांधणीवरुन त्याचा अभ्यास करण्यात आला. तेव्हा विहिर हजारो वर्षापूर्वीची असल्याची माहिती पुढे आली. किमान 3000 वर्षे जुन्या या विहिरीत आजही सापांचे वास्तव्य आहे. या विहिरीचे दर्शन घेतल्यानंतर येथे असलेल्या नागेश्वर महादेवाचे दर्शन घेतले जाते. नागपंचमीच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. नागेश्वर महादेवाला दूध आणि लाह्या अर्पण करुन शंकाराची पूजा केली जाते. (Snakewell)
सापांचे घर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या विहिरीच्या खोल भागात नागांचा राजा तक्षकही राहतो, असे मानले जाते. राजा तक्षक याला तुळस प्रिय आहे. त्यामुळे या विहिरीत तुळशीची पाने टाकून तक्षक राजाची पूजा कऱण्यात येते. या विहिरीचे पाणीही चमत्कारीक असल्याचे मानण्यात येते. हे पाणी सलग 43 दिवस मनसा मातेला अर्पण केल्याने सर्व दुःखे दूर होतात, अशी भावना आहे. (Snakewell)
धार्मिक ग्रंथांत या विहिरीचा उल्लेख ‘कर्कोटक नाग तीर्थ‘ म्हणून केलेला आहे. शिवाय याच ठिकाणी महर्षी पतंजली यांनी पतंजली सूत्राची रचना केली आणि व्याकरणकार पाणिनी यांनी महाभाष्याची रचना केल्याचे स्थानिक पुजारी सांगतात. महर्षी पतंजलींच्या या निवासस्थानाचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. महर्षी पतंजली यांना शेषावतार देखील मानले जाते. दरवर्षी नागपंचमीला त्यांची जयंती या ठिकाणी साजरी केली जाते. नागपंचमीच्या दिवशी महर्षी पतंजली स्वत: नागाच्या रूपात येथे येतात आणि त्यांच्या शेजारी असलेल्या नाग कुपेश्वराची प्रदक्षिणा करतात असे सांगण्यात येते. (Snakewell)
============
हे देखील वाचा : खोल गुहेत असलेल्या शिवमंदिराचा महिमा…
============
नागपंचमीला येथे मोठी यात्रा भरते. लाखो भक्त नागकूपा येथे दर्शन करण्यासाठी येतात. वर्षातील या एकाच दिवशी विहिरीतील सर्व पाणी पंपाने बाहेर काढले जाते. त्यानंतर त्यामध्ये स्थापित शिवलिंगाची पूजा केली जाते. मात्र तासाभरानंतर हे पाणी पुन्हा येते आणि विहिर पूर्णपणे भरली जाते. हे पाणी कसे आणि कुठून येते हे रहस्य आजही कायम आहे. या विहिरीच्या बांधकामाविषयी अनेक कथा आहेत. 1665 मध्ये एका राजाने विहिरीचा जीर्णोद्धार केला होता अशी माहिती आहे. विहिरीच्या आजूबाजूला पायऱ्या आहेत. खाली असलेल्या विहिरीच्या मचाणावर जाण्यासाठी दक्षिणेकडून 40, पश्चिमेकडून 37, उत्तर आणि पूर्वेला भिंतीला 60-60 पायऱ्या जोडलेल्या आहेत. त्याशिवाय शिवलिंगावर उतरण्यासाठी 15 पायऱ्या आहेत. ही विहिर आतूनही अत्यंत देखणी असून वास्तुशास्त्राचा अजोड नमुना आहे.
सई बने