मुंबई आणि मुंबईची गर्दी आपल्या रेषांनी जिवंत करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा (Mario Miranda). त्यांच्या अतुलनीय ‘रेषागिरी’बद्दल त्यांना आधी पद्मश्री आणि नंतर पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल या काही ठरावीक गोष्टी….
१- दमणमध्ये जन्मलेल्या मिरांडा यांचे कुटुंब मूळ गोव्याचे. खूप लहान वयात त्यांची रेषांशी मैत्री जुळली. घरांच्या भिंती रंगवून संपल्या तेव्हा आईने एक वही आणून दिली. मिरांडा तिला डायरी म्हणतात. त्यात ते आपल्याला ‘दिसेल’ ते टिपत असत. शेवटपर्यंत आपल्या चित्रांचं वर्णन ते ‘व्हिज्युअल डायरी’ असं करत होते.
२- गोव्यात असताना मारिओंना फक्त कोंकणी व पोर्तुगीज भाषा येत होती. बंगळुरूमध्ये हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यावर त्यांचा इंग्रजीशी संबंध आला. पुढे कॉलेज शिक्षणासाठी ते मुंबईत आले. सेंट झेवियरमध्ये बीए करत असतानाही, त्यांनी मुंबई विषयावरची पोस्टकार्ड स्केचेस विकून त्यांनी काही दिवस काढले.
३- ‘करंट’ साप्ताहिकाने त्यांना पहिला ब्रेक दिला आणि वर्षभराने ‘टाइम्स’नेही त्यांच्यासाठी दरवाजा उघडला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘फेमिना’, ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वाचकांना मिरांडा यांनी आपल्या व्यंगचित्रांची सवय लावली.
४- मुंबईतील माणसं हा मारिओंच्या जिव्हाळ्याचा विषय. धोबीघाट, बाजार, मासे विकणा-या कोळीणी, इमारतींच्या रांगा, तरुणांईची स्पंदने, रेस्टॉरंटस्मधील वातावरण, व्हायोलीनवाले मास्तर आणि गाणारी मुलेही त्यांच्या व्यंगचित्रात अनेक ठिकाणी दिसायाचे. म्हणूनच मुंबईतील अनेक हॉटेल, क्लबमध्येही त्यांची कार्टून झळकताना दिसायची.
५- मारिओंनी आपल्या आयुष्यातील मोठा कालखंड मुंबईत घालवला. त्यामुळे त्यांना दिसलेली मुंबई त्यांनी सातत्याने आपल्या व्यंगचित्रातून टिपली. ‘मारिओज बाँबे’ हे पुस्तक पाहिल्यावर त्यातील विषयवैविध्य चकीत करून सोडते.
६- आयुष्याच्या उत्तरार्धात मारिओंनी मुंबईला रामराम ठोकून आपल्या मूळ गावी गोव्याकडे प्रयाण केले. गोव्यातही त्यांनी गोवा आणि कोकणासंदर्भातील अनेक रेखाटने सुरूच ठेवली. त्यांची गोयंच्या मजेची व्यंगचित्रेही गाजली असली, तरी मनाने मात्र ते कायमच ‘मुंबयचो कार्टुनिस्ट’ होते.
७- स्पेनने ‘द ला क्रूस दे इसाबेल ला कॅटॉलिक’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिरांडा यांचा आंतराष्ट्रीय गौरव केला होता. त्यांची ‘मारिओज बाँबे’ याप्रमाणे ‘ट्रॅव्हल’ हे परदेशातील व्यंगचित्रांवरील पुस्तक आणि अन्य काही व्यंगचित्रांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
असे हे मारिओ मिरांडा ज्यांची व्यंग चित्रे पानभर, त्यात शंभर, दोनशे तरी व्यक्ती व यातल्या अनेक व्यक्तींच्या तोंडातून निघालेली मुक्ताफळे, यामुळे एक व्यंग चित्र बघायला किंवा वाचायला निदान १५ ते २० मिनिटे तरी लागत.
शब्दांकन – शामल भंडारे.