करण जोहरची शॉर्ट स्टोरीजवर काम करणा-या कंपनीने नेटफ्लिक्सवर एक कोलाज फिल्म सादर केलीय. कोलाज म्हणजे वेगवेगळे तुकडे एकत्र करुन केलेली कलाकृती. तसंच या चित्रपटाचं आहे. अजीब दास्तान्स… चार वेगवेगळे दिग्दर्शक आणि त्यांच्या चार कथा या अजीब दास्तान्समध्ये बघता येतील. या चारही कथांचा एकमेकांबरोबर संबंध नाही. चारही कथांमध्ये महिला पात्र प्रमुख… तरीही सर्व कथा एकमेकांपासून अंतर ठेऊन आहेत. नेटफ्लिक्सवर सादर झालेला हा कथांचा कोलाज, अर्थात अजीब दास्तान्स त्यातील कलाकारांच्या अभिनयामुळे वेगळा पण उत्तम असा प्रयोग म्हणायला हवा.
अजीब दास्तान्सची (Ajeeb Daastaans) सुरुवात होते मजनू या कथेपासून. त्याचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहेत. दुसरी कथा आहे खिलौना. राज मेहता त्याचे दिग्दर्शक आहेत. गिली पुच्ची या तिस-या कथेचे दिग्दर्शक निरज घेवान आहेत. तर अभिनेते बम्मन ईरानी यांचा मुलगा कायोज ईरानी यांनी अनकही या चौथ्या कथेचे दिग्दर्शन केले आहे. कायोज यांनी याद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. अजीब दास्तान्स मध्ये नुसरत भरुचा, फातिमा सना शेख, जयदीप अहलावत, शेफाली शाह, मानव कौल, कोंकणा सेन शर्मा, अदिति राव हैदरी, अभिषेक बॅनर्जी, इनायत वर्मा हे कलाकार आहेत.
अजीब दास्तान्सची सुरुवात शशांक खेतान यांच्या मजनूपासून. लीपाक्षी (फातिमा सना शेख) आणि बबलू (जयदीप अहलावत) यांचे लग्न झाले आहे. मात्र हे लग्न नाईलाजास्तव केल्याचं बबलू आपल्या बायकोला पहिल्याच दिवशी सांगतो. त्यानंतर लीपक्षीच्या जीवनात राज कुमार मिश्रा (अरमान रल्हन) नावाचा तरुण येतो. या वेगळ्या प्रेमाच्या त्रिकोणाचा शेवट कसा होतो हे पहाण्यासारखे आहे.
राज मेहतांची कथा खिलौना, नुसरत भरुचाच्या अभिनयासाठी खास आहे. मीनल (नुसरत भरुचा) एका कॉलनीमध्ये काम करते. तिच्यासोबत तिची छोटी बहिण बिन्नी रहाते. याच कॉलनीमध्ये रहाणारा सुशील (अभिषेक बॅनर्जी) तिच्यावर प्रेम करतो. पण कॉलनीचा सेक्रेटरी मीनलवर नजर ठेऊन असतो. मीनलच्या घरी लाईट आहे, ती तारेवर आकडा टाकून आलेली. या चुकीच्या कृत्याला मान्यता देण्यासाठी मीनलला सेक्रेटरीची मनधरणी करावी लागते. पण इथे असं काही होतं की मीनल, बिन्नी आणि सुशील तिघंही अडकतात… काय ते पडद्यावर पहाण्यासारखं आहे.
कोंकणा सेन सारखी अभिनेत्री कुठल्याही साच्यात टाकली तरी ती आपली छाप सोडतेच, हे पाहण्यासाठी तीसरी कथा नक्की पहावी. गीली पुच्ची या तिस-या कथेमध्ये समलैंगिकतेचा विषय मांडलेला आहे. अदिती राव हैदरी आणि कोंकणा सेनच्या अवती भोवती ही कथा फिरते. कायोज ईरानीच्या अनकही कथेमध्ये नताशा (शेफाली शाह) आणि रोहन शर्मा (तोतोरॉय चौधरी) यांच्यातील भावनीक वाद आहे. या दोघांची मुलगी समायरा ऐकू शकत नाही. वडील म्हणून रोहन तिला स्विकारत नाही. पण याचवेळी नताशाच्या आयुष्यात तिच्या मुलीसारखाच तरुण येतो. त्यालाही ऐकू येत नाही. नताशा आणि त्याच्यात एक अबोल नाते तयार होते. आणि हे नातं कुठपर्यंत जातं, हे बघण्यासारखं आहे. पहिल्याच प्रयत्नात कायोज ईरानी यांनी आपली प्रतिभा दाखवून दिली आहे.
या चारही कथा वेगळ्या असल्या तरी त्यातील प्रत्येक कथा चांगली आहे. त्यामुळेच अजीब दास्तान्सचे रसायन छान मिळून आलंय.
- सई बने