स्विडनची प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला (Greta Thunberg) लवकरच तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी पर्यावरण कार्यकर्ती म्हणून ग्रेटा थनबर्गला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ग्रेटानं या वाढत्या लोकप्रियतेचा आधार घेत अनेक ठिकाणी पर्यावरणावर भाषणं दिली. अगदी संयुक्त राष्ट्रसंघातही तिचे भाषण झाले आहे. ग्रेटाला पुरस्कारही अनेक मिळाले असून तिच्या बॅक अकाऊंटमध्येही मोठी रक्कम जमा झाली आहे. यामुळेच कायम वादातही ग्रेटा राहिली आहे. आता तिच ग्रेटा, स्विडनचा एक कायदा मोडला म्हणून तुरुंगात जाऊ शकते. एका आंदोलनादरम्यान ग्रेटानं स्विडीश कायदा मोडला. यामुळे तिला सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.
जीवाश्म इंधनाच्या वापरावर बंदी घालण्यासाठी ग्रेटा (Greta Thunberg) आणि तिचे सहकारी स्विडनमध्ये धरणे देत असतांना ग्रेटावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ग्रेटा थनबर्गवर जूनमध्ये धरणे निदर्शनादरम्यान पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ग्रेटासह पर्यावरण कार्यकर्त्यांनी स्वीडनच्या दक्षिणेला असलेल्या मालमो शहरात धरणे आंदोलन केले. टिलबाका फ्रेमटीडेन या पर्यावरण संरक्षण संस्थेने जूनमध्ये मालमो येथे ही निदर्शने केली. या दरम्यान आंदोलकांनी मालमो बंदराचे प्रवेशद्वार रोखले. आंदोलक जीवाश्म इंधनाच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करत होते. यावेळी आलेल्या पोलिसांनी ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) आणि इतर आंदोलकांना आंदोलनस्थळ सोडण्यास सांगितले, परंतु आंदोलकांनी पोलिसांच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला. पोलीसांच्या आदेशाचे उल्लंघन करीत सार्वजनिक जागी कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणा-या ग्रेटासह अन्य आंदोलकांवर तेव्हाच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअंतर्गत ग्रेटाला जास्तीत जास्त सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
15 वर्षांची असतांना ग्रेटानं स्वीडनच्या संसदेबाहेर पर्यावरण रक्षणासाठी आंदोलन सुरू केले. दर शुक्रवारी होणाऱ्या ग्रेटाच्या या धरणे-प्रदर्शनांना जगभरात ओळख मिळाली. तेव्हा पंधरा वर्षाची ही ग्रेटा जगभरातील पर्यावरण आंदोलनाचा चेहरा बनली. आता ग्रेटा वीस वर्षाची आहे. या पाच वर्षात ग्रेटाची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. मात्र ग्रेटाच्या आंदोलनाला जेवढी लोकप्रियता मिळाली, तेवढीच तिच्यावर टिकाही होत आहे. कारण ग्रेट ही शिक्षण प्रणालीच्या विरुद्ध आपले मत व्यक्त करते. ऑगस्ट 2018 मध्ये, वयाच्या 15 व्या वर्षी, जेव्हा ग्रेटा स्विडीश संसदेबाहेर आंदोलन करत होती, तेव्हा तिनं शाळा सोडली होती. हवामानासाठी शाळा बंद ही मोहिमच तिनं चालवली. 11 डिसेंबर 2019 रोजी ग्रेटाला ‘टाईम पर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हापासून जगभरातील मान्यवर संस्थांमध्ये ग्रेटाला तिचे विचार व्यक्त करण्यासाठी बोलवण्यात येते. आता ग्रेटा थनबर्ग म्हणजे, पर्यावरण आणि हवामान संकटाचा एक महत्त्वाचा चेहरा बनली आहे.
ग्रेटाकडून प्रोत्साहन घेत अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडली आणि पर्यावरणाचे काम चालू केले. या मोहिमेला ‘फ्रायडे फॉर क्लायमेट’ असे नाव मिळाले. 2018 मध्ये ग्रेटानं संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत व्याख्यान केले. तिच्या या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच आंदोलन सुरु झाले, ते म्हणजे शाळा सोडण्याचे. दर आठवड्याला जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागात विद्यार्थ्यांचे संप झाले. यावेळी ग्रेटाची भूमिका चुकीची असल्याची टिकाही तित्यावर झाली. या प्रसिद्धीमुळे ग्रेटाचे नाव जगभर झाले. तिच्या प्रभावाला जागतिक स्तरावर ‘ग्रेटा इफेक्ट’ म्हणून नाव मिळाले आहे. ग्रेटाला अनेक पुरस्कार आणि सन्मानही मिळाले आहेत. रॉयल जिओग्राफिकल सोसायटी ऑफ स्कॉटलंडचे मानद सदस्यत्व तिच्याकडे आहे. टाइम मासिकाच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत तिचे नाव समाविष्ट आहे. याशिवाय टाइमच्या वर्षातील सर्वात तरुण व्यक्ती म्हणून निवडले गेले आहे. 2019 मध्ये फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून ग्रेटाचा उल्लेख केला. याशिवाय 2019 आणि 2020 मध्ये सलग दोन नोबेल पारितोषिकांसाठी ग्रेटाला नामांकन मिळाले आहे. गोगलगायीच्या नव्याने शोधलेल्या प्रजातीला ग्रेटाचे (Greta Thunberg) नाव देण्यात आले आहे. ग्रेटाला पर्यावरण क्षेत्रातला महत्त्वाचा ‘सम्यक जीविका पुरस्कार’ मिळाला आहे.
========
हे देखील वाचा : पाकिस्तानातील 5 हजार वर्ष जुन्या शंकराच्या मंदिराचा इतिहास
========
ग्रेटा (Greta Thunberg) ही तिच्या पराक्षांबाबत वक्तव्यामुळे वादात सापडली आहे. भारतातील जेईई परीक्षेसंदर्भातही ग्रेटानं टिका केली होती. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर नाहक ताण येत असल्याचे तिचे म्हणणे होते. मात्र दहावीची परीक्षाही जिने दिली नाही, तिने परीक्षांच्या ताणाबाबत बोलू नये, असा सल्ला यावर तिला मिळाला होता. एकूण अवघ्या पाच वर्षात लोकप्रियतेच्या शिखरावर चढलेल्या ग्रेटाला तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
सई बने