Home » शरद पवार – अमित शहा यांच्या भेटीचे गौडबंगाल

शरद पवार – अमित शहा यांच्या भेटीचे गौडबंगाल

by Correspondent
0 comment
Sharad Pawar with Amit Shah | K facts
Share

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत आणि त्यामुळे राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार गोत्यात आले आहे अशी सार्वत्रिक भावना निर्माण झाली आहे. एकीकडे ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे सारे राज्य हैराण झाले असतानाच त्याचा मुकाबला करू पाहणाऱ्या सरकारच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणे ही खरे तर फार चांगली घटना नाही. वस्तुस्थिती मात्र तशीच आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासूनच मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून या ना त्या निमित्ताने त्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्न होत आहेत.

त्यामध्ये साहजिकच मुख्यमंत्रीपद गमावल्यामुळे अस्वस्थ झालेले देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत आणि केंद्राचेही त्यांना आशीर्वाद आहेत कारण ‘मोदी-शहा’ यांचा विरोध पत्करून शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी नव्याने घरोबा करून हे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणले आहे. अर्थात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे या महाविकास आघाडीचे खरे शिल्पकार असल्याने त्यांच्याच आशीर्वादाने हे सरकार कारभार करीत आहे हे उघड सत्य आहे. मात्र भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत हेही तेवढेच खरे आहे. राज्यपाल वेळोवेळी घेत असलेल्या सरकारविरोधी भूमिका त्याचे प्रमाण आहे.

 Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh, Maharashtra Home Minister Anil Deshmukh and suspended Mumbai Police officer Sachin Vaze.
From left: Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh, Maharashtra Home Minister Anil Deshmukh and suspended Mumbai Police officer Sachin Vaze.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर त्याला जबाबदार असलेले सचिन वाझे (Sachin Vaze) या पोलीस अधिकाऱ्याचे प्रकरण आणि त्यासंबंधी कारवाई म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केल्यानंतर त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेले गंभीर आरोप यामुळे महाविकास आघाडी सरकारला नाईलाजाने बॅकफुटवर जावे लागले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या सर्व प्रकरणाचा मोठ्या कौशल्याने वापर करीत सरकारला चांगलेच अडचणीत आणले आहे.

गृहखाते हे राष्ट्रवादीकडे असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांना यातून वाचविण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांना साहजिकच पुढाकार घ्यावा लागला आहे. परंतु हे प्रकरण भाजपने फारच गंभीरपणे घेतले असून त्यासंबंधीचा अहवाल स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहखात्याच्या सचिवांना पाठविला आहे. त्याच्याही आधी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा (Amit shah) यांची खास भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील परिस्थितीचा अहवाल दिला होता. अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री असल्यामुळे या प्रकरणात त्यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यातच राज्यातील भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीच्या शक्यतेची ‘हूल’ उठवून त्यादृष्टीने वातावरणनिर्मिती करण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीतही (Maha Vikas Aghadi) सारे काही आलबेल नाही हे आघाडीतील विविध पक्षांच्या वक्तव्यांमुळे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातच एकूणच सर्वत्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

नेमक्या याच वेळेला शरद पवार आणि अमित शहा यांची गेल्या शनिवारी अहमदाबादमध्ये ‘गुप्त बैठक’ झाल्याचे वृत्त येऊन थडकल्यामुळे या संभ्रमाच्या वातावरणात आणखीनच भर पडली आहे. पवार-शहा गुप्त भेटीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाब मलिक यांनी इन्कार केला असला तरी खुद्द अमित शहा यांनी याप्रकरणी भाष्य करताना “अशा गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात” असे सांगून संशयाचे गूढ निर्माण केले आहे. शरद पवार यांची राजकारण करण्याची एकूण पद्धत पाहता त्यांच्यावर सहजासहजी कोणीही विश्वास ठेवत नाही. त्याबाबतीत त्यांची ‘अविश्वसनीय नेता’ अशीच ‘ख्याती’ आहे. त्यामुळे पवार-शहा यांची नक्की गुप्त बैठक झाली काय? आणि झाली असल्यास त्या बैठकीत नक्की ठरले काय? हे सांगणे तूर्तास तरी अवघड आहे. महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेच्या हालचाली प्रचंड वेगात असतानाच शरद पवार यांनी त्यावेळी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन असेच काही काळ संशयाचे वातावरण निर्माण केले होते. आता महाविकास आघाडीचे सरकार गोत्यात आलेले असताना त्यांनीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादेत गुपचूप भेट घेऊन त्यांच्याशी काय चर्चा केली असेल हे एक नवीन रहस्य ठरण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar meeting with Amit Shah

विशेष म्हणजे पवार आणि अमित शहा यांची गेल्या शनिवारी अहमदाबादेत भेट झाली आणि अहमदाबादहून मुंबईस परतल्यानंतर सोमवारी अचानक श्री पवार प्रकृती अस्वाथ्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. हा मानला तर एक ‘योगायोग’ही ठरू शकतो. ताज्या वृत्तानुसार श्री पवार पुढचे दहा – बारा दिवस तरी रुग्णालयात उपचारासाठी थांबणार आहेत. त्यांचे सर्व आगामी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र पवार-शहा यांच्या कथित गुप्त बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी पुन्हा मनात मांडे खायला सुरुवात केली आहे. काहीजणांनी तर राज्यात लवकरच राजकीय भूकंप घडण्याची शक्यता असल्याचे भाकीत वर्तविले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच केंद्राकडून महाराष्ट्राबाबत एखादा महत्वाचा राजकीय निर्णय घेतला गेल्यास त्यामध्ये आश्चर्य वाटायला नको. असा एखादा निर्णय झाला तरच पवार-शहा यांच्यातील गुप्त बैठकीसंबधीचे ‘गौडबंगाल’ कळू शकेल.

श्रीकांत ना. कुलकर्णी


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.