एलबीटीवरून रोहित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भाजपा सरकारवर टीका केली होती. “राज्यात भाजपाची सत्ता होती, त्यावेळी त्यांनी एलबीटी घाईघाईने रद्द केला. त्यामुळे गेल्या पाच वर्षात २६ हजार कोटींचं नुकसान झालं. अशी टीका रोहित पवार यांनी केली होती.रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
कराडमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं. त्याचबरोबर राज्य सरकारलाही लक्ष्य केलं. “रोहित पवार यांना कॅलक्युलेशन समजत नाही. नीट अभ्यास केला पाहिजे आणि नंतर बोललं पाहिजे. महाराष्ट्रात एलबीटी जरी असतं, तरी आपल्याला पैसे मिळाले नसते. नुकसान झालं, तोटा झाल्याचे बोलून काहीतरी आकडे सांगायचे, असं न करता नीट अभ्यास करुन बोललं पाहिजे,” असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांना दिला.
त्याचबरोबर जीएसटीच्या थकबाकीवरुन राज्य सरकारकडून भाजपावर होत असलेल्या टीकेलाही फडणवीस यांनी उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, “खोटं बोल, पण रेटून बोल ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची पद्धत आहे. मार्चपर्यंत जीएसटीचे पैसे राज्यांना मिळाले आहेत. थकबाकीची ही मागणी मार्चनंतरची आहे,” असं फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवारांना दिला अभ्यास करण्याचा सल्ला
44