अदिति राव हैदरी(Aditi Rao Hydari), आपल्या अपरिमित सौंदऱ्याने अन कौशल्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री. सिनेजगताशी थेट संबंध नसताना इथे येऊन आपले कर्तुत्व सिद्ध करू शकलेल्या मोजक्या कलाकारांच्या यादीत अदिति राव हैदरीची गणना केली जाते. आतापर्यंत तिने अनेक भूमिका रुपेरी पडद्यावर जिवंत केल्या आहेत. हिंदी, तमिळ अन तेलुगू भाषांमध्ये तिचं काम प्रामुख्याने दिसून येतं. ‘प्रजापथी’ या मल्याळम सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अदितिने पुढे अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. दिल्ली – ६, येह साली जिंदगी, रॉकस्टार, बॉस, वजीर, पद्मावत, अजीब दास्तान अशा अनेक यशस्वी चित्रमधून अदिती प्रेक्षकांच्या भेटीला आली. पडद्यावर अगदी राजकुमारीसारखा वावर असणारी अदिती खऱ्या आयुष्यात देखील राजकुमारीच आहे. अगदी शाही अशी तिची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. आता हा नेमका काय विषय आहे ? समजून घेऊया.
एहसान हैदरी आणि विद्या राव या हैद्राबादस्थित दाम्पत्याच्या पोटी अदितीचा जन्म झाला. अदितीचे वडील सुलेमानी बोहरा मुस्लीम होते तर बुद्धीजम मानणारी आई सारस्वत ब्राम्हण कुटुंबातून येते.अदितिचे आईवडील हैद्राबाद संस्थानाच्या राजघराण्याचे वंशज आहेत. अकबर हैदरी, हैद्राबाद संस्थानाचे त्या काळचे पंतप्रधान हे अदितिच्या वडिलांचे आजोबा आहेत, आसामचे राज्यपाल राहिलेले मोहम्मद सालेह अकबर हैदरी हे अदितिचे काका आहेत. अदितिची आई, विद्या राव, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ‘ठुमरी’ आणि ‘दादरा’ प्रकारांमध्ये निपुण असलेल्या शास्त्रीय गायिका आहेत. अदितिच्या आईची आई, शांता रामेश्वर राव ह्या वानापार्थी संस्थानाचे शेवटचे राजा जे. रामेश्वर राव यांच्या मुलगी आहेत. निर्माती, लेखक, दिग्दर्शक किरण राव आणि अदिति राव हैदरी नात्याने बहिणी लागतात.(Aditi Rao Hydari)
अदितिने भरतनाट्यमचं शिक्षण घेतलं आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून ती भरतनाट्यम शिकते. तिच्या राव हैदरी या आडनावाबद्दल बोलतांना अदिति सांगते, मी लहान असतांना माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. माझ्या आईने त्यांनतर मला वाढवलं आणि माझ्या वडिलांचा अंश कायम माझ्यात आहे. त्या दोघांना माझ्यासोबत ठेवायचं म्हणून मी दोघांचही आडनाव लावते. आंध्र प्रदेशातील एका बोर्डिंग स्कूलमध्ये राहून अदितिने तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलेलं आहे तर लेडी श्रीराम कॉलेजमधून तीने पदवीचे शिक्षण घेतले.(Aditi Rao Hydari)
=======
हे देखील वाचा : क्रिसन परेराची ही सत्यघटना तुम्हाला माहिती आहे का?
=======
वकील आणि अभिनेता सत्यदीप मिश्रा याच्यासोबत अदितिचे लग्न झाले होते. अगदी लहान वयात अदितीने लग्नाची गाठ बांधली होती. आपलं वैयक्तिक जीवन जपण्याचा अदिती प्रयत्न करत असते. २०१३ मध्ये हे दोघे वेगळे झाले. दोघांचं वैवाहिक आयुष्य संपुष्टात आलेलं असलं तरीही दोघे एकमेकांचे अतिशय चांगले अन जवळचे मित्र आहेत. अगदी शाही घराण्याची पार्श्वभूमी, आईवडीलांच्या विभक्त होण्याने थोडंस खडतर गेलेलं बालपण ते बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यापर्यंतचा अदिती राव हैदरीचा प्रवास प्रेरणादायक आहे.