Home » निसर्गानं नटलेलं ‘बांदीपूर व्याघ्र प्रकल्प’

निसर्गानं नटलेलं ‘बांदीपूर व्याघ्र प्रकल्प’

by Team Gajawaja
0 comment
Bandipore Tiger Reserve
Share

कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील (Bandipore Tiger Reserve) “प्रोजेक्ट टायगर” प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात सफारी केली. पंतप्रधानांचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर कर्नाटकातील या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाबाबत (Bandipore Tiger Reserve) उत्सुकता वाढली आहे. कोणे एकेकाळी संस्थानिकांचा शिकारीचा शौक पूर्ण करण्यासाठी तयार झालेल्या या अभयारण्यात आता सर्व प्रकारचे प्राणी, पक्षी आहेत. शिवाय अत्यंत दुर्लभ अशी वृक्षसंपदाही आहे. येथील वाघांची संख्याही आता वाढली असून पर्यटकांचे तेच मुख्य आकर्षण आहे.  अत्यंत निसर्ग संपन्न असलेल्या या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाचा (Bandipore Tiger Reserve) संपूर्ण परिसर निसर्गप्रेमींसाठी मोठी देणगी आहे.  

बांदीपूर नॅशनल पार्क हा आधी वेणुगोपाला वन्यजीव उद्यान या नावानं परिचित होता. कर्नाटक राज्यात असलेल्या या बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी, पक्षी आणि वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानात त्याचा समावेश आहे.   कर्नाटक राज्यातील चामराजनगर जिल्ह्यात 335  चौरस मैलमध्ये पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानाची 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत व्याघ्र प्रकल्प म्हणून स्थापना करण्यात आली. बांदीपूर नॅशनल पार्कच्या बांधकामाच्या वेळी ते केवळ 90 चौरस किलोमीटरच्या परिसरात पसरले होते. परंतु 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्पांतर्गत बांदीपूर व्याघ्र प्रकल्प (Bandipore Tiger Reserve) म्हणून घोषित केले जाणार असताना त्याचे क्षेत्रफळ आणखी वाढवून 873 चौरस किलोमीटर करण्यात आले.

बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात इतर अनेक प्रकारचे वन्यजीव आणि वनस्पती आढळतात. या प्राण्यांमध्ये हत्ती, गौर, वाघ, चार शिंगे असलेला काळवीट, मुगर, इंडियन रॉक पायथन आदींचा समावेश आहे. याशिवाय बांदीपूरमध्ये राखाडी जंगली पक्षी, द्रोंगोसह निळे मोर हे सर्वात जास्त आढळतात. याशिवाय क्रेस्टेड हनी बझार्ड, रेड-हेडेड गिधाड, भारतीय गिधाड, प्लेन फ्लॉवरपेकर, हुप्पो, इंडियन रोलर, ब्राऊन फिश उल्लू, क्रेस्टेड सर्पंट ईगल, चेंजेबल हॉक-ईगल, ऑस्प्रे हे पक्षी मोठ्या प्रमाणात येथे आहेत. तसेच पांढ-या छातीचे किंगफिशर आणि मोठे गरुड ही या नॅशनल पार्कची खासियत आहे. फुलपाखरांच्या तर किमान शंभरहून अधिक जाती या नॅशनल पार्कमध्ये आढळतात. त्यामध्ये कॉमन रोझ, क्रिमसन रोझ, कॉमन जे, लेमन बटरफ्लाय, मलबार रेवेन, कॉमन मॉर्मन, रेड हेलन, ब्लू मॉर्मन, सदर्न बर्डविंग, कॉमन वँडरर, मोटल्ड मायग्रेटरी, कॉमन ग्रास यलो, स्पॉटलेस ग्रास यलो, स्पॉटेड ग्रास यलो, निलगिरी क्लाउड आदींचा समावेश आहे.  

याशिवाय या बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात वृक्षसंपदेतही विविधता आहे. साग, शिशम, चंदन, जायंट रोअरिंग बांबू आणि ग्रॅव्हिया टिबिया फोलिया आदी दुर्मिळ मानल्या जाणारे वृक्ष येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. याशिवाय कदम ट्री, इंडियन गुसबेरी, क्रेप-मर्टल, एक्सलवुड, ब्लॅक मायरोबालन अशी फुलझाडेही या जंगलात बघायला मिळतात. हे उद्यान पर्यटकांसाठी सर्व ऋतुंमध्ये बहरलेलं असतं कारण उद्यानाच्या उत्तरेला काबिनी नदी आणि दक्षिणेला मोयार नदी आहे. नुगु नदी उद्यानातून वाहते. उद्यानात सर्वात उंच स्थळ म्हणजे गोपालस्वामी बेट्टा नावाची टेकडी आहे. या टेकडीवरील मंदिरालाही पर्यटक आवर्जून भेट देतात. येथून संपूर्ण नॅशनल पार्क पाहता येतो.   

=======

हे देखील वाचा : १४ फुटांच्या मगरीला फाडणारी जगातली सर्वात प्रसिद्ध वाघीण!

=======

या बांदीपूर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांसाठी जीप सफारी, बस सफारी आणि बोट राईड आदी सुविधा उपलब्ध आहेत. हे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान सकाळी 6:30 वाजता उघडते आणि रात्री 8:30 वाजता बंद होते. या राष्ट्रीय उद्यानाजवळ म्हैसूर, कबिनी, वायनाड, उटी, नागरहोल, बंगलोर ही पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांना एक किंवा दोन दिवस या नॅशनल पार्कच्य परिसरात राहायचे असेल तर उत्तम सुविधा उपलब्ध आहेत.  बांदीपूरमध्ये आता ट्रेकिंगला परवानगी आहे. हत्ती सफारी मात्र बंद करण्यात आली आहे. पूर्वीच्या महाराजांचे खाजगी शिकारीचे ठिकाण आणि निलगिरीच्या पायथ्याशी वसलेल्या बांदीपूरला आता नव्यानं व्याघ्र प्रकल्प (Bandipore Tiger Reserve) म्हणून ओळख मिळाली आहे. वाघ आणि त्याचा अधिवास वाचवण्यासाठी देशभरात ओळखल्या गेलेल्या तीस अभयारण्यांपैकी हे एक प्रमुख अभयआरण्य आहे. तसेच आशियाई वन्य हत्तीचे आश्रयस्थान म्हणूनही या उद्यानाची ओळख आहे. पक्ष्यांच्या 200 हून अधिक प्रजाती आणि वनस्पतींची विविधता हे त्याचे आकर्षण आहेच, शिवाय फुलपाखरांच्याही शेकड्यांनी असलेल्या जातींमुळे या उद्यानाकडे पर्यटकांचा रोख वाढता आहे.  आता पंतप्रधानांनी येथे जंगल सफारी केल्यामुळे त्याची लोकप्रियता अधिकच वाढली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.