सौदी अरेबियासारखा इस्लामिक देश महिलांना अनेक अधिकार देत नवे पायंडे पाडत असतांना मात्र दुसरीकडे इराण (Iran) सारख्या देशात कट्टरवादी विचारसरणींचे टोक किती भयानक असू शकतं, याचं चित्र उभं राहिलं आहे. इराणमध्ये महिलांवर होणा-या अत्याचारात दिवसेंदिवस भर पडत आहे. एकीकडे बुरखा विरोधी आंदोलनातील सहभागी महिला कार्यकर्त्यांना कडक शिक्षा देण्यात आल्याच्या घटना पुढे आल्या नंतर आता तर शाळेतील विद्यार्थिनींवर थेट विषप्रयोगही करण्यात येत आहेत. काही दिवसांपासून इराणमध्ये शाळेत जाणा-या विद्यार्थिनींवर अनेक अत्याचार करण्यात येत असून काही शाळांवर तर रासायनिक हल्ले करण्यात आल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. या घटनांमुळे जगभरातील महिला संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच येत्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये (Iran) चालू असलेल्या या अत्याचाराचा निषेध जगभरातील महिला संघटनांनी करावा असे आवाहनही करण्यात येत आहे.
इराणमध्ये (Iran) मुलींना शाळेत जाण्यापासून रोखण्यासाठी कट्टरवादी अनेक घातक उपाय करीत आहेत. याचाच एक भाग म्हणजे, इराणमध्ये 900 हून अधिक शालेय विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. विद्यार्थिंनीनी शाळेत जाऊ नये म्हणून कट्टरवाद्यांनी त्यांना पाण्यातून विष दिल्याची ही घटना आहे. यातील पहिली घटना इराणमधील कोम शहरात घडली. त्यात सुमारे 50 विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यूही झाल्याचे उघड झाले आहे. ही घटना घडल्यानंतर अवघ्या इराणमध्ये (Iran) अशा स्वरुपाच्या घटना एकामागोमाग एक घडू लागल्या. त्यातून इराणमधील (Iran) तब्बल 58 शाळांमध्ये विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची माहिती उघड झाली आहे. एका आठवड्यातच इराणच्या 10 प्रांतातील 30 शाळांमध्ये शाळकरी मुलींना विषबाधा झाल्याची माहिती आहे. ही माहिती प्रसिद्ध झाल्यावर प्रथम इराण (Iran) सरकारने अशी कुठलीच घटना झाली नसल्याचे सांगितले. अगदी जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीतही इराणमधील शाळांमध्ये होत असल्याच्या विषबाधेच्या घटनेवर आवाज उठवण्यात आला. इराणमधील मुलींना त्यांच्या शिक्षणापासून दूर करण्यासाठी करण्यात आलेले उपाय निंदनीय असल्याचे मत संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.
इराणमध्ये (Iran) शाळांमध्ये होणा-या विषबाधेच्या घटना अत्यंत गंभीर स्वरुपाच्या आहेत. अर्दबिलमधील सात आणि राजधानी तेहरानमधील तीन अशा किमान 10 मुलींच्या शाळांना विषबाधेच्या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. इराणच्या हमदान, झांजन, पश्चिम अझरबैजान, फार्स आणि अल्ब्रोजमध्ये विषबाधा झाल्यानंतर अनेक मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इराणमध्ये हिजाब घालण्यावरुन झालेल्या आंदोलनात अटक करण्यात आलेल्या 22 वर्षीय इराणी-कुर्दिश महिलेच्या, महसा अमिनीच्या कोठडीतील मृत्यूनंतर येथे महिलांवर वारंवार हल्ले होत आहेत. अमिनाच्या मृत्यूचा महिला कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. या घटनेपासूनच इराणमध्ये मुलांच्या शाळांमध्ये विषबाधेच्या घटना वाढल्या आहेत.
या विषबाधेच्या घटना वाढल्यावर त्यांचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. त्यावर इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी हे सुद्धा पुढे आले आहेत, त्यांनी या विषबाधेच्या घटनांची गुप्तचर विभागातर्फे चौकशी करण्यात येईल असे आश्वासन संबंधित मुलींच्या पालकांना दिले. 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर 40 वर्षांपेक्षा जास्त काळात इराणमध्ये मुलींच्या शिक्षणाला कधीही विरोध करण्यात आला नव्हता. मात्र अलिकडच्या वर्षात इराणमध्ये कट्टरवाद्यांचे प्राबल्य वाढत असल्यानं महिलांवर अनेक बंधने घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच येथील महिलांमध्ये अधिक नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. इराणमधील घोम, बोरुजेर्ड सारख्या शहरांमध्ये नोव्हेंबर 2022 पासून मुलींच्या शाळांमध्ये विषबाधेची शेकडो प्रकरणे नोंदवली गेली. शाळांमध्ये पिण्याच्या पाण्यात रसायन मिसळले जात असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. या प्रकारणाची चौकशी करण्यात येईल, हे आश्वासनही तेव्हा देण्यात आले होते. पण ते आश्वासन अद्यापही प्रत्यक्षात उतरले नाही. उलट अन्य शाळांमधील विद्यार्थिनींनाही वारंवार श्वास घेण्यास त्रास, उलट्या होणे, शरीरातील तीव्र वेदना आणि मानसिक समस्या यांचा त्रास होत आहे.
======
हे देखील वाचा : दिल्लीतील अज्ञात रेल्वेस्थानकं, काही लोकांना नावं सुद्धा माहिती नाहीत
======
इराणमध्ये (Iran) 16 सप्टेंबर रोजी महसा अमिनी हिचा मृत्यू झाल्यावर मोठ्यासंख्येनं विद्यार्थिनी रस्त्यावर उतरल्या होत्या. हा येथील कट्टरवादी संघटनांना मोठा इशारा वाटला. तेव्हापासूनच विद्यार्थिनींचा विरोध रोखायचे असेल तर त्यांना शिक्षणापासून दूर केले पाहिजे, अशी विचारसरणी जोपासण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणजे इराणमधील मुलींच्या शाळेवर थेट रासायनिक हल्ले करण्याची वाढलेली कट्टरवाद्यांची हिम्मत. एकीकडे महिला दिन साजरा करण्यासाठी जगभरात अनेक उपक्रम होत आहेत. कार्यक्रम होत आहेत, अशावेळी इराणमधील विद्यार्थिनी त्यांच्या मुलभूत हक्कासाठी, शिक्षणासाठी जीवाची बाजी लावत आहेत.
सई बने