ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरीचे (Prince Harry) आत्मचरित्र स्पेअर 10 जानेवारी रोजी प्रसिद्ध होत आहे. मात्र या आत्मचरित्राच्या प्रसिद्धीच्या आधीच ब्रिटीश राजघराण्यात आग लागली आहे. त्याचे कारण म्हणजे प्रिन्स हॅरीने आपल्या आत्मचरित्रात स्पेअरमध्ये केलेल्या अनेक खुलाशांमध्ये आहे. या आत्मचरित्रात प्रिन्स हॅरीने त्याच्या आणि त्याच्या मोठ्या भावाच्या, प्रिन्स विल्यमच्या नात्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. याशिवाय राजकुमारी केंटबाबतही काही गोष्टी सांगितल्या आहेत. अर्थातच या सर्व गोष्टी वादग्रस्त आहेत. त्यामुळे प्रिन्स हॅरीचे आत्मचरित्र वादळी ठरणार अशी चिन्हे आहेत. हे वादळ ब्रिटिश राजघराण्यात दुही निर्माण करणार आहे.
ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी (Prince Harry) यांचे हे आत्मचरित्र 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. हे पुस्तक आल्यानंतर राजघराण्यातील मतभेद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘द गार्डियन’ मधील वृत्तानुसार, हॅरीने आपल्या पुस्तकात धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने त्याचा मोठा भाऊ, प्रिन्स विल्यमवर मारहाणीचा आरोप केला आहे. प्रिन्स विल्यमने हॅरी (Prince Harry) आणि त्याची अमेरिकन पत्नी मेघन मार्कल यांच्यावर अनेक आरोप केले असून विल्यमने हॅरीवर शारीरिक हल्लाही केला. विल्यमचे मत मेघन बाबत कधीही चांगले नव्हते. तो मेघनला उद्धट आणि हट्टी म्हणत असल्याचेही प्रिन्स हॅरीनं (Prince Harry) पुस्तकात म्हटलं आहे. ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी आणि मोठा भाऊ विल्यम यांच्यातील चुरशीची लढाई आता सर्व जगासमोर आली आहे. छोटा राजकुमार प्रिन्स हॅरीने त्याचा भाऊ विल्यमवर प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विल्यमने हॅरीला कॉलर पकडून मारहाण केली, असा उल्लेख या पुस्तकात आहे. हॅरीने विल्यमवर आरोप करतांना, त्याने माझी कॉलर पकडली, माझी चैन तोडली आणि मला जमिनीवर फेकले. मी कुत्र्याच्या बाऊलवर पडलो, माझ्या पाठीला दुखापत झाली. मी तिथे क्षणभर पडून राहिलो. मी दुखावलो होतो आणि भावाच्या वागणुकीवर चकितही झालो होतो. असाही उल्लेख प्रिन्स हॅरीने (Prince Harry) आपल्य स्पेअर या आत्मचरित्रात केला आहे. यावरुन 10 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणारे हे पुस्तक किती वादग्रस्त होणार याची चुणूकच मिळत आहे.
प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी (Prince Harry) यांच्यामध्ये हा झालेला वाद राणी एलिझाबेथ, द्वितीय यांच्या मृत्यूच्या नंतर झाल्याचे बोलले जाते. राणीच्या अंत्यसंस्काराला आलेल्या प्रिन्स हॅरी आणि मेघन यांना प्रिन्स विल्यमचा विरोध असल्याची चर्चा आहे. 2020 मध्येच, हॅरी आणि मेघन मर्केल या दोघांनी त्यांची शाही कर्तव्ये सोडून कॅलिफोर्नियाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राणी एलिझाबेथनं या दोघांनी घेतलेल्या निर्णयाला होकार दिला. पण त्यामागे कारणच हे होत, की यामुळे राजघराण्यातील दुरावा जनतेसमोर येणार नाही. मात्र आता हाच राजघराण्याच्या नवीन पिढीतील दुरावा जगापुढे अशापद्धतीनं आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. प्रिन्स हॅरी यांनी आपल्या स्पेअर या पुस्तकाच्या प्रसिद्धीआधी काही मुलाखतीही दिल्या आहेत. त्यामध्येही त्यांनी प्रिन्स विल्यमवर टिका केली आहे. फक्त प्रिन्स विल्यमच नाही तर त्याच्या पत्नीवरही हॅरीनं टिका केल्यानं राजघराण्यात आणि विशेषतः ब्रिटनमध्ये प्रिन्स हॅरीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ब्रिटनची राजेशाही सोडल्यानंतर प्रिन्स हॅरीने फॉक्स न्यूजला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत हॅरीने सांगितलं होतं की, त्याला त्याचा भाऊ आणि वडील परत मिळवायचे आहेत. मात्र या हॅरीच्या स्पेअर या आत्मचरित्रानंतर मात्र त्याचे हे स्वप्न दुरावताना दिसत आहे. आता या दोन्ही भावांमधील नाते अधिक दुरावल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुस्तक प्रसिद्धीच्या आधी झालेल्या या मुलाखतीमध्ये हॅरीला (Prince Harry) राजेशाही का सोडली असा प्रश्न करण्यात आला होता. तेव्हा हॅरीनं त्याला या कालावधीत अनेकवेळा रोखण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच त्याच्या पत्नीवर, मेघनवर राजघराण्यात पाळतही ठेवली गेली. तसेच तिच्यावर अनेकवेळा विनोद करण्यात येत होते. या सर्वांतून राजघराण्याला सोडण्याचा निर्णय घेतल्याचे हॅरीनं सांगितले आहे. यामुळे हॅरीनं अवघ्या राजघराण्यालाच विरोधी गटात टाकले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांना इंग्लंडच्या राजघराण्याच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते. राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकासाठी हॅरी आणि मेघन यांना आमंत्रित केले जाणार नाही. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘हॅरी अँड मेघन’ या डॉकेमेंट्रीमध्येही हॅरी आणि मेघन यांनी राजघराण्यावर अनेक आरोप केले आहेत. त्याचवेळी राजा चार्ल्स यांच्या राज्यभिषेकाला या जोडप्याला न बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता राजघराण्यातील नाराजीमध्ये हॅरीच्या स्पेअर या पुस्तकांनं भर टाकली आहे.
=======
हे देखील वाचा : Foreign Trip च्या बजेटमुळे त्रस्त आहात? ‘या’ टीप्समुळे वाचेल अर्धा खर्च
=======
या स्पेअरमध्ये जर प्रिन्सने (Prince Harry) त्याची सावत्र आई कॅमिला हिच्यावर टीका केली असेल तर त्याच्यासाठी राजघराण्याचे दरवाजे कायमचे बंद होणार असल्याचे राजघराण्याचे लेखक फिल डॅम्पियर यांनी सांगितले आहे. चार्ल्स हॅरीला काहीही माफ करेल परंतु कॅमिलाचा अपमान सहन करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एकूण ब्रिटनच्या राजघराण्यानं आपल्या नव्या पिढीतील वाद जनतेपासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण प्रिन्स हॅरीच्या स्पेअरनंतर हे वाद अधिकच गडद होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात पुस्तक हातात आल्यावर ब्रिटनची जनता त्यावर काय प्रतिक्रीया याची प्रतीक्षा आहे.
सई बने