दिवसभराची दगदग संपल्यावर रात्री निवांत आणि शांतपणे झोप घेणे यासारखे दुसरे सुख नाही. मात्र हेच सुख जर तुम्हाला मिळत नसेल तर, म्हणजेच रात्री झोप निवांत मिळत नसेल तर….झोपेत अनेकांना घोरण्याची सवय असते. ही घोरण्याची सवय जी व्यक्ती घोरते त्यांना आणि त्याच्या बाजुला झोपणा-यांनाही त्रासदायक ठरते. कारण घोरणा-या माणसालाही भविष्यात या सवयीमुळे आरोग्याची समस्या येऊ शकते. आणि ज्या व्यक्ती या घोरणा-या व्यक्तींसोबत झोपण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही निट झोप घेता येत नाही. परिणामी सर्वांच्याच झोपेवर परिणाम होतो, आणि आरोग्याचा समस्या उभ्या राहतात. या सर्वांवर उपाय आहे. घोरण्याची तक्रारही दूर करता येते. मात्र सोशल मिडीयावर सध्या एक घातक ट्रेंड व्हायरल झाला आहे, तो म्हणजे माऊथ टॅपिंग ट्रेंड (Mouth Tapping Trend). यात चक्क झोपतांना ओठांवर चिकट पट्टी लावण्यात येते. यामुळे ओठ चिकटलेले राहतात.तोंड बंद राहते, त्यामुळे घोरणा-याचा आवाज बंद होतो. अशामुळे घोरण्याची सवय बंद होते असा समज असेल तर हा ट्रेंड आरोग्याबरोबर घातक खेळ आहे, असेच म्हणायला हवे. कारण झोपेत असे तोंड बंद केले तर श्वास गुदमरण्याचाही धोका आहे. यामुळे कोणाचा जीवही जाऊ शकतो. सध्या सोशल मिडीयावर कुठला ट्रेंड कधी येईल आणि तो कशावर असेल हे सांगता येत नाही. तशाच प्रकारचा हा माऊथ टॅपिंग ट्रेंड (Mouth Tapping Trend)आहे. जगभरात हा ट्रेंड एवढा व्हायरल झाला आहे की त्यांनी काही लाखाच्या लाईंक गोळा केल्या आहेत. मात्र हा ट्रेंड फॉलो करतांना आपल्या आरोग्याबरोबर खेळ खेळू नये अशी विनंतीच आता आरोग्य संघटना करत आहेत.

सोशल मिडीयावर माऊथ टॅपिंग ट्रेंड(Mouth Tapping Trend) चालू आहे. म्हणजेच ज्यांना घोरण्याची सवय आहे त्यांनी झोपायच्या आधी त्यांचे तोंड बंद करायचे…तेही चिकटपट्टीने. ही माऊथ टॅपिंग पद्धत फॉलो करणारे डक्ट टेपपासून ते मेडिकल टेपपर्यंत टेप लावतात. त्यामुळे लोकांना नाकातून श्वास घेण्यास भाग पडते आणि तोंडातून श्वास घेण्याचे दुष्परिणाम टाळतात. हा माउथ टॅपिंग नावाचा ट्रेंड(Mouth Tapping Trend) टिकटॉकवर पसरत आहे. मात्र त्याला मिळणारा पाठिंबा बघून आरोग्य संघटना सतर्क झाल्या आहेत. तोंड बंद करून झोपल्याने घोरण्याचा धोका कमी होत असला तरी, श्वासोच्छवासाच्या समस्या वाढू शकतात, आणि श्वासासंबंधी गंभीर आजाराला भविष्यात तोंड द्यावे लागेल असा इशारा संघटनांनी दिला आहे.
TikTok वर व्हायरल झालेल्या या ट्रेंडमुळे चांगली झोप यायला मदत होते, असा समज पसरत चालला आहे. हॅशटॅग #mouthtaping वापरून यासंबंधीचे व्हिडीओ लाखोंनी शेअर केले आहेत. माउथ टॅपिंगमध्ये झोपेच्या वेळी ओठ एकत्र ठेवण्यासाठी टेप वापरल्याचे यात दाखवण्यात आले आहे. अशांमुळे शांत झोप लागल्याचा दावाही करण्यात आला आहे. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन ट्रस्टेड सोर्स (AASM), सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) यांच्या संशोधनानुसार 18 ते 60 वयोगटातील व्यक्तींना रोज किमान 7 सात तास झोपण्याची गरज असते. परंतु अशी शांत सात तासांची झोप कोणालाही मिळत नाही. झोप का मिळत नाहीत, यावर संशोधन झाल्यावर त्यातील प्रमुख कारण घोरणे हे पुढे आले. या घोरण्यावर उपाय काय म्हणून मग असे माऊथ टॅपिंग ट्रेंड (Mouth Tapping Trend)सारखे ट्रेंड व्हायरल होत आहेत.
========
हे देखील वाचा : तुम्ही कुटुंबासोबत एकत्र जेवता का ? : जाणुन घ्या फायदे
========
रात्री शांत झोप घेणे हे आरोग्यदायी आहे. या सात तासांच्या आरामदायी झोपेमुळे हृदयरोग, मधुमेह यासारखे रोग दूर सारले जातात. तर मानसिक आरोग्यही सुदृढ रहाते. पण झोपेत अडथळा आल्यावर या सर्वांच्याही समस्या जाणवू लागतात. शांत झोपेमध्ये घोरण्याचा अडथळा येत असला तरी तोंडावर चिकटपट्टी लावून झोपल्यानं घोरण्याची सवय बंद होत नाही. त्यासाठी अन्य उपाय किंवा योगासने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तोंडाला चिकटपट्टी लावून झोपल्याने त्याचे भविष्यात दुष्परिणामच अधिक होण्याचा धोका आहे. मुख्य म्हणजे यामुळे श्वास घेण्यास अडथळा होऊ शकतो. झोपेत श्वसनक्रिया बंद होण्याचाही मोठा धोकाही आहे.
या माऊथ टॅपिंग ट्रेंडला (Mouth Tapping Trend) फॉलो न करताही सुखाची झोप लागू शकते. यासाठी डॉक्टर अनेक उपाय सुचवतात. त्यामध्ये सकाळी लवकर उठणे आणि दररोज एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करणे, शरीराला पूरक असे व्यायाम, झोपायला जाण्यापूर्वी सहा तासांपेक्षा जास्त कॅफिन आणि अल्कोहोलचा वापर कमी करणे आदींचा समावेश आहे. चांगली झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे, मात्र त्यासाठी अशा घातक ट्रेंडच्या आहारी गेल्यास भविष्यात आजारपणाला आमंत्रण दिल्यासारखेच आहे.
सई बने.