Home » मेड इन इंडिया हॉवित्झर तोफेमुळे भारतीय सेना अधिक सशक्त; काय आहेत याची वैशिष्ट्ये 

मेड इन इंडिया हॉवित्झर तोफेमुळे भारतीय सेना अधिक सशक्त; काय आहेत याची वैशिष्ट्ये 

by Team Gajawaja
0 comment
Howitzer ATAGS
Share

स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी तिरंग्याला सलामी देण्याचा मान ‘मेड इन इंडिया’ तोफेला मिळाला आहे. “भारताला आत्मनिर्भर करण्याच्या मोहिमेत सैन्याचे हे योगदान मोलाचे असून यासाठी सैन्याला माझा सलाम आहे”, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलांचे कौतुक केले. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना मेड इन इंडिया ‘हॉवित्झर’ (Howitzer ATAGS) तोफेचा उल्लेख पंतप्रधानांनी केला त्यामुळे सर्वांनाच ही ‘हॉवित्झर तोफ’ नेमकी कशी आहे याची उत्सुकता लागली आहे.  

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनिमित्त तिरंग्याला सलामी देण्यासाठी या हॉवित्झर तोफेचा वापर करण्यात आला.  स्वातंत्र्यानंतर प्रथमच 48 किमी अंतराच्या मेड-इन-इंडिया तोफने दिलेली ही 21 तोफांची सलामी प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात समारंभपूर्वक सलामीसाठी वापरण्यात आलेल्या स्वदेशी हॉवित्झर तोफा केंद्र-संचलित संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) डिझाइन केली आहे. 

हॉवित्झर तोफ  (Howitzer ATAGS)-

या हॉवित्झर तोफेची अनेक  वैशिष्ट आहेत. त्यामध्ये ४८ किलोमीटरपर्यंत मारा कण्याची क्षमता हे प्रमुख वैशिष्ट्य. ओडिशाच्या बालासोरामध्ये ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’कडून (DRDO) स्वदेशी बनावटीच्या या ATAGS हॉवित्झर तोफांचे परीक्षण करण्यात आले होते. हे परिक्षण बालासोर फायरिंग रेंजमध्ये झाले. यानंतर डीआरडीने, ही जगातील सर्वात चांगली तोफ असून 48 किलोमीटर दूरवर असणाऱ्या लक्ष्यावर प्रहार करण्याएवढी याची क्षमता आहे. ATAGS हॉवित्झर स्वदेशी तोफ भारतीय सैन्याच्या 1800 आर्टिलरी गन सिस्टमची आवश्यकता पूर्ण करु शकत असल्याचे अभिमानाने जाहीर केले.  

हॉवित्झर एटीजीएस तोफांनी चीन सीमेच्या जवळ सिक्किम आणि पाकिस्तानी सीमेच्या जवळ पोखरण येथे 2 हजार राऊंड फायरिंग केले आहेत. या फील्ड ट्रायलदरम्यान डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि एटीएजीएस प्रोजेक्टचे डायरेक्टर शैलेंद वी गाडे उपस्थित होते. त्यांनी  ATAGS हॉवित्झर तोफा भारतीय सैन्यातील बोफोर्स आणि जगातील कोणत्याही अन्य तोफांपेक्षा शक्तीशाली असून इस्त्राईलच्या एटीएचओएस पेक्षाही या तोफा चांगल्या असल्याची माहिती दिली.  

ॲडवान्स टोड आर्टिलरी गन सिस्टिम (ATAGS) डीआरडीओने विकसित केले आहे. ‘भारत फोर्ज आणि टाटा अँडवान्स सिस्टिम्स लिमिटेड’द्वारा या तोफांची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय सैन्याला 1580 तोफांची तर, 150 एटीएजीएस आणि 114 धनुष तोफांची अशी भारताला एकूण 1800 तोफांची आवश्यकता आहे. या तोफा लवकरच डीआरडीओकडून भारतीय सैन्याच्या ताफ्यात देण्यात येणार आहेत.  

या हॉवित्झर तोफांमुळे चीन आणि पाकिस्तान सारख्या शत्रूविरोधात भारताला मोठी आघाडी मिळणार आहे. या भारतीय स्वदेशी तोफेमध्ये 48 किलोमीटरची प्रहार क्षमता असून जगात सर्वात दूर हल्ला करण्याची यामध्ये ताकद आहे. अमेरिकेच्या तोफाही या हॉवित्झर तोफेपुढे कमी पडणार आहेत.   अमेरिका आणि इस्त्रायल यांची सैन्य हत्यारांच्या निर्मितीमधील मक्तेदारीही या हॉवित्झर तोफांमुळे कमी होणार आहे.  

====

हे देखील वाचा – ऑस्ट्रेलियात स्वास्तिकवर का घातलीय बंदी? जाणून घ्या हिटरचे हिंदू धर्मासोबत होते कनेक्शन?

====

पंतप्रधानांनी केलं हॉवित्झर तोफेचं  (Howitzer ATAGS) कौतुक –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात या तोफांबाबत माहिती देत आत्मनिर्भर भारत मोहीमेस हातभार लावल्याबाबत आणि हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पावले उचलल्याबद्दल सशस्त्र दलाच्या जवानांचे कौतुक केले आहे. 

स्वातंत्र्य दिनी 21 तोफांच्या सलामीला खूप महत्त्व असते. स्वातंत्र्यदिनी, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर लष्करी बँडद्वारे राष्ट्रगीत वाजविले जाते.  त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाते.  वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकींची सलामी देणारी परंपरा भारताला ब्रिटिशांकडून मिळाली आहे. मात्र यावेळेच्या स्वातंत्र्यदिनी तिरंग्याला स्वदेशी तोफांकडून सलामी देण्यात आली आणि हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी खास ठरला.  

स्वदेशी शस्त्रे आणि दारूगोळा विकसित करण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचा पुरावा म्हणून ही हॉवित्झर तोफ स्वातंत्र्यदिन सोहळ्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या सलामी सोहळ्यात गोळीबार प्रशिक्षक नायब सुभेदार गुलाब वाबळे यांच्यासोबत लेफ्टनंट कर्नल गगनदीप सिंग संधू यांनी गन युनिटचे नेतृत्व केले. या समारंभासाठी ही तोफ काही तांत्रिक वैशिष्ट्ये बदलून विशेषत: अनुकूलित करण्यात आली होती. एकूण या भारतीय बनावटीच्या हॉवित्झर तोफेने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळ्याला सोनेरी झळाळी दिली हेच खरं…

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.