Home » ‘या’ चंबळ खोऱ्याच्या ठिकाणी पाहता येणार 80 डॉल्फिन

‘या’ चंबळ खोऱ्याच्या ठिकाणी पाहता येणार 80 डॉल्फिन

by Team Gajawaja
0 comment
Share

मध्यप्रदेशमधील चंबळ खोरे असे नाव घेतले तरी काही वर्षापूर्वी अनेकांना घाम फुटायचा.  चंबळ खोरे म्हणजे डाकू आणि त्यांची दहशत. पानसिंग तोमर या डाकूच्या दहशतीनं हे चंबळ खोरं प्रकाश झोतात आलं.  पानसिंगवर चित्रपटही झाले आणि पुस्तकही लिहिली गेली.  त्यापाठोपाठ निर्भय सिंग गुजर आणि फुलनदेवी या दोघांच्या दहशतीनं तर चंबळ खो-याचे नाव देश-विदेशात कुप्रसिद्ध झाले.  फुलनदेवीवरही चित्रपट झाले. पुढे फुलनदेवी खासदारही झाली.  25 जुलै 2001 रोजी खासदार झालेल्या फुलन देवीची हत्या झाली.  या चंबळ खो-याची आणि त्यातील डाकू यांची माहिती सांगण्यामागचा उद्देश असा की, आता याच चंबळ खो-याची ओळख पार बदलली आहे.  मुळात चंबळ खो-याचे नाव चंबळ नदीवरुन पडले आहे.  चंबळ नदी ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी आहे.  चंबळ नदीमुळे मध्यप्रदेश आणि राजस्थान ही दोन्हीही राज्य संपन्न झाली आहेत.  या नदीवर गांधी सागर , राणा प्रताप सागर, जवाहर सागर धरण, कोटा बॅरेज अशी चार धरणे बांधण्यात आली आहेत.  अतिशय विस्तृत पात्र असलेल्या या नदीमध्ये आता डॉल्फिनची (Dolphin) संख्या वाढत असून पर्यटकांना आकर्षित कऱण्यासाठी मध्यप्रदेश सरकार डॉल्फिन सफारीचा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरु करत आहे.  यातून चंबळ खो-याची पूर्वीची ओळख पुसून आता नवी ओळख तयार होत आहे.  

मध्यप्रदेशच्या चंबळ खो-यात एकेकाळी प्रवास करण्याचे धाडस कोणाकडे नव्हते.  चूकून या खो-यात कोणी गेला तर तो परत येईल की नाही, याची खात्री नव्हती. आता त्याच चंबळ खो-यात डॉल्फिन बघण्यासाठी हजारो पर्यटक येत आहेत. चंबळ अभयारण्यात सुमारे शंभर दुर्मिळ प्रजातींचे डॉल्फिन आहेत,  हे बघण्यासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातीलही पर्यटक मोठ्या संख्येनं येत आहेत.  चंबळ नदी ही अतिशय मोठी आहे.  या नदीच्या 20 किमी क्षेत्राचे डॉल्फिन सफारीमध्ये रूपांतर करण्यात येत आहे.  मध्यप्रदेश सरकारचा हा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.  याचे मुळ कारण म्हणजे,  चंबळ नदीच्या या भागात आढळणारे डॉल्फीन (Dolphin) हे अतिशय दुर्मिळ मानले जातात. 

चिकली टॉवर, सहंसो आणि भरेह येथे सर्वाधिक डॉल्फिन (Dolphin) आढळतात.  त्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांना बघण्यासाठीही मोठी गर्दी होते.  याच ठिकाणी पर्यटकांसाठी योग्य सुविधा दिल्या, तर या भागात येणा-या पर्यटकांची संख्या वाढणार आहे.  त्यायोगे या भागाचा विकास अधिक होईल, अशी खात्री राज्य सरकारला आहे.  डॉल्फिन अभयारण्य हा वेगळा प्रकल्प आहे.  आत्तापर्यंत भारतात अशाप्रकारचा प्रकल्प उभारण्यात आला नाही.  मात्र चंबळ नदिच्या खो-यात डॉल्फिन प्रकल्प झाल्यास त्याअनुशंगानं या भागात स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी मोठे कलानगरही उभारण्याचा प्रस्ताव आहे.  चंबळ अभयारण्यातील साहसोन परिसराची डॉल्फिन अभयारण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी सुमारे 50 ते 80 डॉल्फिन आहेत. पर्यटकांना येथे बसून डॉल्फिन पाहता येणार आहेत. 

तसेच नदी सफारीचाही आनंद घेता येणार आहे.  नुकतीच चंबळ नदीमधील डॉल्फीनची (Dolphin) मोजदाद करण्यात आली आहे.  त्यानुसार चंबळ अभयारण्याच्या बह आणि इटावा रेंजमध्ये 171 डॉल्फिनची नोंद झाली आहे. अवघ्या दहा वर्षात ही संख्या दुप्पटीनं वाढल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात येत आहे.  2012 च्या सर्वेक्षणात डॉल्फीनची संख्या 78 होती.  त्यामुळे या भागात डॉल्फीन प्रोजेक्ट झाला तर डॉल्फीनची संख्याही अधिक वाढेल, अशी आशा अधिका-यांना आहे.  राष्ट्रीय चंबळ अभयारण्य 635 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे. त्याचा विस्तार मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशपर्यंत आहे.   याच चंबळ नदीच्या क्षेत्रात 2008 पासून मगरींसाठीही सुरक्षित क्षेत्र निर्माण करण्यात आले आहे.  त्यामुळे येथील मगरींची संख्याही  2000 च्यावर पोहचली आहे.  प्रामुख्यानं गंगा नदीत आढळणारा डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे.  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 5 ऑक्टोबर 2009 रोजी डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर म्हणून घोषित केले होते.

==========

हे देखील वाचा : प्रियंका चोपडाने सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली? गदर-2 च्या दिग्दर्शकांनी सांगितले सत्य

==========

तेव्हापासून दरवर्षी 5 ऑक्टोबर हा राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन अंतर्गत गंगा डॉल्फिन दिवस म्हणून साजरा केला जातो.  देशातील एकूण नद्यांमध्ये जेवढे डॉल्फीन (Dolphin) आहेत, त्याच्या जवळपास अर्धे डॉल्फीन एकट्या चंबळ नदीमध्ये आहेत.  हा प्रकल्प सुरु झाल्यावर कुख्यात डाकूंच्या दहशतीनं कापणारा चंबळ खो-याचा सर्व भाग नव्यानं प्रकाशझोतात येणार आहे.  मात्र आता त्याची ओळख वेगळी असेल.  डाकूंच्या दहशतीपासून सुरु झालेला चंबळ खो-याचा प्रवास डॉल्फिन प्रोजेक्टसारख्या अनोख्या प्रकल्पापर्यंत आला आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.