आपण छान दिसावं…आपला चेहरा छान असावा…केस सुंदर…घनदाट असावेत…कुठलाही रंग न लावता ते काळेभोर असावेत…चेहऱ्यावर सुरकुत्या नसाव्यात… अशी आपली सौदर्यांबाबतची अपेक्षा असते. महिला-पुरुष सर्वांनाच आपण सुंदर, देखणं दिसावं असं वाटत असतं. त्यासाठीच तर सौदर्यप्रसाधनांचा वापर करण्यात येतो. मात्र अनेकवेळा याच सौदर्यप्रसाधनांच्या अतिरिक्त वापरामुळे चेहऱ्याचे आणि केसांचेही सौदर्य बिघडू शकते. अशावेळी योगासनांचा आधार घेतल्यास अगदी सौदर्यप्रसाधने न वापरताही चेहरा उजळल्याचे लक्षात येते. शिवाय केसही काळेभोर होतात.(Yoga for fitness)
योगसाधनेचा नियमित सराव केल्यास फक्त ठराविक तासांसाठी नाही, तर दीर्घकाळासाठी सौदर्यांचे वरदान प्राप्त होते. व्याघ्रासन, हलासन, सर्वांगासन, मत्स्यासन, शीर्षासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, उष्ट्रासन या आसनांमुळे चेहऱ्याचाही व्यायाम होतो आणि त्याचा केसांनाही चांगला फायदा होतो. (Yoga for fitness)
व्याघ्रासन
‘व्याघ्रासन’ हे बैठकस्थितीमधील आसन आहे. वज्रासनाच्या स्थितीत बसून हाताचे पंजे पुढे ठेवायचे. बोटांवर दाब देत हे पंजे वाघाच्या पंजासारखे जमिनीत घट्ट पकडायचे आणि चेहरा ताणायचा. डोळे मोठ्ठे करायचे. तोंडाचा जबडा उघडून जेवढी जिभ जेवढी बाहेर येईल तेवढी काढायची. व्याघ्रासनामुळे सर्व चेहऱ्यावर ताण पडतो. त्यामुळे हनुवटीखाली जमलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत होते. तसेच ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे, त्यांनाही या आसनाचा फायदा होतो.
हलासन

त्वचेला तकाकी देणारे आसन म्हणजे ‘हलासन’. हे आसन कठीण वाटत असले तरी ते सरावाने सहज जमते. पाठीवर झोपून दोन्ही पाय एकमेकांना चिकटवून वर काटकोनात उचलायचे आणि तिथून ते जितके शक्य असतील तसे डोक्याच्या मागे न्यायचे. पायाची बोटं डोक्याच्या मागे लागतील इकता ताण द्यायचा. या आसनांमुळे दुहेरी फायदा होतो. पोटाची घडी पडत असल्यामुळे पोटाचे स्नायूही बळकट होतात. त्यावरील अतिरिक्त चरबी कमी होते आणि पोट साफ होण्यासही मदत होते. (Yoga for fitness)
सर्वांगासन
सर्वांगावर ताण देणारे आसन म्हणजे सर्वांगासनही फायदेशीर आहे. दोन्ही पाय कंबरेपासून वर उंचावून ठेवले जातात. यामुळे चेहऱ्याच्या दिशेने रक्तपुरवठा होतो. त्वचेवर सुरकुत्या असतील, डाग असतील तर सर्वांगासनामुळे ते कमी होतात. तसेच केसांनाही त्याचा फायदा होतो.
मस्त्यासन

शरीराचा माशासारखा रेखीव आकार कोणाला आवडणार नाही? यासाठी मस्त्यासन उपयुक्त ठरते. साधारण हलासन आणि सर्वांगासनापाठोपाठ मस्त्यासन केले जाते. शरीरावर ताण आणि दाब या क्रिया गरजेच्या असतात. म्हणूनच या दोन आसनांपाठोपाठ मस्त्यासन केले जाते. पाठीवर झोपून पायांना पद्मासनाच्या स्थितीत घ्यायचे आणि हातांनी पायांची बोटं पकडायची आणि शरीर डोक्याच्या मदतीने उचलायचे, पण डोके जमिनीला टेकवून ठेवायचे. एकदम झटका देऊन हे आसन करायचे नाही आणि सोडायचेही नाही. मत्स्यासनामुळे पोटावर ताण पडतो. पचनक्रीया सुधारते आणि मासिकपाळीच्या काळात होणाऱ्या वेदनांमध्येही आराम मिळतो. मत्स्यासन नियमित केल्यास त्वचेच्या पिंपल्स, पुरळ या समस्या कमी होण्यास मदत होते. (Yoga for fitness)
शीर्षासन
सर्वात अवघड आसन म्हणून शीर्षासनाचा उल्लेख केला जातो. यामध्ये संपूर्ण शरीर डोक्यावर तोलायचे असते. शरीराचा भार उचलणे सोप्पे नसते, त्यामुळेच हे आसन कठीण मानले जाते. पण हे आसन जेवढे कठीण तेवढेच फायदेशीरही आहे. विशेषतः चेहऱ्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी शीर्षासन वरदान ठरते. शीर्षासन भींतीच्या सहाय्याने किंवा दाराच्या चौकटीच्या सहाय्यानेही करता येते. खाली डोकं वर पाय असं हे आसन असल्यामुळे चेहऱ्याकडे अधिक प्रमाणात याचा रक्तपुरवठा होतो.
====
हे देखील वाचा – उत्तम आरोग्यासाठी लहान मुलांना ‘अशाप्रकारे’ घरच्या घरी शिकवा योगासनं…
====
भुजंगासन
या आसनामुळेही शरीराला बराच फायदा होतो. मानेचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे ज्यांना डबलचीनची समस्या जाणवते, त्यांनी भुजंगासन नियमीत केल्यास त्यांची ही समस्या दूर होते. शिवाय पोट आणि पाठीच्या विकारांसाठी अत्यंत गुणकारी असे हे आसन आहे. (Yoga for fitness)
पवनमुक्तासन

पोटासंदर्भात असलेले आणखी एक आसन म्हणजे पवनमुक्तासन. या आसनाचे अनेक फायदे आहेत. पाय, मांड्या, नितंब यांच्यावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
उष्ट्रासन

चेहऱ्याच्या सौदर्यात भर घालणारे आणखी एक आसन म्हणजे उष्ट्रासन. यामध्ये आपल्या शरीराचा आकार उंटासारखा होतो, म्हणून या आसनाला उष्ट्रासन म्हणतात. हे आसन करताना गुडघ्यावर बसून दोन्ही हात मागे पायाच्या टाचेला लावले जातात. या आसनामुळे तुमच्या त्वचेच्या पेशींना ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा होतो. त्यामुळे त्वचेला तकाकी येते. (Yoga for fitness)
यासोबतच ‘फेस योगा’ हा प्रकारही सध्या प्रचलीत होत आहे. यामध्ये डोळे, ओठ, गाल यांच्या ठराविक हालचाली केल्या जातात. फेस योगा केल्यामुळे वार्धक्याच्या खुणा कमी होण्यास मदत मिळते. फेसयोगा हा कुठेही बसल्या जागी अगदी सहज पद्धतीने करता येतो. हा प्रकार कधीही करता येण्यासारखा आहे. अगदी आपण टीव्ही बघतही फेसयोगा करु शकतो. मुळात माध्यमं अनेक आहेत, मात्र आपण त्यांचा कशापद्धतीनं वापर करतो, हे महत्त्वाचे आहे.
– सई बने