Home » Drake Passage : धरती पुन्हा हादरली….त्सुनामीचा धोका !

Drake Passage : धरती पुन्हा हादरली….त्सुनामीचा धोका !

by Team Gajawaja
0 comment
Drake Passage
Share

दक्षिण अमेरिकेतील ड्रेक पॅसेज येथे 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. चिलीस्थित नेव्हल हायड्रोग्राफिक अँड ओशनोग्राफिक सर्व्हिसने चिलीच्या अंटार्क्टिक प्रदेशासाठी त्सुनामीचा इशारा जारी केला. शुक्रवारी पहाटे झालेल्या या भूकंपाची तीव्रता सुरुवातीला 8.0 रिश्टर स्केल असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु नंतर युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनं हा भूकंप 7.5 रिश्टर स्केलचा असल्याचे सांगितले. हा भूकंप समुद्रात 11 किमी खोलीवर झाला आहे. शुक्रवारी पहाटे आलेल्या तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनी दक्षिण अमेरिका हादरली. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, सुमारे 57000 लोकसंख्या असलेल्या दक्षिण अर्जेंटिना शहर उशुआइयापासून 700 किमी आग्नेयेस भूकंप झाला. तीव्र भूकंपानंतर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन संस्थांनी किनारी भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला. (Drake Passage)

दक्षिण चिली आणि अर्जेंटिनाच्या काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, चिली आणि अर्जेंटिनाच्या किनाऱ्यापासून सहा मैल खोलीवर भूकंप झाला. भूकंपानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. भारतीय वेळेनुसार सकाळी 7.46 वाजता हा भूकंप नोंदवण्यात आला. जिथे भूकंप आला तो ड्रेक पॅसेजचा परिसर अतिशय संवेदनशील मानला जातो. ड्रेक सामुद्रधुनी हे दक्षिण अमेरिकेतील हॉर्न केप आणि अंटार्क्टिकाच्या दक्षिण शेटलँड बेटांमधील समुद्री क्षेत्र आहे. हे क्षेत्र पूर्वेकडील अटलांटिक महासागराला पश्चिमेकडील प्रशांत महासागराशी जोडते. ड्रेक सामुद्रधुनीची रुंदी किमान 800 किमी आहे. हा जगातील सर्वात धोकादायक समुद्री प्रवाहांपैकी एक आहे. येथे जोरदार वारे, उंच लाटा आणि अस्थिर समुद्री क्रियाकलाप दिसतात. भूकंप किंवा भूकंपाच्या हालचाली झाल्यास, या भागातून त्सुनामीसारख्या आपत्तींचा धोका आणखी वाढतो. या भागात दररोज हलक्या भूकंपाचे धक्के जाणवतात. मात्र अलिकडच्या काळात या भूकंपाची तीव्रता वाढली आहे. (International News)

वारंवार येणा-या या भूकंपामुळे भूगर्भशास्त्रज्ञांना चिंतेत टाकले आहे. इंडोनेशियामध्ये 17 ऑगस्ट 2025 रोजी मध्य सुलावेसी प्रांतात 5.8 तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप पोसो जिल्ह्यापासून 15 किमी अंतरावर नोंदवण्यात आला. चिंतेची गोष्ट म्हणजे, भूकंपानंतर 15 हून अधिक आफ्टरशॉक जाणवले. त्याच वेळी, 30 जुलैमध्ये रशियाच्या कामचटका प्रांतात 8.8 तीव्रतेचा भूकंप आला. आतापर्यंत नोंदवलेल्या सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी हा एक भूकंप ठरला. यामुळे जपान आणि अलास्कामध्ये त्सुनामीच्या लाटा आल्या आणि पॅसिफिक महासागराच्या आसपासच्या लोकांना सतर्क राहण्यास किंवा उंच ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. आधुनिक इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंपांमध्ये या भूकंपाची गणना झाली आहे. या भूकंपानंतर हवाई, उत्तर आणि मध्य अमेरिका आणि न्यूझीलंडच्या दक्षिणेकडील पॅसिफिक बेटांवर इशारा जारी केला होता. त्यामुळे भविष्यात असे मोठे भूकंप आले तर अर्ध्याअधिक जगावर त्सुनामीचे संकट येणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. (Drake Passage)

अलिकडच्या काही वर्षात अमेरिकेमध्ये येणा-या भूकंपामध्ये झालेली वाढही तज्ञांना त्रस्त करणारी आहे. या महिन्याच्या एका तारखेला अमेरिकेत भूकंप झाला. कॅलिफोर्नियातील फर्न्डेल येथे 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी अलास्कातील होबार्ट बे येथे 5.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. 12 ऑगस्ट रोजी न्यू मेक्सिकोतील व्हाईट्स सिटी येथे 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत भविष्यात आणखी काही तीव्र भूकंप येऊ शकतात का याचा अभ्यास करण्यात येत आहे. (International News)

हे भूंकप या भागात कसे होतात, हे जाणून घेऊयात, पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत राहतात. ज्या झोनमध्ये या प्लेट्स अधिक आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. वारंवार टक्कर झाल्यामुळे प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जास्त दाब निर्माण होऊन प्लेट्स तुटू लागतात. यानंतरच भूकंप होतो. जर रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप झाला तर भूकंपाचा धक्का आसपासच्या 40 किमी त्रिज्येत तीव्र धरला जातो. भूकंपाची चाचणी रिश्टर स्केलने केली जाते. त्याला रिश्टर मॅग्निट्यूड टेस्ट स्केल म्हणतात. रिश्टर स्केलवर, भूकंप 1 ते 9 च्या आधारे मोजला जातो. भूकंप त्याच्या केंद्रापासून म्हणजेच केंद्रापासून मोजला जातो. भूकंपादरम्यान पृथ्वीच्या आतून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तीव्रता यावरून मोजली जाते. या तीव्रतेवरून भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता अंदाजे काढली जाते. 0 ते 1.9 रिश्टर स्केलचा भूकंप फक्त भूकंपमापकानेच कळू शकतो. (Drake Passage)

=========

North Korea : जन्मलेलं मुलं देशद्रोही, या देशाचे नियम म्हणजे…

=========

2 ते 2.9 भूकंपामध्ये सौम्य कंपन जाणवतात. 3 ते 3.9 भूकंप झाल्यास आपल्याला एखादे वाहन जवळून गेल्याचे जाणवते. 4 ते 4.9 भूंकपाच्या धक्क्यात घराच्या खिडक्या तुटू शकतात आणि भिंतींवर लटकलेल्या फ्रेम खाली पडू शकतात. 5 ते 5.9 भूकंपामध्ये फर्निचर हादरू शकते. 6 ते 6.9 भूकंपाच्या धक्यानं इमारतींना तडे जाऊ शकतात. तर 7 ते 7.9 भूकंपाने इमारती कोसळण्याचा धोका असतो. यापेक्षा अधिक मोठा, म्हणजे, 8 ते 8.9 तीव्रतेचा भूकंप झाल्यास इमारतींसह पूलही कोसळतात, आणि या तीव्रतेच्या भूकंपाला त्सुनामीचा इशारा देण्यात येतो. अर्थात त्यावरील भूकंप झालाच तर हा अतीविनाशकरी भूकंप ठरणार आहे. 9 किंवा त्याच्या पुढे भूकंपाची नोंद झालीच तर जो विनाश होईल, त्याची कल्पनाही करता येणार नाही, असे तज्ञांचे मत आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.