गाजराला हिवाळ्यातील सुपरफूड म्हटलं जातं कारण गाजर पोषकतत्वांनी परिपूर्ण असतं. गाजर खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते. यामुळे नेत्रदोष दूर करण्यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि ई ही जीवनसत्वे असतात.
गाजराचा फायदा फक्त डोळ्यांनाच होतो असं नाही, तर आपल्या संपूर्ण शरीरासाठी गाजर खाणं अथवा गाजराचा रस पिणं फायद्याचं आहे. विशेषत: हिवाळ्यात गाजराचं नियमित सेवन केल्याने शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात.
१. शरीराला फायबरचा पुरवठा
गाजरात मोठ्या प्रमाणात फायबर आढळतं. गाजर चाऊन खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. यामुळे बद्धकोष्टता आणि गॅससारख्या समस्या दूर होतात. गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने त्वचा देखील तजेलदार होते.

२. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गाजर खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीरात अँटीबॉडीज तयार करायला मदत करतं, ज्या आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. व्हिटॅमिन सी आपल्या शरीराची लोहाची म्हणजेच आयर्नची गरज भागवण्यात मदत करतं आणि बाह्यसंक्रमणापासून शरीराचा बचाव करतं.
=====
हे देखील वाचा: थंडीमुळे त्वचा कोरडी होऊन काळवंडलिये? उजळ त्वचेसाठी करा हे ६ उपाय (Winter care tips)
=====
३. रातांधळेपणाचा त्रास होत नाही
गाजर खाल्ल्याने रातांधळेपणाचा त्रास होत नाही, तसंच दृष्टी सुधारण्यासही मदत होते. गाजरात असलेल्या बीटा कॅरोटीनचा फायदा दृष्टी सुधारण्यास होतो. गाजराच्या सेवनानंतर या बीटा कॅरोटीनचं रुपांतर व्हिटॅमिन ए मध्ये होतं.
४. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
गाजर हृदयासाठीही खूप फायदेशीर असतं. त्यांच्यातील अँटी-ऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम कार्य करतात. गाजरात आढळणारे फायबर्स वजन नियंत्रणात ठेवायला मदत करतात आणि हृदयविकारांना दूर ठेवतात. गाजरात असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

५. वजन वाढत नाही
थंडीत गाजराचं सेवन केल्याने शरीरात उब राहते. गाजरामुळे वजन वाढत नाही. गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोहाचं प्रमाण अधिक असतं. त्यांचं नियमित गाजराचं सेवन केल्याने ॲनिमियासारखे आजार दूर होतात.
=====
हे देखील वाचा: घरी बसून जाणून घ्या तुम्ही रोगी आहात की निरोगी! करा फक्त ‘या’ तीन गोष्टी…
=====
६. डायबिटीजवर (मधुमेह) नियंत्रण
गाजरातील फायबर रक्तातील राखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे मधुमेहसुद्धा नियंत्रणात राहतो. गाजरातील व्हिटॅनिम ए आणि बीटा कॅरोटीन देखील मधुमेहाची शक्यता कमी करतं. मधुमेहाच्या रुग्णांनी गाजरासह इतर पिष्टमय पदार्थांचा समावेश दैनंदिन आहारात करावा.
विविध पोषणतत्वांनी परिपूर्ण असलेल्या गाजराचं हिवाळ्यात सेवन केल्याने त्यातून अनेक पोषकतत्वं मिळतात. तुम्ही गाजराची खीर, कोशिंबीर, हलवा, वड्या बनवून त्यांचा आहारात समावेश करु शकता.
टीप : ही प्राथमिक माहिती आहे. कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.
– वेदश्री ताम्हणे