Home » गेल्या 25 वर्षात कोणीही मोडू शकला नाही निलेश कुलकर्णी यांचा ‘तो’ विक्रम…

गेल्या 25 वर्षात कोणीही मोडू शकला नाही निलेश कुलकर्णी यांचा ‘तो’ विक्रम…

by Team Gajawaja
0 comment
Nilesh kulkarni
Share

ऑगस्ट १९९७, भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना.. ठिकाण कोलंबो.. भारताचा कॅप्टन होता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. याच कसोटीमध्ये आपल्या कारकिर्दीमधली पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणाऱ्या एका मराठमोळ्या गोलंदाजाने पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला. या गोलंदाजाचं नाव होतं निलेश कुलकर्णी (Nilesh Kulkarni). निलेश यांचा विक्रम आजपर्यंत कोणताही खेळाडू मोडू शकला नाहीये. 

निलेश कुलकर्णी (Nilesh Kulkarni) यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पदार्पण संस्मरणीय ठरलं होतं. या कसोटी सामन्यात त्यांनी पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा फलंदाज मर्वान अटापट्टूला बाद केलं. आज त्या रेकॉर्डला २५ वर्ष पूर्ण झाली. थोडक्यात निलेश यांच्या रेकॉर्डचे हे ‘रौप्य महोत्सवी’ वर्ष आहे. इतकी वर्ष होऊनही त्यांचा रेकॉर्ड कोणताही खेळाडू मोडू शकला नाही, ही खरंच विशेष बाब आहे. 

 

निलेश यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कारकीर्द फार मोठी नसली तरी आठवणीत राहणारी नक्की आहे. त्यांनी भारताकडून तीन कसोटी आणि १० वन डे सामने खेळले आहेत. परंतु देशांतर्गत सामन्यांमध्ये मात्र त्यांनी चांगलीच चुणूक दाखवली आहे. निलेश यांनी त्यांच्या कारकीर्दीत १०१ प्रथमश्रेणी सामने खेळले असून त्यामध्ये एकूण ३५७ बळी घेतले आहेत ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये १३५ तर, टी २० क्रिकेटमध्ये ८ बळी त्यांच्या नावावर जमा आहेत. पुढे २०१० साली त्यांनी त्यांनी आपली निवृत्ती जाहीर केली. 

निलेश कुलकर्णी (Nilesh Kulkarni) यांचं क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. खेळ म्हणजे जणू त्यांचा श्वास आहे. त्यामुळे निवृत्तीपश्चातही खेळाच्या दुनियेशी संलग्न राहण्यासाठी त्यांनी एक आगळेवेगळे माध्यम निवडलं. २०१० साली त्यांनी त्यांची पत्नी रसिका कुलकर्णी यांच्यासह खेळाशी संबंधित आयआयएसएम (IISM- International Institute of Sports Management) या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू महेश भूपती, ग्रुप M चे स्पोर्ट्स अँड एंटरटेन्मेन्ट हेड विनीत कर्णिक, बीसीसीआयचे रत्नाकर शेट्टी, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी नामदेव शिरगावकर, इ विविध क्षेत्रांतील अनेक मोठमोठ्या व्यक्ती या संस्थेचे सल्लागार आहेत.

====

हे देखील वाचा  – ‘लेडी कॅप्टन कूल’ कोण आहे माहीतेय का ?

====

निलेश कुलकर्णी (Nilesh Kulkarni) हे आयआयएसएम संस्थेचे संस्थापक आणि संचालक आहेत. आयआयएसएम ही क्रीडा क्षेत्रातील अत्यंत नामांकित संस्था असून यामध्ये स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ या विषयासाठीचे बॅचलर आणि मास्टर्स अभ्यासक्रम प्लेसमेंट सुविधेसह उपलब्ध आहेत. UGC इंडिया आणि भारताचे शिक्षण मंत्रालय क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी BSS, MSS, BSM आणि MSM ही नवीन कोर्स नामांकन स्वीकारत आहे. 

निलेश यांच्या या शैक्षणिक संस्थेची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आणि २०२० साली त्यांच्या ‘आयआयएसएम या संस्थेला ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’ देण्यात आला. हा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता. सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी निलेश यांना खास आमंत्रणही देण्यात आलं होतं. 

निलेश कुलकर्णी सध्या क्रीडा क्षेत्रातील नामांकित संस्थांमध्ये जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत. 

  • राष्ट्रीय क्रीडा शिक्षण मंडळ समिती, दिल्ली – सदस्य 
  • आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र – सल्लागार
  • FICCI क्रीडा आणि युवा व्यवहार समिती – सदस्य
  • CII स्पोर्ट्सकॉम इंडस्ट्री कॉन्फेडरेशन – सदस्य

एका मुलाखतीमध्ये बोलताना निलेश यांनी सांगितलं, “आयुष्यामधली टोकाची अनिश्चितता मी पदार्पणाच्या सामन्यातच अनुभवली आहे. पहिल्याच चेंडूवर मला विकेट मिळाली, पण पुढचे तीन दिवस मला दुसरी विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.” 

कोलंबो मधला तो कसोटी सामना तसा बऱ्याच कारणांनी गाजला. याच सामन्यात सनथ जयसूर्यानं  त्रिशतक झळकवलं होतं. श्रीलंकेने धावांचा डोगर रचला होता. तरीही हा सामना लक्षात राहतो तो निलेश यांच्या रेकॉर्डसाठीच! 

– मानसी जोशी 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.