राजस्थानमधील जोधपूरमधून एक खास सजलेली बैलांची गाडी रवाना झाली आहे. ही बैलगाडी उत्तरप्रदेशच्या अयोध्या येथे जाणार आहे. या खास बैलगाडीमध्ये एक विशेष प्रकारचे तूप आहे. हे तूप गेली वीस वर्ष फक्त प्रभू श्रीरामांच्या आरतीसाठी साठवण्यात येत आहे. जोधपूरच्या श्री श्री महर्षी सांदीपनी राम धर्म गोशाळा येथील हे तूप आहे.
महंत महर्षी सांदिपनी महाराज या गोशाळेचे प्रमुख आहेत. अयोध्येत जेव्हा राम मंदिर बांधले जाईल, तेव्हा शुद्ध देशी गाईचे तूप घेऊन जाऊ, असा संकल्प करीत गेली 20 वर्ष संदिपनी महाराज यांनी या तुपाची साठवणूक केली आहे. मुख्य म्हणजे, गोहत्येसाठी नेत असलेल्या 60 गायींची त्यांनी सुटका केली. या गायींना सांभाळण्यासाठी त्यांनी गोशाळा सुरु केली. तेव्हाच हा संकल्प केला असून तूप साठवायला सुरुवात केली. (Prabhuram)
20 वर्षापूर्वी, महंत संदिपनी महाराज यांची या संकल्पावरुन अनेकांना चेष्टा केली आहे. पण जेव्हा अयोध्येत प्रभूरामचंद्रांचे भव्य मंदिर उभारण्यास सुरुवात झाली, तेव्हा त्यांची चेष्टा करणा-यांनीही तुपाचा साठा करण्यासाठी मदत केली. आता हेच 600 किलो तूप, 108 शिवलिंग आणि गणेशाची मुर्ती असे घेऊन एक सजवलेली बैलगाडी अयोध्येला रवाना झाली आहे. 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामचंद्रांची भव्य मंदिरातील पहिली आरती याच तुपानं होणार आहे.
जोधपूरहून अयोध्येला तूप पाठवण्यासाठी विशेष यात्रा काढण्यात आली आहे. ही घृत-रथयात्रा जोधपूर, जयपूर, भरतपूर, मथुरा, लखनौमार्गे अयोध्येला पोहचणार आहे. ही यात्रा ज्या मार्गावरुन जाणार आहे, तेथील प्रमुख गावांमध्ये यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच जिथे मुक्काम असेल तिथे विशेष कार्यक्रमही होणार आहेत. हा तुपाचा रथ जेव्हा जोधपूरहून निघाला तेव्हा हजारो रामभक्त उपस्थित होते. त्यांनी या तुपाच्या कलशाची आरती करुन रामनामाचा जयघोष केला. (Prabhuram)
या भव्य अशा रथ वजा बैलगाडीमध्ये 600 किलो तूप असून ते 108 कलशांमध्ये ठेवण्यात आले आहे. या रथासोबत जोधपूरचे अनेक रामभक्तही अयोध्येला रवाना झाले आहेत. या बैलगाडीमध्ये तुपाच्या कलशांसह 108 शिवलिंग, श्रीगणेश आणि रामभक्त हनुमान यांच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत.
या सर्वामागे श्री श्री महर्षी सांदीपनी राम धर्म गोशाळा आणि आश्रमाचे प्रमुख महंत महर्षी सांदीपनी महाराज यांची श्रद्धा आहे. जोधपूरच्या बनारजवळ जयपूर रोडवर ही प्रसिद्ध गोशाळा आहे. महंत महर्षी सांदिपनी महाराज गेली अनेक वर्ष ही गोशाळा आणि आश्रम चालवत आहेत. 2014 साली जोधपूरहून गोहत्येसाठी नेत असलेल्या गायींनी भरलेला ट्रक महंत सांदीपनी महाराज यांनी अडवून ट्रकमधील 60 गायींची सुटका केली. या गायींना त्यांनी गोशाळा चालकांकडे दिले. पण त्यांनी जागेअभावी गायी ठेवण्यास नकार दिला. तेव्हा महंत सांदीपनी महाराज यांनी स्वतः गोशाळा सुरू करून या गायींचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला. (Prabhuram)
याचवेळी सांदीपनी महाराज यांनी अयोध्येत जेव्हाही राम मंदिर बांधले जाईल, तेव्हा देशी गाईचे तूप घेऊन अयोध्येला जाणार असा संकल्प केला. यावरुन स्थानिकांनी त्यांची चेष्टा केली. पण सांदीपनी महाराज यांनी त्या 60 गायींच्या दुधातून तूप गोळा करण्यास सुरुवात केली. लोकांकडून सुरु असलेल्या टिकेकडे दुर्लक्ष करीत त्यांनी आपला संकल्प सुरुच ठेवला.
2016 मध्ये महाराजांच्या संकल्पाचे गांभीर्य लक्षात आल्यावर स्थानिकांनी त्यांना मदत करायला सुरु केली. राममंदिराचे काम सुरु झाल्यावर परिसरातील अनेकांनी आपल्याकडीलही तूप महारांजांकडे आणण्यास सुरुवात केली. या तुपाची साठवणूक करतांना महाराज सांदीपनी यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. सुरुवातीला ज्या भांड्यात तुप गोळा करण्यात येत होते, ते उष्णतेमुळे वितळून भांड्यातून बाहेर पडायचे. त्या भांड्यांना भेगाही पडून तूप खराब झाले आहे. मग यावर सांदीपनी महाराज यांनी काही संतांबरोबर चर्चा केली. (Prabhuram)
तेव्हा त्यांच्यकडून पाच वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा रस वापरून तूप अनेक वर्षे सुरक्षितपणे साठवता येते, याची माहिती मिळाली. त्यानंतर स्वतः महाराजांनी हरिद्वारला जाऊन ब्राह्मी आणि सुपारीच्या पानांसह इतर औषधी वनस्पती आणल्या. त्यांचा रस तूप कढवतांना त्यात टाकण्यात येऊ लागला. हे तूप मोठ्या टाक्यांमध्ये 16 अंश तापमानात ठेवण्यात आले. त्यासाठी विशिष्ट यंत्रणा उभारली. याबरोबरच तुपाची शुद्धता राखण्यासाठी गायींच्या आहारातही बदल करण्यात आला.
==============
हे देखील वाचा : ‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ साठी आलियाच्या कास्टला सिद्धार्थ, वरुण धवनने दिला होता नकार
==============
ज्या गायींच्या दुधाचा तुपासाठी वापर होतो त्यांना हिरवा चारा, कोरडा चारा देण्यात येतो. या गायींना बाहेरून आणलेली कोणतीही वस्तू खायला देण्यास बंदी घालण्यात आली. संदिपनी महाराज ही गोशाळा सुरु केली तेव्हा गायींची संख्या 60 होती. आता ती 350 झाली आहे. यापैकी बहुतांश गायी या रस्त्याच्या अपघातात बळी पडलेल्या किंवा आजारी पडल्यामुळे सोडून देण्यात आलेल्या गायी आहेत. (Prabhuram)
या गायींपासून तुपाची साठवणूक करतांना अनेक स्थानिकांनीही महारांजांना तूप आणून दिले आहे. या तुपाला पुन्हा कढवून त्याची शुद्धता करण्यात आली आहे. आता हेच गायीचे 600 किलो तूप प्रभू रामांच्या आरतीसाठी रवाना झाले आहे.
सई बने.