Home » २ टनचा उपग्रह पृथ्वीवर कोसळणार

२ टनचा उपग्रह पृथ्वीवर कोसळणार

by Team Gajawaja
0 comment
ERS-2
Share

कच-याची समस्या फक्त पृथ्वीवरच नाही तर अवकाशातही गंभीर स्वरुपाची झाली आहे. अवकाशात उपग्रह, अंतराळयान, रॉकेट, बॅटरी आणि तंत्रज्ञानाचे जुने तुकडे हे कच-याच्या स्वरुपात आहेत. तसाच एक मोठा कचरा येत्या काही दिवसात पृथ्वीकडे झेपावण्याची शक्यता आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचा सर्वात महत्वकांक्षी उपग्रह ERS-2 आता बाद झाला आहे. म्हणजेच हा उपग्रह आता कार्यन्वयीत नसून त्याचे कच-यात रुपांतर झाले आहे. या उपग्रहाचा कचरा आता पृथ्वीवर आणण्यात येणार आहे. हा कचरा शक्यतो समुद्रात पडणार आहे. मात्र उपग्रहांचा दादा असलेल्या या उपग्रहाचा कचरा अत्यंत मोठा आहे, जर तो पृथ्वीवर समुद्राव्यतिरिक्त अन्य कुठेही पडला तर मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती युरोपियन स्पेस एजन्सीच्या संशोधकांना आहे. या सर्व योजनेला त्यांनी स्पेस सॅटेलाइट फॉलिंग असे नाव दिले आहे.(ERS-2)

पुढच्या काही दिवसात अवकाशातील सर्वात मोठा कचरा पृथ्वीवर येणार आहे. हा कचरा म्हणजे, काम करत नसलेल्या उपग्रहांचा आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचा ERS-2 हा उपग्रह 1995 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. या (ERS-2) उपग्रहाची 2011 पर्यंत शास्त्रज्ञांना संशोधनात मदत केली. मात्र आता हा उपग्रह काम करत नसून तो गेली काही वर्ष असाच अंतराळात फिरत होता. त्या उपग्रहाला आता पृथ्वीवर आणण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांत पूर्णपणे उपग्रह पृथ्वीवर पडणार आहे. साधारण दोन टन वजनाचा हा उपग्रह समुद्रात पडेल अशी अपेक्षा शास्त्रज्ञांना आहे. मात्र त्या व्यतिरिक्त तो कुठेही पडला तर त्या सर्व भागाचे मोठे नुकसान होईल, अशी भीतीही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

ERS-2 या उपग्रहानं पृथ्वी निरीक्षण क्षमता आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2011 मध्ये त्याचे कामकाज बंद झाले. तेव्हापासून हा उपग्रह हळूहळू पृथ्वीच्या जवळ येऊ लागला. आता पृथ्वीच्या वातावरणात हा उपग्रह कधीही प्रवेश करणार आहे. उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात आला की, तो हवेत जळू लागेल. (ERS-2) दोन टन वजनाच्या या उपग्रहाची ही अवस्था पृथ्वीसाठी सर्वात महत्त्वाची असते. शक्यतो या उपग्रहाचे मजबूत तुकडे पृथ्वीच्या वातावरणात येऊनही अत्यंत उष्णतेमध्ये टिकून राहतील. परंतु हे तुकडे लोकवस्तीच्या भागात पडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. हा उपग्रह जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पडणार आहे. परंतु पृथ्वीचा बराचसा भाग समुद्राने व्यापलेला आहे. अशा परिस्थितीत या उपग्रहाचा जळालेला भाग समुद्रात पडण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजेच ESA च्या पृथ्वी निरीक्षण ग्राउंड सेगमेंट विभागाचे मिर्को अल्बानी यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की अंतराळातून पृथ्वीवर येतांना या उपग्रहाचे कोणतेही तुकडे हे किरणोत्सर्गी किंवा विषारी नसतील.

युरोपियन स्पेस एजन्सीने 1990 च्या दशकात दोन जवळजवळ एकसारखे पृथ्वी रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित केले. जमीन, महासागर आणि हवेतील बदलांचा मागोवा घेण्यासाठी अनेक उपकरणे असलेला हा उपग्रह सर्वात चांगल्या तंत्रज्ञानाचा आणि प्रगत असाच होता. या उपग्रहामार्फत पुराचे निरीक्षण करण्यात आले. महाद्वीप आणि महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कसे आहे, बर्फाच्या क्षेत्राची हालचाल, भूकंपाच्या वेळी जमिनीची हालचाल याचीही माहिती या उपग्रहामार्फत मिळाली होती. ERS-2 विशेषतः पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोन थराचे मूल्यांकन करण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आला होता, आणि हे काम चोखपणे या उपग्रहानं केले.

=========

हे देखील पाहा : ‘हे’ आहे तरंगणारे एकमेव सरोवर

=========

या(ERS-2) उपग्रहाला दादा उपग्रह असेही कौतुकानं म्हटले जात होते. आता याच दादा उपग्रहाचा कचरा जेव्हा पृथ्वीवर परत येणार आहे, तेव्हा तमाम पृथ्वीवासीयांना त्याच्यापासून धोका निर्माण झाला आहे. या उपग्रहाच्या पृथ्वीवर परत आणण्याच्या प्रयत्नांवरुन नव्यानं अंतराळात वाढलेल्या मानवनिर्मित कच-याची चर्चा सुरु झाली आहे. हा कचरा भविष्यात मानवाला सर्वात धोकादायक ठरणार आहे. 30 वर्षांत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांच्या आकडेवारीनुसार, येत्या काही वर्षांत त्यांच्या पृथ्वीवर येण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. याचा थोडा जरी भाग पृथ्वीवरील मानवी वस्तीमध्ये पडला तर मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

सई बने.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.