पशुपतीनाथ मंदिर (Pashupatinath Temple) हे नेपाळमधील सर्वात जुने हिंदू मंदिर आहे. जगात दोन पशुपतीनाथ मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यातील एक काठमांडू येथे आहे आणि दुसरे भारतात मंदसौर येथे आहे. या दोन्ही मंदिरातील शिवपिंडींचा आकार सारखाच आहे. पण नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिर हे शिवभक्तांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. भगवान शंकराचे जागृत निवासस्थान असलेल्या या मंदिराला एकदा तरी भेट देण्याची जगभरातील शिवभक्तांची इच्छा असते. त्यामुळे पशुपतीनाथ मंदिरात (Pashupatinath Temple) भक्तांची बाराही महिने गर्दी असते. मात्र हेच प्रसिद्ध मंदिरे सध्या वादात सापडले आहे. या वादामुळे मंदिर बंदही ठेवायला लागले आहे. कारण या मंदिराच्या गाभा-यात लावलेल्या शंभर किलो सोन्यापैकी जवळपास दहा किलो सोने गायब झाले आहे. या गायब झालेल्या सोन्याची चोरी नेमकी कोणी केली, याचा तपास आता सुरु आहे. मंदिरातून 10 किलो सोने गायब झाल्याची चौकशी करण्यासाठी नेपाळ सरकारने ‘कमिशन टू इन्व्हेस्टिगेट अॅब्यूज ऑफ अॅथॉरिटी’ या सरकारी तपास यंत्रणेला आदेश दिले आहेत. सीआयएए ही भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणारी नेपाळ सरकारची सर्वोच्च घटनात्मक संस्था आहे.

नेपाळच्या काठमांडू येथे असलेल्या प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिरात (Pashupatinath Temple) दररोज हजारो भाविक येतात. मात्र हेच मंदिर 25 जून रोजी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली. हे मंदिर भक्तांसाठी असे कधीही बंद ठेवण्यात आले नव्हते, मात्र गेल्या काही महिन्यापूर्वी पशुपतीनाथ मंदिरात अर्पण केलेले दहा किलो सोने गायब झाले, आणि चौकशी सुरु झाली. या चोरीप्रकरणाचा तपास नेपाळची तपास यंत्रणा सीआयएए करीत आहे. या सोन्याच्या प्रकरणात पशुनाथ मंदिराची जे व्यवस्था पहात आहेत, त्यांचीही चौकशी होणार आहे. पशुपतीनाथ मंदिरात 2021 मध्ये 108 किलो सोने अर्पण करण्यात आले होते. याच सोन्यापैकी 10 किलो सोने गायब आहे. या चोरीचे धागेदोरे थेट नेपाळच्या संसदेपर्यंतही असल्याचे सांगण्यात येते. भक्तांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केल्यावर हा तपास सीआयएए या संघटनेकडे देण्यात आला आहे. मुळात हे सोने मंदिरातूतन गायब झाले आहे, की ते मंदिरात येण्यापूर्वीच गायब झाले होते, इथपासून हा तपास सुरु झाला आहे. (Pashupatinath Temple)
या सर्वांची सुरुवात 2021 पासून झाली. त्यावेळी केपी शर्मा ओली हे नेपाळचे पंतप्रधान होते. त्यांच्या पुढाकारानं मंदिरात बसवलेल्या शिवलिंगाखाली सोन्याचा तळ बनवण्याचा संकल्प घेण्यात आला. स्थानिक नेपाळी भाषेत त्याला जलहरी म्हणतात. याच झालरीतून दहा किलो सोने गायब असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता भाविकांच्या आरोपानंतर हे प्रकरण कोर्टात गेले आहे. अर्थात पशुपती नाथ ट्रस्टनं या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे आणि कुठल्याही चौकशीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. सोन्याचा तपास करण्यासाठी जी समिती नेमली आहे, त्या समितीनं दिवसभर मंदिराची पाहणी केली. मंदिराच्या गाभा-यात असलेल्या सर्व सोन्याचे वजन करण्यात आल्याची माहिती आहे. हे काम गाभा-याचे पावित्र्य सांभाळत अतिशय सावकाश करण्यात आले. त्यामुळे सकाळी दहा वाजता आत गेलेले तपास पथक रात्री दोन पर्यंत मंदिराच्या गाभा-यातच असल्याची माहिती आहे. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात पोलीस आणि सैन्याच्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Pashupatinath Temple)
======
हे देखील वाचा : 2025 मध्ये होणा-या महाकुंभाची तयारी सुरु
======
यादरम्यान मंदिर पूर्णवेळ भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले. पशुपतीनाथ मंदिरात परदेशी भाविकांची संख्या मोठी असते. मंदिर बंद असल्यानं या भाविकांची मोठी गैरसोय झाली. या सर्व घटनेमुळे पशुपतीनाथ मंदिराची आणि पर्यायानं नेपाळचीही बदनामी होत असल्याच आरोप काही संसद सदस्यांनी केला आहे.
पशुपतीनाथ मंदिर (Pashupatinath Temple) हे काठमांडूमधील सर्वात जुने हिंदू मंदिर आहे. या मंदिरात केलेल्या या जलहरीचे अनावरण नियोजीत तारखेच्या आधी तीन दिवस करण्यात आले, तेव्हाच यावर वाद झाला होता. 24 फेब्रुवारी 2021 रोजी तत्कालीन राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्या हस्ते जलहरीचे अनावरण झाले. तेव्हापासून सुमारे एक अब्ज रुपये किंमतीच्या जलहरीचा मुद्दा नेपाळच्या संसदेत गाजत आहे. यासर्वात नेपाळची बदनामी होत असल्याचा आरोप आहे.
सई बने