सौदर्याची देणगी लाभलेली डायना ‘प्रिंन्सेस’ झाली आणि एक परीकथा सुरु झाली… की एका तरुणीच्या स्वप्नांना कुंपण घालण्यात आलं. राजघराण्याची ती सून झाली की बंधनात अडकली… तिचं तिलाच ठाऊक… एक मात्र खरं डायना आपल्यात नसली तरी ती कायम तिच्या चाहत्यांच्या हृदयात रहाणार आहे.
एक होती राजकन्या….
29 जुलाई, 1981 रोजी इंग्लडमध्ये एका परीकथेची सुरुवात झाली… सेंट पॉल्स चर्चमध्ये एक वीस वर्षाची सुंदरी लांबलचक गाऊन घालून हळूवार पावलांनी आली… अवघं जग तिची प्रत्येक हालचाल बघत होतं… निळ्या डोळ्यांची ही मुलगी इंग्लडच्या राजघराण्याची सून झाली. प्रिन्स चार्लसची पत्नी झाली. एका प्रेमकहाणीची सुरुवात झाली… ती जाईल तिथे लोकांची नजर तिचा पाठलाग करायची… लग्नानंतर पुढच्याच वर्षी ती आई झाली… पण या प्रेमकहाणीत एक ठिणगी पडली होती… कॅमेला नावाची… या ठिणगीनं राजघराण्यातील या प्रेमकहाणीचा अंत झाला… ही राजकुमारी एकाकी पडली… पण ती लोकांच्या मनातून कधीच उतरली नाही… ती कायम राजकुमारीच राहीली… ती राजकुमारी म्हणजे डायना… प्रिंन्सेस ऑफ वेल्स… आज डायना असती तर तीनं साठाव्या वर्षात पदार्पण केलं असतं. अवघं 36 वर्षाचं आयुष्य डायनाला लाभलं. मृत्यूनंतर 23 वर्षानंतरही डायना तेवढीच लोकप्रिय आहे. आजही आपल्या लाडक्या राजकुमारीला अभिवादन करण्यासाठी तिचे चाहते एकत्र होतात.
इंग्लडमध्ये स्पेंन्सर घराण्यात डायनाचा जन्म 1 जुलै 1961 रोजी झाला. स्पेन्सर हे सुद्धा सरदार घराणे. जॉन स्पेंन्सर आणि द ऑनरेबल फ्रांसेस शांड क्यिड यांची डायनाही तिसरी मुलगी. डायना लहान असतांनाच तिच्या आई वडीलांचा घटस्फोट झाला. त्यामुळे डायनाचं शिक्षण इंग्लड आणि स्विझरलॅंडमध्ये झालं. 1975 मध्ये डायनाच्या वडिलांना अर्ल स्पेन्सर ही उपाधी मिळाली. त्यामुळे डायना, लेडी डायना म्हणून ओळखली जाऊ लागली. नृत्य आणि गाणं याची डायनाला आवड होती. स्पेंन्सर घराणेही श्रीमंत… त्यामुळे शाही वातावरणात या स्पेन्सर मुलांचं बालपण गेलं. पण डायना या सगळ्यात आपली स्वतःची ओळख करण्यासाठी धडपडत होती. ती अगदी साधारण नोकरी सुद्धा करत असे. लहान मुलांना सांभाळणे ते किंडलगार्डनमध्ये सहाय्यक अशी कामं डायना करत असे.
स्पेंन्सर घराणेही सरदार असल्यामुळे राजघराण्यातील शाही पार्टींना त्यांना आमंत्रण असे. अशाच एका कार्यक्रमात डायना आणि प्रिन्स चार्लसची ओळख झाली. पुढे ही दोघं एकमेकांना आवर्जुन भेटायला लागली. डायना तेव्हा अवघी 19 वर्षाची होती. प्रिंन्स चार्लसला राजघराण्याचा भावी वारस म्हणून पाहिले जात होते. चार्लसच्या व्यक्तीमत्वापुढे तारुण्यात पदार्पण करणारी डायना भाळली आणि त्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला होकार दिला. स्पेंन्सर घराण्यासाठी ही गोष्ट खूप मानाची होती. त्यांची मुलगी आता थेट राजघराण्यात जाणार, त्यामुळे त्यांचाही मान वाढणार होता. एकूण या लग्ना आधीच आसपासचे वातावरण भारावलेले होते. त्यात प्रिंन्स चार्लसच्या आधीच्या प्रेमप्रकरणाकडे आणि या दोघांमध्ये असलेल्या तेरा वर्षाच्या अंतराकडे दुर्लक्ष करण्यात आले. दुर्दैवानं पुढे या दोन्हीही कारणांमुळे डायनाच्या आयुष्याला दुःखाची झालर लागली…
24 फेब्रुवारी 1981 रोजी डायना आणि प्रिंन्स चार्लस यांची रिंग सेरेमनी झाली. चार्लसनं तब्बल 28000 पाऊंडची अंगठी डायनाला घातली. या अंगठीमध्ये निलम आणि 14 किंमती हिरे होते. आज ही अंगठी राजकुमार विलीयम यांची पत्नी केट मिडलटन अर्थात डायनाच्या मोठ्या सुनेकडे आहे.
प्रिंन्स चार्लसबरोबर लग्न करणारी ही तरुणी लगेच प्रकाशझोतात आली. अवघ्या वीसाव्या वर्षी ती प्रिंन्सेस होत होती. तिच्यात आणि चार्लसमध्ये वयाचं मोठं अंतर होतं… शिवाय दोघांचे स्वभावही वेगळे होते. प्रिन्स चार्लस राजघराण्यातील कठोर नियमांना पाळणारे… डायनाही श्रीमंत घरात लहानाची मोठी झालेली… पण ती नेहमी सर्वसाधारण नागरिकांसारखी राहत असे… लोकांमध्ये मिसळायला तिला आवडायचे. हे या दोघांच्या स्वभावातील अंतर लक्षात घेतले नाही. या लग्नाला एखाद्या परीकथेची उपमा देण्यात आली. त्यामुळे पहिल्यांदाच राजघराण्यातला हा विवाह सोहळा लाईव्ह दाखवण्यात आला.
29 जुलै 1981 मध्ये चार्लस आणि डायनाचा विवाह झाला. सेंट पॉल्स चर्चमध्ये आपल्या वडीलांचा हात धरुन डायना आली… लांब पांढरा शुभ्र गाऊन घातलेली… आणि निळ्या डोळ्यांची ही सौदर्यवती जगभरात कौतुकाचा विषय झाली. डायनाच्या लग्नाचा गाऊन डेव्हिड आणि एलिजाबेथ इमैनुएल यांनी डीझाईन केला होता. अत्यंत आकर्षक लेसनं त्याला सजवण्यात आलं होत. डायनाला लग्नानंतर प्रिंन्सेस ऑफ वेल्स किताब देण्यात आला. ती प्रिंन्सेस झाली. ही सोनेरी केसांची तरुणी एखाद्या परीसारखी भासत होती. हा विवाह सोहळा जगभरातील 750 नागरिकांनी लाईव्ह बघितला. वेडिंग ऑफ दि सेंचुरी असं या विवाह सोहळ्याचं वर्णन करण्यात आलं होतं. लग्नानंतर हे प्रेमीयुगूल हनीमूनसाठी रवाना झालं.
हे सगळं वरवर ठिकठाक वाटत असलं तरी डायना थोडी नाराज झाली होती. तिला चार्लस आणि कॅमिला पार्कर यांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागली होती. प्रिंन्सनं हनीमूनच्या काळताही कॅमिलाबरोबर संपर्क साधल्याची चर्चा होती. त्यामुळं डायना नाराज झाली होती. त्यात तिला राजघराण्यातील कठोर नियमांमध्ये स्वतःला बांधून घ्यावं लागलं. ती अवघ्या वीस वर्षाची होती. तिच्या स्वातंत्र्यावर बंघने आली. ती कुठेही गेली तरी कॅमे-याची फौज तिला टीपायला सज्ज असायची. त्यामुळे कितीही दडपण असलं तरीही बाहेर सतत प्रसन्न रहावं लागे. त्यातच तिला बाळाची चाहूल लागली. 1982 मध्ये डायनानं राजघराण्याच्या वारसाला जन्म दिला. प्रिंन्स विल्यमचं आगमन झालं. बाळाच्या जन्मानंतर सर्व सुरळीत होईल अशी तिची आशा होती. पण या बाळंतपणात एकवीस वर्षाची डायना खूप रोडावली. तिच्या लूकबद्दल शंकाही घेतल्या गेल्या. डायना तणावाखाली असल्याची चर्चा सुरु झाली. यात चार्लस आणि कॅमिलाच्या वाढलेल्या गाठीभेटींची भर पडली. डायना खरचं ताण अनुभवत होती. या ताणातून मोकळं होण्यासाठी तिने छोट्या विल्समच्या देखभालीत लक्ष घातलं. शिवाय राजघराण्याची सून आणि प्रतिनिधी म्हणून तिला अनेक सामाजिक संस्थांना भेटी द्यावा लागत. डायनानं यात आपल्याला शोधायचा प्रयत्न केला. ती समाजकार्यात जास्त व्यस्त राहू लागली. याचा परिणामही चांगला झाला. डायना थोडी सावरत होती. विल्यम नंतर दोन वर्षांनी डायनानं प्रिंन्स हॅरीला जन्म दिला. आता या जोडप्यांमध्ये दुरावा संपला असं चित्र निर्माण झालं होतं. एक सुखी कुटुंब म्हणून त्यांचे फोटो वृत्तपत्रात झळकायचे. विल्यम आणि हॅरीच्या मागे धावणारी डायना मध्येच दिसायची. एकूण हे वरवर छान चित्र होतं. पण प्रत्यक्षात कॅमिला पारकरमुळे डायना खूप अस्वस्थ होती. आपलं लग्न मोडणार ही भीती तिला त्रस्त करत होती. ती प्रचंड तणावात होती. तिच्या चेह-यार असणारी ही काळजी कॅमे-यानंही अचूक टीपली होती. डायनानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या बातमीनं सर्व इंग्लड हादरलं होतं. लग्न झाल्यापासूनच डायनाच्या भोवती एक वलय निर्माण झालं होतं. तिचं सौदर्य, तिचा सरळ स्वभाव यामुळे ती सतत प्रकाशझोतात असायची. अगदी तिच्या केसांची स्टाईल ते कपड्यांचे डीझाईन यांची लगेच कॉपी व्हायची. प्रिन्स चार्लसबरोबर ती अनेक दौ-यांना जायची. अनेक देशात हे दौरे असायचे. तिथे फक्त डायनाच चर्चेत असायची. हो.. ही गोष्टही या जोडप्यामध्ये दुरावा निर्माण करीत होती. शेवटी 28 ऑगस्ट 1996 मध्ये डायना आणि चार्लस यांचा घटस्फोट झाला. डायनाचे लग्न तुटले आणि एका नव्या डायनाचा जन्म झाला.
एरवी थोडी बुजलेली दिसणारी डायना आता एकदम वेगळी दिसू लागली. राजघराण्याचे कडक कायदे आता डायनावर नजर ठेवत नव्हते. त्यामुळे डायना आपला जास्तीतजास्त वेळ समाजसेवेसाठी देऊ लागली. तिनं आपल्या पेहरावात बदल केला. हेअरस्टाईल बदलली. तिच्यात आत्मविश्वास आला आणि थोडी बुजरी वाटणारी डायना आत्मविश्वासानं सामोरी जाऊ लागली. या नव्या डायनाच्या प्रेमात अवघं जग पडलं. नव-याच्या प्रेमप्रकरणाला कंटाळून वेगळी झालेली स्त्री, अशी तिची प्रतिमा निर्माण झाली. तिला सहानुभूती मिळत होती. ती जिथे जाईल तिथे कॅमे-यांची गर्दी व्हायची. या प्रसिद्धीच्या झोतात राहणा-या डायनानं एड्स आजाराबाबत मोठं काम केलं आहे. तिनं एड्ससाठी मोठ्या प्रमाणात फंड गोळा केला. तसंच एड्स झालेल्या व्यक्तींना भेटून त्यांच्याबरोबर संवाद साधला. यामुळे खूप चांगला संदेश समाजात गेला. ती मदर टेरेसा यांच्या बरोबरही काही काळ होती. 1992 मध्ये भारतात आलेल्या डायनानं ताजमहलालाही भेट दिली होती.
हे सर्व होत असतांना डायना आपल्या दोन्ही मुलांबरोबर जोडली गेली होती. ती लहान असतांना तिच्या आई वडीलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे आई वडीलांमध्ये होरपळ होणा-या मुलांचे मन ती जाणत होती. आपल्या नात्याची झळ मुलांना बसू नये म्हणून डायना काळजी घेत असे. प्रिंन्स हॅरी यांनी याबाबत अनेक भावनिक आठवणी लिहून ठेवल्या आहेत.
या सर्वात डायना एक मुक्त स्त्री म्हणून वावरत होती. कमालीची सुंदर… विलक्षण प्रभावी व्यक्तीमत्व… ही डायना डोडी फैद या इजिप्तीशन उद्योगपतीच्या प्रेमात पडल्याची कुणकुण लागली. डोडी हा अब्जोधिश होता. डोडी सोबत बिकीनी घातलेल्या डायनाचे फोटो वृत्तपत्रात झळकले आणि एकच खळबळ उडाली. पुढे डायना डोडी लग्नाच्या बातम्याही येऊ लागल्या. त्यामुळे या दोघांचे फोटो मिळवण्याची फोटोग्राफरमध्ये स्पर्धाच लागली. एका हॉटेलमधून हे दोघं बाहेर पडले आणि फोटोग्राफरच्या मोठ्या गटानं त्यांचा पाठलाग सुरु केला. त्यांना चुकवतांना गाडीचा अपघात झाला आणि दोघंही या अपघातात ठार झाले. लोकांच्या मनातली राजकन्या शांत झाली….
31 ऑगस्ट 1997 रोजी हा अपघात झाला. यात डायनाचा मृत्यू झाल्याची बातमी तिच्या चाहत्यांसाठी एक आघात होती. या सर्व घटनेसाठी राजघराण्यालाही जबाबदार धरण्यात आले. राणी, प्रिंन्स चार्लस आणि कॅमेला यांना व्हिलनची उपमा देण्यात आली. जनतेचा हा रोष बघून राजघराणेही धास्तावले होते. डायनाचा अंत्यविधी शाही करण्यात आला. तिच्या अंत्यविधीच्या वेळी विल्यम आणि हॅरीचे चेहरे पाहून डायनाचे चाहते अधिक दुःखी झाले… डायना आपल्यात नाही ही गोष्ट स्विकारण्यासारखी नव्हतीच…
डायना म्हणजे एक गोड स्वप्न ठरलं. पहाटे जाग यावी आणि हे सुखी स्वप्न मोडावं असं तिचं आयुष्य… ती राजघराण्यात आली आणि जनतेच्या हद्यात समावली ती कायमचीच…. तिच्या निधनानंतर तिचा मृत्यू अपघात की खून अशा अनेक चर्चा झाल्या… आताही होतात. पण ही सर्व रहस्य काळाच्या पोटात गडप झाली. फक्त उरल्या त्या आठवणी.. एका परीच्या आठवणी…
सई बने
क फॅक्टस