प्रसिद्ध इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांचं एक वाक्य आहे, एका इतिहासकाराची किंमत केवढी ? तर तो सादर करतो त्या पुराव्यांएवढी ! सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फार गुंतागुंतीचा झाला आहे. त्यातच महाराजांवर इतके सिनेमे निघत आहेत, त्यामुळे सिनेमा मधलाच इतिहास खरा, असा अंदाज सगळेच बांधून असतात. आता शिवरायांचा इतिहास जाणीवपूर्वक गुंतागुंतीचा करण्यात आला की अजून काही कारण, याबद्दल न बोललेलच बरं…पण शिवरायांना आपापल्या विचारसरणीनुसार आणि सोयीनुसार दाखवण्याचा प्रयत्न अनेकदा काही लोकं करत असतात.
शिवराय कसे होते, काय होते, हे सगळं इतिहासात दडलेलं आहे. फक्त आजची पिढी तो इतिहास वाचायचे कष्ट घेत नाही. हल्ली अजून एक गोष्ट मोठ्या प्रमाणात सांगितली जाते की, शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते. त्यांच्याकडे पठाणांची फौज होती, मुस्लिम सूफी बाबा त्यांचे गुरु होते. काही दिवसांपूर्वी युट्युबर ध्रुव राठीचा एक व्हिडिओ आला होता, ज्यामध्ये शिवरायांच्या इतिहासावरुन बराच गदारोळ माजला. अनेकांनी ध्रुव राठीने मांडलेल्या इतिहासावर टीका केली तर अनेकांनी त्याला समर्थन दिलं. त्यातच महाराष्ट्रातील काही संघटना शिवरायांच्या सैन्यात मोठ्या संख्येने मुस्लिम होते असं म्हणत असतात. आता प्रश्न येतो की, खरच शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते का ? तर याचं उत्तर आहे… हो ! पण या मुस्लिमांची संख्या किती होती, ते कोणकोणत्या पदावर होते, इतिहासात त्यांचं स्थान काय ? याबाबत मात्र फार कोणाला काही माहीत नसतं. (Shivjayanti)
शिवरायांचे पूर्वज हे वेरूळच्या भोसले घराण्याचे… याशिवाय काही ठिकाणी शिवरायांचे पूर्वज रजपूत होते असंही म्हटलं जातं. शहाजी राजेंनी १६५६ च्या एका पत्रात स्वत:ला आम्ही तो राजपूत असं म्हणवून घेतलं आहे. यानंतर हेच भोसले घराणं शेकडो वर्ष आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांच्या अधिपत्याखाली सरदार म्हणून राहिलं. पण परकीय आक्रमणकाऱ्यांसोबत राहून काम न करता आपलं स्वतंत्र राज्य उभारावं, अशी संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांना सुचली आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य उभारण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू केले. शहाजी राजे यांचंही हेच धोरण होतं. शिवरायांच्या सुरुवातीच्या काळात वडील आदिलशाहीत जहागीरदार असल्यामुळेच त्यांनी स्वराज्य निर्माण करताना काही ठराविक मुस्लिमांना सोबत घेतलं होतं.
आधी आपण त्यांच्या सैन्यातील मुस्लिम पुराव्यानिशी जाणून घेऊ. शहाजीराजांनी पुणे जहागिरीचं रक्षण करताना मदतनीस म्हणून काही मुस्लिम अधिकारी नेमलेले होते. आता हे मुस्लिम अधिकारी का नेमले कारण, ते त्यावेळी आदिलशाहसाठी काम करत होते. यामध्ये एक म्हणजे जैनाखान पिरजादे, जो पुणे परगण्याचा सरहवालदार होता. दूसरा म्हणजे सिद्दी अंबर बगदाद ! हा पुणे परगण्याचा हवालदार होता. तिसरा बहिलीमखान हा बारामती प्रांताचा हवालदार नेमला होता. यानंतर नाव येतं कासिम बे… हा पेठ शिवापूरचा हवालदार होता. तर आणखी एक नाव म्हणजे नूरबेग जो पायदळाचा सरनौबत होता. त्याच्याकडे १००० स्वारांची जबाबदारी होती. ही सर्व नावं शहाजीराजे हयात असताना आणि शिवरायांच्या अगदी सुरुवातीच्या काळात ऐकायला मिळतात. पण ही सर्व आदिलशाहीतली माणसं होती असं म्हटलं तरी चूक ठरणार नाही. यातील कोणत्याही मुस्लिम अधिकाऱ्याचा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत उल्लेखसुद्धा मिळत नाही. याचं कारण मात्र इतिहासात सापडत नाही. (History)
स्वराज्य उभारताना शिवरायांना विविध क्षेत्रात पारंगत असलेले व्यक्ती पाहिजे होते. त्यामुळे तांत्रिक कारणांसाठी त्यांनी काही मुस्लिम अधिकारी नेमलेले होते. यामध्ये दर्यासारंग आणि दौलतखान हे दोन मुस्लिम अधिकारी होते. काही इतिहासकार दर्यासारंग हा मुस्लिम नसल्याचंही नमूद करतात. या दोघांच्या व्यतिरिक्त काजी हैदर नावाचा एक पारसनीस म्हणजेच वकील होता. दर्या सारंग आणि त्यांच्या मुलाला स्वत: शिवरायांनी १६७८ साली अटक केल्याची नोंद आहे. त्यानंतर दौलतखानचा शिवरायांच्या निधनानंतर आणि शंभू राजेंच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच १६८० दरम्यान शेवटचा उल्लेख आढळतो. तर काजी हैदर हा १६८३ मध्ये औरंगजेबाला जाऊन मिळाला होता. औरंगजेबाने त्याचा नातू अजीमुश्शान याला शिकवण्यासाठी काजी हैदरला ठेऊन घेतला होता. काझी हैदर हा दुभाषीसुद्धा होता. त्याला शिवरायांनी फक्त एकदाच १६७२ साली बहादुरखानकडे वकील म्हणून पाठवलं होतं.(Information)
यानंतर अजून तीन नावं सापडतात, ते म्हणजे नुरखान… हा केवळ एक सैनिक होता. जो १६७० साली महाराजांकडे आल्याचा उल्लेख मिळतो. याशिवाय सिद्दी हिलाल आणि त्याचा मुलगा सिद्दी याहयाह किंवा सिद्दी वाहवाह ! सिद्दी हिलाल हा खेळोजी भोसले यांचा क्रितपुत्र होता. शिवरायांचे पणजोबा होते, श्रीमंत बाबाजी राजे भोसले, त्यांचे दोन पुत्र होते… मालोजी राजे आणि विठोजी राजे… या विठोजी राजे यांचे चिरंजीव म्हणजे खेळोजी भोसले. याच खेळोजी यांचा हा क्रितपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम पण मुलासारखा वाढवलेला सैनिक म्हणजे सिद्दी हिलाल. त्याचा मुलगा सिद्दी याहयाह पन्हाळगडाच्या वेढ्यात शिवरायांना सोडवण्याच्या प्रयत्नात मरण पावला. १६७५ नंतर सिद्दी हिलालचे कोणतेही उल्लेख आढळत नाहीत.
अजून दोन नाव आपल्याला मिळतात, जे शिवरायांचे सर्वात प्रामाणिक अधिकारी असल्याचं बोललं जातं. एक म्हणजे सिद्दी इब्राहीम… प्रतापगडाच्या संग्रामात शिवराय १० अंगरक्षक घेऊन गेले होते, त्यात संभाजी कावजी, कात्याजी इंगळे, कोंडाजी कंक, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सुरजी काटणके, जिवा महाला, विसाजी मुरंबक, संभाजी कारवार आणि सिद्दी इब्राहीम ! सिद्दी इब्राहीम हा शिवरायांच्या हजारी अधिकाऱ्यांमध्ये होता. याशिवाय दुसरं नाव म्हणजे शामा खान… हा एक सैनिक होता. त्याचा उल्लेख २९ सरदारांच्या यादीत आढळतो. आपण ही जी वरती मुस्लिमांची ११-१२ नावं पाहिली यांना सोडून एकाही मुस्लिम अधिकाऱ्याचा, अंगरक्षकाचा आणि सैनिकाचा उल्लेख शिवरायांच्या इतिहासात आढळत नाही. या सर्वांचे पुरावे शिवभरत ग्रंथ, सभासद बखर, पर्णालपर्वतग्रहणाख्यान, इंग्लिश रेकॉर्डस ऑन शिवाजी, मराठ्यांच्या इतिहासाची साधने, शिवछत्रपतींची पत्रे, शिवचरित्र साहित्य खंड, एतिहासिक संकीर्ण साहित्य, मराठी रियासत, शिवकालीन पत्रसार संग्रह, रेकॉर्डस ऑफ द शिवाजी पिरीयड आणि इतर समकालीन बखरी आणि कागदपत्रांमध्ये मिळतात.(Shivjayanti)
आता शिवरायांचे इतर मुस्लिमांसोबत संबंध जोडले जातात, तो इतिहास जाणून घेऊया. पहिलं नाव म्हणजे मदारी मेहतर… शिवरायांचा विश्वासू सरदार आणि आग्राच्या भेटीत तो शिवराय निसटताना त्यांच्या जागी झोपला होता, असा इतिहास सांगितला जातो. मात्र हे पूर्णपणे काल्पनिक पात्र आहे. मदारी मेहतर नावाच्या व्यक्तीची शिवकाळाच्या इतिहासात कुठेही नोंद नाही. राजगड ते आग्रा आणि आग्रा ते राजगड या संपूर्ण प्रवासातही मदारी मेहतर हे पात्र आढळत नाही. मग हे नाव नक्की आलं तरी कुठून… ? तर इतिहासकार आबा चांदोरकर यांनी सादर केलेल्या फक्त एका बनावट पत्रात ते नाव आढळून आलं आहे. आता पत्र बनावट म्हणजेच मदारी मेहतर ही व्यक्तीसुद्धा खोटी आहे, हे सिद्ध होतं. प्रसिद्ध शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांनीही हे पात्र खोटं असल्याचं सांगितलं आहे.(Shivjayanti)
त्यानंतर नाव येतं रुस्तम ए जमान ! महाराष्ट्रातील काही संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार रुस्तम ए जमान हा प्रतापगडाच्या संग्रामावेळी शिवरायांचा अंगरक्षक होता आणि त्यानेच शिवरायांना वाघनख दिले होते, असं सांगितलं आहे. युट्युबर ध्रुव राठीनेही आपल्या व्हिडिओमध्ये हेच म्हटलं आहे. तसच कॉमरेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? या पुस्तकातसुद्धा हे नमूद आहे. वरती मी तुम्हाला शिवरायांच्या अंगरक्षकाची यादी सांगितलीच आहे, त्यात सिद्दी इब्राहीम सोडून कोणीच मुस्लिम नव्हता. तर रुस्तम ए जमान हा पठाण आदिलशाहीचा सरदार असून तो अफझल खानाच्या बाजूने लढत होता. याच रुस्तम ए जमानला शिवरायांनी १६६०च्या कोल्हापूरजवळ झालेल्या युद्धात पराभूत केलं होतं. वाघनख म्हणजे शिवरायांच्या बुद्धिमत्तेतून सत्यात उतरलेलं शस्त्र आहे. याची संकल्पना कृष्णाजी नाईक बांदल यांनीच शिवरायांसमोर मांडली होती. त्यामुळे इतिहासात या आधी वाघनख हे हत्यार कोणीही वापरल्याचा उल्लेख आपल्याला सापडत नाही.
अजून एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे मीर मुहम्मद या चित्रकाराने शिवाजी महाराजांचं काढलेलं अस्सल चित्र ! तर मुळातच हा अपप्रचार आहे. हे चित्र इटालियन लेखक आणि प्रवासी निकोलाओ मनूची याने गोवळकोंडयाच्या काही स्थानिक चित्रकारांकडून काढून घेतलं होतं. हे चित्र त्याने आपल्या स्टोरिया दोर मोगोर या पुस्तकात छापलं होतं. हे चित्र जवळपास १६८५ दरम्यानचं असाव आणि सध्या फ्रान्समधील राष्ट्रीय संग्रहालयात आहे. (Shivjayanti)
अजून एक गोष्ट काही संघटना, इतिहासकार आणि यूट्यूबर्सकडून ठासून सांगितली जाते की, शिवरायांच्या सैन्यात ६६ हजार इतकी मुस्लिम सैनिकांची संख्या होती. तसेच त्यांच्या सैन्यात ७०० पठाणांची वेगळी तुकडी होती. या गोष्टीचा एकही समकालीन पुरावा इतिहासात उपलब्ध नाही. याशिवाय ही जी ७०० पठाणांची गोष्ट आहे, याचा उल्लेख मल्हार रामराव चिटणीस लिखित शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र यामध्ये आहे. यात लिहिलं आहे की, विजापूरचे पादशाहीतून सातशे पठाण बदलून चाकरीस राहावयास आले, त्यांस ठेवावे न ठेवावे, एसा विचार पडला. विजापूरकरांचा आपला द्वेष. हे मुसलमान, यांचा भरवसा मानावा कसा? म्हणून विचार करिता गोमाजि नाईक पानसंबळ हवलदार, जिजाबाईसाहेबांचे लग्न जाले, ते समयी जाधवराव याणी त्यांचे सेवेसी दील्हे. आता प्रश्न असा पडतो की, ही बखर किंवा चरित्र समकालीन आहे का ? तर नाही. ही बखर एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला लिहिली गेली होती. त्यामुळे ही बखर प्रमाण मानता येणार नाही, कारण समकालीन कोणत्याही साहित्यात हा उल्लेख मिळत नाही.(Shivjayanti)
लेखक आणि इतिहासकार राम पुनीयानी सांगतात की, त्यांच्या गुप्तहेर खात्याचे सचिव मौलाना हैदर अली होते. शिवाजी महाराजांच्या नौसेनेची धुरा सिद्दी संबलच्या हाती होती. ही दोन्हीही नावं समकालीन कागदपत्रात, ग्रंथात, चरित्रात किंवा पत्रव्यवहारात कुठेच आढळत नाही. तर प्रश्न हाच पडतो की, ही नाव जाणीवपूर्वक इतिहासात कोणी घातली आणि का घातली ? किंवा जिथून ही नावं सापडली, त्यांचा संदर्भदेखील या इतिहासकारांकडून येत नाही. शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडमध्ये पूजेसाठी जगदीश्वर मंदिराची उभारणी केली. त्याचवेळी आपल्या महालाच्या समोर मुस्लीम बांधवांसाठी मशीद तयार केली होती, असाही अपप्रचार केला जातो. आजही रायगडावर गेलात की मशीद किंवा मशिदीसारखाप्रकारदेखील कुठेही आढळत नाही. याशिवाय महाराजांनी एखादी मशीद उभारली, असाही उल्लेख कुठे मिळत नाही.
=============
हे देखील वाचा : Rammudra : जगातल्या 30 देशांमध्ये राममुद्रा वापरतात, भारतात का नाही ?
=============
याच्याव्यतिरिक्त सिद्दी अंबर वहाब, हुसेनखान मियाना, दाऊतखान, इब्राहीमखान, सुलतानखान अशा काल्पनिक पात्रांसोबत शिवाजी महाराजांचा इतिहास जोडला जातो, जे हयातसुद्धा नव्हते. याशिवाय शिवरायांच्या सैन्यात १७%, ४०%, ५३% मुस्लिम होते, असे सांगत हाच टक्का वाढवला जातो. मध्यंतरी राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी चक्क शिवरायांच्या सैन्यात ९०% मुसलमान होते, असं म्हटलं होतं. यामुळे निश्चितच शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड होत आहे. शिवाजी महाराज जरी दुसऱ्या धर्मांचा आणि त्यांच्या पवित्र ग्रंथांचा आदर ठेवत असले, तरी त्यांना आपल्या धर्माचा मात्र अभिमान होता, असं एकंदरीत दिसून येतं. (Shivjayanti)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याकाळी छत्रपती होऊन दाखवलं जेव्हा भारतावर सगळीकडेच मुस्लिम राजांचं राज्य होतं. उत्तरेत मुघल, दक्षिणेत निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, नादीरशाही, बरीदशाही अशा कित्येक पातशाहया होत्या. मात्र या सर्वांना झुगारून शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभारलं. त्यामुळे शिवाजी महाराजांचा अचूक इतिहास सर्वांनीच मांडला पाहिजे. कारण पुरावे हे कोणत्याही न्यूजपेपरच्या न्यूज कटींग किंवा वेबसाइटवर नसतात, तर त्याचं मूळ हे समकालीन पुस्तक, बखरी, पत्रव्यवहार यात दडलेलं असतं. या सर्वांचा अभ्यास केला तरच आपल्याला इतिहास कळतो. त्यामुळे इतिहास जपण्यासाठी आणि विशेषत: आपल्या शिवरायांचा इतिहास जपण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलायला हवं. आपला इतिहास जशाच्या तसा पुढच्या पिढीपर्यंत जावा, यासाठीच आपण प्रयत्नशील असलं पाहिजे एवढच !