Home » योगराज सिंग यांच्या हाती ‘या’ क्रिकेटरच ट्रेनिंग 

योगराज सिंग यांच्या हाती ‘या’ क्रिकेटरच ट्रेनिंग 

by Team Gajawaja
0 comment
Arjun Tendulkar
Share

भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, तमाम भारतीयांच्या गळ्यातला ताईत आहे.  वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षापासून सचिननं आपल्या खेळाच्या जादूनं क्रिकेट रसिकांची मने जिंकली.  मात्र याच सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) अद्यापही भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. आयपीएल लिलावात अर्जुनला मुंबई इंडियन्समध्ये स्थान मिळाले, पण त्याला एकही सामना खेळता आला नाही.   

अर्जुन (Arjun Tendulkar) गोलंदाज म्हणून सराव करीत आहे. आता अर्जुनच्या करिअरला हातभार लावण्याची जबाबदारी सचिननं योगराज सिंग यांच्यावर दिली आहे. योगराज सिंग हे भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडिल आहेत. योगराज सिंग यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या शिष्यांना ते मारण्यासही मागेपुढे करत नाहीत. आता सचिनच्या लेकाला ते कसे प्रशिक्षित करतात, याकडे सचिनच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.  

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा सध्या चंदीगडमध्ये आहे. 23 वर्षीय अर्जुन 27 व्या अखिल भारतीय जेपी अत्री मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे.  चंदीगडमध्ये आलेला अर्जुन लगेच युवराज सिंग यांच्या प्रशिक्षण केंद्रात सामिल झाला आहे. युवराज सिंगचे वडिल असलेले माजी क्रिकेटपटू योगराज सिंग हे 1980 च्या दशकात भारतीय क्रिकेट संघात होते. त्यांची क्रिकेटमधली कारर्कीद फार मोठी नसली तरी योगराज हे अत्यंत कडक क्रिकेट प्रशिक्षक म्हणून परिचीत आहेत. आता त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात अर्जुन तेंडूलकरही (Arjun Tendulkar) सहभागी झाला आहे. अर्जुन चंदीगडमध्ये गोवा क्रिकेट संघाच्या वतीने खेळणार आहे. जवळपास पंधरा दिवस त्याचा मुक्काम चंदीगढमध्ये असेल.  त्यादरम्यान तो योगराज सिंग यांच्या तालमित सराव करणार आहे.   

योगराज सिंग हे भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत. क्रिकेट बरोबर अभिनयाचीही त्यांना आवड आहे. काही पंजाबी चित्रपटांमध्ये त्यांनी कामही केले आहे. 1980 च्या दशकात योगराज सिंग भारतीय क्रिकेट संघात होते. 1981 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात त्यांनी भारताकडून एकमेव कसोटी सामना खेळला. या सामन्यात त्यांनी एक विकेट घेतली. मात्र वेगवान गोलंदाज असलेल्या योगराज सिंग यांनी क्रिकेटला लवकर  रामराम केला, पण पंजाबी चित्रपाटात अनेक भूमिका केल्या. यासोबत त्यांनी आपली क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरु केली. क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट शिकवायला आवडत असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. योगराज सिंग भारतासाठी 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांच्या नावावर 4 विकेट आहेत. अवघ्या 28 वर्षात क्रिकेटच्या मैदानापासून ते कायमचे दूर झाले. 

जवळपास डझनभर पंजाबी चित्रपाटात काम केलेले योगराज सिंग आपल्या क्रिकेट प्रशिक्षण अकादमीत अनेक युवा खेळाडूंना प्रशिक्षित करीत आहेत. युवराज सिंगही आपल्या वडीलांच्याच्या हाताखाली क्रिकेट शिकला. युवराज सिंगला अष्टपैलू खेळाडू बनवण्यात प्रशिक्षक म्हणून योगराज सिंग यांचे योगदान मोलाचे आहे. पंजाबचा फलंदाज मनन वोहरा हाही योगराज सिंग यांचा शिष्य आहे. मनन वोहराबाबतीत एक किस्सा सांगितला जातो.  

मनन वोहरा आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून 55 सामने खेळले आहेत. वयाच्या 8 व्या वर्षापासून वोहरा योगराज सिंह यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. एकदा प्रशिक्षणादरम्यान वोहरा यांना दुखापत झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर रक्तस्त्राव सुरू झाला. वोहरा रडायला लागल्यावर योगराज सिंग यांनी वोहराला एक थप्पड मारली, मग मलमपट्टी करून पुन्हा फलंदाजीला उतरण्यास सांगितले.

आता याच योगराज सिंगकडे सचिनने आपल्या मुलाची जबाबदारी दिली आहे. 24 सप्टेंबर रोजी 23 वा वाढदिवस साजरा केलेल्या अर्जुन तेंडूलकरला अद्याप प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने निवडले असले तरी एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. गेल्या वर्षी अर्जुन सय्यद अली मुश्ताक टी-20 स्पर्धेत मुंबईकडून फक्त 2 सामने खेळला. 

==========

हे देखील वाचा : सोशल मीडियावर रंगली आहे चर्चा…ये मंकडिंग मंकडिंग क्या है?

==========

अर्जुनची (Arjun Tendulkar) मुंबई संघातही पुन्हा निवड झाली नाही. आता तो गोवा संघाकडून खेळत आहे. अर्जुन जेपी अत्रे स्पर्धेच्या निमित्तानं चंदिगडला आला आहे. या स्पर्धेत 100 हून अधिक खेळाडू खेळले आहेत, ज्यांना नंतर भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. आता अर्जुनही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळल्यानंतर सचिनच्या मुलाचे नशीब बदलते का, याची उत्सुकता सचिनच्या चाहत्यांना आहे.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.