भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भाषणात 21 जून रोजी योगादिन साजरा करण्याचे आवाहन केले. योग ही भारताने जगाला दिलेली अमुल्य देणगी आहे. मानवाच्या बदल्या जीवनशैलीमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक रोगांना आमंत्रण दिले आहे. या सर्वांवर योगा हा अचूक उपाय आहे. कोरोनामध्ये योगाचे महत्त्व सर्वांनीच मान्य केले. त्यामुळे आता सर्वंच देशांमध्ये योगाचे महत्त्व वाढत आहे. त्यात आखाती देशही मागे नाहीत. या देशातही योगा दिवस साजरा होतो. आता यापुढे जात सौद अरेबियामधील विद्यपिठातही योगा शिकवण्यात येणार आहे.(Yoga Training Course) एवढंच नाही तर सौदी अरेबियामध्ये योगा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याद्वारे योगाच्या माध्यमातून निरोगी आरोग्य कसे प्राप्त होते, याबाबतही तेथे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सौदी अरेबियामध्ये योगाबाबात लोकांमध्ये जागरुकता वाढत आहे. जनतेचा हा ओढा बघत सौदी अरेबियाच्या सरकारनंही योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळेच सौदी अरेबियाच्या विद्यापीठांमध्येही आता योगा प्रशिक्षण अभ्यासक्रम(Yoga Training Course) सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी सौदी अरेबियात योगा समिती कार्यरत आहे. या समितीनं सौदी युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स फेडरेशन (SUSF) च्या सहकार्याने, विद्यापीठात योगाबाबतची जागरुकता निर्माण करण्यासाठी व्याख्यांनांचे आयोजन केले होते. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी योग शिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सौदी अरेबियामधील शिक्षण मंत्रालयात यासंदर्भात नुकतीच बैठक झाली.त्यात सौदी अरेबिया योगा समितीनं आपल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच योगा प्रशिक्षकांची आपल्या देशाला किती गरज आहे, याची माहिती देण्यात आली. प्रशिक्षित योगा शिक्षकांसाठी सौदी अरेबियाचा एक गट भारतातही येऊन गेला. भारतातील आशियाई योगासन स्पोर्ट्स फेडरेशननंही सौदी अरेबियाच्या या योगाच्या प्रचार मोहिमेला हातभार लावला आहे.
सौदी अरेबियाच्या विद्यापीठांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याल योगासनांची माहिती देण्यात येणार आहे. सौदी योगा समितीचे अध्यक्ष नूफ अलमारवाई हे या सर्व उपक्रमात मोठे योगदान देत आहेत. सौदी समाजात मोठ्या प्रमाणावर योगाचा प्रसार करण्याचा आपला दृष्टीकोन असल्याचे त्यांनी सांगितले आहे. योगा शिक्षणाद्वारे तरुणांना, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आनंद घेता येणार असल्याचेही नूफ अलमारवाई यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांमध्ये योगाची आवड निर्माण झाल्यावर त्यांच्या स्पर्धाही घेण्यात येणार आहेत.योगाचा घराघरात प्रचार व्हावा हे सौदी अरेबिया योग समितीचे प्रमुख उद्दीष्ट आहे. पुढे यातूनच स्थानिक तसेच प्रादेशिक पातळीवर योगासनांची स्पर्धाही होणार आहेत.
सौदी अरेबियामध्ये फेब्रुवारीमध्ये झालेल्या योगा महोत्सवानेही जगाचे लक्ष वेधून घेतले होते. सौदी अरेबियातील प्रसिद्ध बे ला सन बीचवर हा पहिला योगा महोत्सव झाला. कौतुकाची गोष्ट अशी की, सौदी योगा समितीने आयोजित केलेल्या या महोत्सवात देशातील सुमारे 1000 योगा शिक्षक सहभागी झाले होते. सौदी अरेबियात सध्या दहा हजाराहून अधिक योग शिक्षक आहेत. तिथे योगा शिकवणाऱ्या केंद्रांना परवाना देण्यात येतो. त्यामुळे योगाची महती वाढली आहे. त्यातूनच आणखी प्रशिक्षित योगा शिक्षकांची गरज या देशाला जाणवत आहे. 2021 मध्ये सौदी अरेबिया आणि भारत यांच्यात या संदर्भात करारही झाला होता.(Yoga Training Course)
=============
हे देखील वाचा : 5G सुविधेचे फायदे-तोटे तुम्हाला माहितेयत का? जाणून घ्या अधिक
=============
कोरोनानंतर भारतीय आहार पद्धतीबरोबरच योगाचे महत्त्व वाढले. सर्व रोगांच्या मुळावर आघात करणारा हा योगा भारतीयांसाठी कोरोना काळात वरदान ठरला. योगाद्वारे आरोग्या राखले जाते, तसेच समतोल जीनवाचाही पायाही रचला जातो. त्यामुळेच योगा फक्त आपल्या देशासाठी मर्यादित राहिले नाही. संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व कळले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सौदी अरेबियासारख्या देशानं खुल्या मनानं योगाचा स्विकार केला असून त्याचा प्रचारही तेथे जोरदार चालू आहे.
सई बने…