मधील सरकारनं योगगुरु धीरेंद्र ब्रह्मचारी यांची अब्जावधी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे. हरियाणा सरकार योगगुरु धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या मालमत्तेचे अधिग्रहण, व्यवस्थापन आणि संचालन करण्यासाठी विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मंजूर करणार आहे. ही बातमी येताच देशभर खळबळ उडाली आहे. कारण हे योगगुरु धीरेंद्र ब्रह्मचारी म्हणजे, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे योगगुरु आणि राजकीय मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध होते. हरियाणामध्ये या योगगुरुंच्या जमिनीवरुन वाद सुरु आहे. राज्य सरकारने कायद्याद्वारे ही मालमत्ता ताब्यात घेतली तर त्याचे नियोजन करता येईल, असे मत उच्च न्यायालयाचे आहे. त्यामुळे हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यातील सिलोखरा गावातील ही मालमत्ता सरकार जमा होण्याची शक्यता आहे. या मालमत्तेच्या ताब्यावरून धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या जुन्या अनुयायांमध्ये वाद सुरू आहे. हिच जमीन हरियाणा सरकारच्या ताब्यात जाण्याची चिन्हे असून यामुळे वाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे. (Yoga Guru Dhirendra Brahmachari)
पंतप्रधानांचे योगगुरू म्हणून, धीरेंद्र ब्रह्मचारी यांचा राजकीय प्रभाव प्रचंड होता. केंद्रीय मंत्री, नोकरशहा आणि महत्त्वाच्या व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी रांगेत उभे राहायचे, याचे अनेक उल्लेख आहेत. योगगुरु धीरेंद्र ब्रह्मचारी हे स्वतः निळ्या टोयोटा कारने प्रवास करायचे. त्यांचे स्वतःचे खाजगी विमान असल्याचीही माहिती आहे. अशा योगगुरुंची मालमत्ता आता जप्त होणार असल्यामुळे या योगगुरुंभोवती एवढे राजकीय जाळे कसे निर्माण झाले, याची चर्चा सुरु झाली आहे. योगगुरु धीरेंद्र ब्रह्मचारी यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1924 रोजी बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील मैथिल ब्राह्मण कुटुंबात झाला. भगवद्गीतेपासून प्रेरणा घेऊन त्यांनी 13 व्या वर्षी घर सोडले आणि वाराणसी येथील आश्रमात ते राहू लागले. तिथे गुरु महर्षी कार्तिकेय यांना त्यांनी गुरु केले. लखनौपासून सुमारे बारा मैल अंतरावर गोपाळ-खेडा येथे असलेल्या आश्रमात धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी योगशास्त्राचा अभ्यास केला. योगगुरु धीरेंद्र ब्रह्मचारी यांची लोकप्रियता एवढी होती की, दूरदर्शनवरही त्यांचे योगाचे कार्यक्रम झाले. (Marathi News)
तसेच दिल्लीमधील प्रसिद्ध शाळा आणि विश्वायतन योग आश्रमातही त्यांनी योगाचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. 1960 च्या सुमारास सोव्हिएत अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठीही योगगुरु धीरेंद्र ब्रह्मचारी यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर योगगुरु जवाहरलाल नेहरू यांच्या संपर्कात आले. नेहरुंनी योगगुरुंना, इंदिरा गांधी यांना योग शिकवण्याची विनंती केली. त्यानंतर योगगुरु, इंदिरा गांधी यांचे योग आणि राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले. इंदिरा गांधी कुठलाही मोठा निर्णय घेतांना योगगुरुंसोबर चर्चा करीत असत. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली, तेव्हाही त्यांनी योगगुरुंसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. १९८० मध्ये योगगुरुंनी हरियाणातील सिलोखेडा गावाजवळील गुडगाव म्हणजेच आत्ताच्या गुरुग्राम येथे अपर्णा आश्रम सोसायटी बांधली. इंदिरा गांधी आठवड्यातून एकदा योगगुरुंना भेटण्यासाठी येथे येत असत. दूरदर्शनवरील सर्वात मोठी आणि लोकप्रिय मालिका असलेल्या हमलोग या मालिकेचे चित्रिकरण येथेच झाले. यासाठी योगगुरुंनी प्रति शिफ्ट 25000 रुपये, आकारल्याची माहिती आहे. (Yoga Guru Dhirendra Brahmachari)
योगगुरु धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी योगावर हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनेक पुस्तके लिहिली आहेत. ‘योगिक सूक्ष्म व्यायाम’ ‘योगासन विज्ञान’ ही त्यांची पुस्तके लोकप्रिय आहेत. असे असले तरी योगगुरु त्यांच्या संपत्तीमुळे कायम वादात राहिले आहेत. दिल्ली, जम्मू-काश्मिरमधील त्यांच्या मालमत्तेबाबत कायम प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्याची कधीही चौकशी झाली नाही. इंदिरा गांधी यांनी ज्या काळात आणीबाणी जाहीर केली, त्या काळातच योगगुरुंनी अमेरिकेतून विमानाची खरेदी केली. शिवाय कस्टम ड्युटी न भरता ते विमान देशात आणल्याचा आरोपही आहे. पण यासंदर्भातही कुठलीही कारवाई झाली नाही. याशिवाय एका कारखान्यासाठी स्पेनमधून बेकायदेशीरपणे बंदुकीचे सुटे भाग आयात केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. पण याचीही कधी चौकशी झाली नाही. योगगुरुंचा मृत्यूही कायम गुढ बनून राहिला आहे. 9 जून 1994 रोजी आपल्या विमानानं जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील मंतलाई या गावातील आश्रमात योगगुरु जात होते. मात्र विमान उतरत असतांना त्याची पाईनच्या झाडाबरोबर टक्कर झाली, आणि त्या अपघातात योगगुरु धीरेंद्र ब्रह्मचारी आणि त्यांच्या पायलटचा मृत्यू झाला. (Marathi News)
==============
हे देखील वाचा : Tenzin Gyatso : दलाई लामांचे चीनला आव्हान !
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
योगगुरु धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्याबाबत अनेक पुस्तकातही उल्लेख आहे. भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी त्यांच्या ‘मॅटर्स ऑफ डिस्क्रिशन: अॅन ऑटोबायोग्राफी’ या आत्मचरित्रात धीरेंद्र ब्रह्मचारींच्या प्रभावाचा उल्लेख केला आहे. त्यानुसार 1963 मध्ये धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री के.एल. श्रीमाळी यांना त्यांच्या योग केंद्राच्या अनुदानाचे नूतनीकरण करण्याची विनंती केली होती. परंतु श्रीमाळींनी त्यांच्याकडे अनुदानाचा ऑडिट अहवाल मागितला. त्यानंतर वेगानं राजकीय घडामोडी घडल्या आणि श्रीमाळी यांना राजीनामा द्यावा लागला. अशाच प्रकारे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात योगगुरु धीरेंद्र ब्रह्मचारी यांचे चागंलच वजन होते. अनेक अधिकारी बदल्या करण्यासाठी त्यांची भेट घ्यायचे. तसेच अनेक आमदार, खासदारही अपेक्षित खात्यासाठी योगगुरुंना मध्यस्थी करण्याची विनंती करायचे. याच योगगुरुंची संपत्ती आता सरकार जमा होण्याची शक्यता आहे. (Yoga Guru Dhirendra Brahmachari)
सई बने