तब्बल 1200 करोड खर्चून तयार झालेल्या श्री लक्ष्मी नरसिंहा स्वामी मंदिराचे नुकतेच तेलंगणा राज्यात लोकार्पण करण्यात आले. यदाद्री मंदिर (Yadadri temple) म्हणून हे मंदिर परिसरात परिचित आहे. या मंदिराला पौराणिक इतिहास असून त्याला नवीन रुपात आणताना शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.
मंदिर उभारतांना त्यात सिमेंटचा नाही, तर चुन्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढची हजार वर्ष या मंदिराला कुठलाही धोका नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मंदिराचे नव्या रुपाला सोन्याचीही झळाळी आहे. 145 किलो सोन्याचा वापर मंदिराच्या विविध भागात कऱण्यात आला असून, अत्यंत मनमोहक असलेल्या या मंदिराला दररोज हजारो भाविक भेट देत आहेत.
काळ्या ग्रॅनाईटच्या सहाय्यानं उभारण्यात आलेलं हे सर्वात मोठं मंदिर असल्याचे बोलले जाते. शास्त्रोक्तपद्धतीनं बनवण्यात आलेलं हे मंदिर एवढं सुंदर आहे की, ते बघण्यासाठी एक दिवस अपूर्ण पडतो. अयोध्येमध्ये सध्या भव्य राममंदिर उभारण्याचं काम चालू आहे.
राममंदिराचा अंदाजे खर्च 1100 करोड एवढा आहे. या यदाद्री मंदिराचा खर्च 1200 करोड असून, त्यापैकी हजार करोड खर्च झाले आहेत. मंदिराच्या सजावटीसाठी 140 किलो सोने वापरण्यात आले आहे. त्यापैकी 125 किलो सोने मंदिराच्या गर्भार गृहासाठी वापरण्यात आले आहे. काळ्या ग्रेनाइटवर केलेली ही सोन्याच्या सजावट डोळे दिवणारी आहे.
तेलंगाणामध्ये या श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराला यदाद्री मंदीर (Yadadri temple) किंवा यदागिरीगुट्टा मंदिर म्हणूनही ओळखले जाते. यदाद्री भुवनगिरीमधील यदागिरीगुट्टा या छोट्याशा गावातील एका टेकडीवर हे मंदिर उभारण्यात आले आहे. विष्णूचा अवतार असलेल्या नरसिंहाचा निवासस्थान म्हणूनही या स्थानाचा उल्लेख करण्यात येतो. 2016 मध्ये मंदिराचा विस्तार आणि पुनर्बांधणी सुरू झाली, नुकतेच हे काम पूर्ण झाले आहे.
=====
हे देखील वाचा: ज्यांनी इतिहासात शौर्य गाजवले, त्या महाराणा प्रताप सम्राटाचे वंशज सध्या काय करतात?
=====
स्कंद पुराणानुसार महर्षी ऋषी शृंगाच्या मुलांनी, यदा महर्षी यांनी नरसिंहाच्या रूपात भगवान विष्णूंची तपश्चर्या केली. या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन स्वामी त्यांच्यासमोर ज्वाला नरसिंह, गंडाभेरंद नरसिंह, योगानंद नरसिंह, उग्र नरसिंह आणि लक्ष्मी नरसिंह या पाच रूपांमध्ये प्रकट झाले. यामुळे डोंगरावर उभारलेल्या लक्ष्मी-नरसिंहदेव मंदिरात मुख्य गुहेत पाचही रूपातील नरसिंहाच्या देवता आहेत. (Yadadri temple)
मंदिर सभामंडपाच्या मागील बाजूस सुमारे 12 फूट बाय 30 फूट लांब गुहा आहे. यामध्ये लक्ष्मी-नरसिंहाच्या चांदीच्या अतिशय आकर्षक अशा मुर्ती आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या उजवीकडे हनुमान मंदिर आहे. हे अतिशय लोकप्रिय मंदिर आहे.
या मंदिराला भेट दिल्यास भक्ताची इच्छा पूर्ण होते अशी धारणा आहे. हैदराबादचे सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांनीही त्यांच्या काळात या मंदिराला 82,825 रुपयांचे अनुदान दिल्याची पुरातत्व खात्याकडे नोंद आहे.
पूर्णपणे दगडात बांधलेले हे मंदिर पूर्वी २ एकरावर बांधले गेले होते. मात्र मंदिराच्या नुतनीकरणानंतर जवळपास 14 एकरावर या मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले आहे. आता नुतनीकरणानंतर या मंदिराचे रुपडेच बदलले असून, या मंदिराभोवती सुंदर बगीच्यांचे जाळे गुंफले आहे.
=====
हे देखील वाचा: या मंदिरात शंकराच्या पिंडीशिवाय इतर कोणतीही मूर्ती ठेवल्यास ती होते गायब
=====
अत्यंत सुंदर असलेल्या या मंदिराला दररोज हजारो भाविक भेट देतात. येथे अत्यंत आधुनिक अशा प्रसाद निर्मिती यंत्रांचीही उभारणी करण्यात आली आहे. दर तासाला जवळपास पंधरा हजार लाडू येथे तयार होतात. तसेच पंधरा हजार भक्तांना एकाच वेळी प्रसादाचाही लाभ घेण्यात येतो.
या मंदिरात गरजूंना मोफत भोजनाचीही व्यवस्था आहे. याशिवाय अनेक लोकापयोगी उपक्रम मंदिरातर्फे राबवण्यात येत आहेत. त्यामुळे मंदिराची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
– सई बने