भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा चांगलाच चर्चेत राहिला. या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांदरम्यान अनेक करार झाले. भारताची UPI पेमेंट सिस्टम आता इस्रायलमध्येही उपलब्ध होणार आहे. तसेच भारत लवकरच इस्रायलसोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमधील जेरुसलेम येथील याद वाशेम होलोकॉस्ट स्मारकाला भेट दिली. त्या वेळी भावनिक झालेल्या पंतप्रधान मोदी यांनी याद वाशेमच्या संग्रहालयातील अतिथी पुस्तकात लिहिलेला संदेशही चर्चेचा विषय ठरला. याद वाशेममध्ये मानवतेच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांची आठवण करून दिली जाते. हे स्मारक केवळ भूतकाळातील शोक व्यक्त करण्याचे ठिकाण नाही, तर भावी पिढ्यांना अन्याय आणि द्वेषाविरुद्ध एकत्र उभे राहण्याची प्रेरणा देणारे ठिकाण आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात नमूद केले. ( Yad Vashem )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायलच्या दोन दिवसांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी जेरुसलेममधील याद वाशेमला भेट दिली. या भेटीदरम्यान ते भावनिक झाल्याचे दिसून आले. याद वाशेम हे जागतिक होलोकॉस्ट स्मरण केंद्र आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी होलोकॉस्टचे बळी ठरलेल्या सुमारे ६० लाख ज्यूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. होलोकॉस्ट म्हणजे काय, हे समजून घेणेही आवश्यक आहे. १९४१ ते १९४५ या कालावधीत नाझी जर्मनी आणि त्याच्या सहयोगी राष्ट्रांनी लाखो युरोपीय ज्यूंची योजनाबद्ध हत्या केली. या घटनेला “ज्यू नरसंहार” किंवा “नाझी अत्याचार” असे म्हटले जाते. छळछावण्या, गॅस चेंबर्स आणि सामूहिक गोळीबार यांसारख्या अमानवी पद्धतींनी ही कत्तल करण्यात आली. दरवर्षी २७ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन साजरा केला जातो. याद वाशेममध्ये त्या दिवशी सामूहिक प्रार्थना आयोजित केली जाते.
स्मारक परिसरात एक शाश्वत ज्योत प्रज्वलित आहे. या ज्योतीसमोर नतमस्तक होत पंतप्रधान मोदी यांनी ६० लाख ज्यूंच्या स्मृतीला वंदन केले. हे स्मारक त्याच्या अनोख्या वास्तुशैलीसाठी ओळखले जाते. ४४ एकर परिसरात पसरलेल्या या ठिकाणी मोठी वृक्षसंपदा असून, त्याचबरोबर एक गूढ शांतताही अनुभवता येते. १९५३ मध्ये इस्रायलच्या संसदेने (नेसेट) याद वाशेमची स्थापना केली. हे स्मारक पश्चिम जेरुसलेममधील माउंट हर्झलच्या पश्चिमेकडील उतारावर, माउंट ऑफ रिमेम्बरन्स येथे उभारण्यात आले आहे. जेरुसलेम जंगलालगत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा आहे. याद वाशेममध्ये दोन प्रमुख विभाग आहेत. एका विभागात होलोकॉस्ट संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था, संग्रहालय, ग्रंथालय, प्रकाशन गृह आणि आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट अभ्यास शाळा आहेत. दुसऱ्या विभागात होलोकॉस्ट इतिहास संग्रहालय, चिल्ड्रन्स मेमोरियल, रूम ऑफ रिमेम्बरन्स, होलोकॉस्ट कला संग्रहालय, शिल्पे, व्हॅली ऑफ द कम्युनिटीजसारखी बाह्य स्मारके आणि एक सिनेगॉग यांचा समावेश आहे. ( Yad Vashem )
=======
हे देखील वाचा : Durand Line Dispute: ड्युरंड रेषेमागची ब्रिटीश नीती
=======
याद वाशेमच्या स्थापनेमागील एक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे, होलोकॉस्ट दरम्यान वैयक्तिक जोखीम पत्करून ज्यूंना वाचवणाऱ्या गैर-यहूदी व्यक्तींना सन्मानित करणे. अशा व्यक्तींना “रायटियस अमंग द नेशन्स” म्हणून गौरवले जाते. याद वाशेममध्ये त्यांच्यासाठी विशेष विभाग आहे. याद वाशेम हे इस्रायलमधील सर्वाधिक भेट दिले जाणारे पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी सुमारे दहा लाख पर्यटक येथे भेट देतात. १५ मार्च २००५ रोजी येथे भव्य संग्रहालय संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. नवीन संग्रहालयाची रचना इस्रायली-कॅनेडियन वास्तुविशारद मोशे सफदी यांनी केली आहे. याद वाशेमचा उद्देश केवळ स्मरणापुरता मर्यादित नाही. येथे इस्रायल आणि जगभरातील शिक्षकांसाठी व्यावसायिक विकास अभ्यासक्रम घेतले जातात. विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना मदत केली जाते आणि शैक्षणिक साधनांची निर्मितीही येथे केली जाते. जगभरातील मान्यवर कलाकारांच्या कलाकृती येथे प्रदर्शित आहेत. होलोकॉस्टच्या इतिहासाच्या अभ्यास आणि शिक्षणासाठी याद वाशेम हे जगातील सर्वात महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक मानले जाते. ( Yad Vashem )
– सई बने
