Home » कोरोनापेक्षा घातक एक्स !

कोरोनापेक्षा घातक एक्स !

by Team Gajawaja
0 comment
X
Share

जगभर नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. ख्रिसमसच्या स्वागतासाठीही सगळीकडे उत्सहाचे वातावरण आहे. युरोपमध्ये सुरु असलेल्या या उत्सवाला एका भयानक आजाराची नजर लागण्याचा धोका आहे. कोरोनाची छाया गेल्यानंतर आता मनमोकळ्या वातावरणात साजरे होणारे सण पुन्हा एकदा भीतीच्या छायेत आले आहेत. कारण आफ्रिकन देशांमध्ये कोरोनापेक्षाही धोकादायक अशा एका रोगानं थैमान घातलं आहे. या रोगाचं नाव एक्स असून अवघ्या 25 दिवसात 80 हून अधिक लोकांचा यामुळे बळी घेतला आहे. तर अनेक लोक गंभीर आजारी आहेत. या आजाराची लक्षणं अतिशय घातक असून त्याचा फैलाव होण्याचा वेग पाहता जागतिक आरोग्य संघटनेनंही काळजी व्यक्त केली आहे. या एक्सबाबत तपासणी सुरु असून बाधिक रुग्णांच्या रक्ताचे नमुने अधिक तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या एक्समुळे जागतिक आरोग्य संघटनेनं वेळीच सावध व्हा, अशा इशारा जाहीर केला आहे. (X)

1 डिसेंबर, 2019 रोजी कोविड 19 नामक महामारीचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात नोंदवण्यात आला. ही फक्त एक सुरुवात होती. त्यानंतर अवघ्या जगावर या रोगाची छाया पसरली. सर्वत्र लॉकडाऊन लादण्यात आलं. कोरोनामुळे किती जण दगावले, याची खरी आकडेवारी कधीही समोर येणार नाही. दोन वर्षापूर्वी हे कोरोनाचे तांडव थांबले. पण या कोरोनापासून बचाव करण्यासाठी ज्या औषधांचा आधार मानवाला घ्यावा लागला आहे, त्याचे दुष्परिणाम आणखी कितीतरी वर्ष सहन करावे लागणार आहेत. आता या कोरोनाची आठवण काढण्यामागचे कारण म्हणजे, जगावर पुन्हा अशाच एका घातक महामारीची छाया पसरण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. बरोबर डिसेंबर महिना सुरु होतांना एक रहस्यमय आजार जगात दार ठोठावत आहे. आफ्रिकन देश काँगोला या आजाराने व्यापले असून आता कॉंगोबाहेरही हा आजार फैलावला आहे, का याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. (International News)

या अज्ञात आजाराने आतापर्यंत अवघ्या 25 दिवसांत 80 नागरिकांचा बळी घेतला आहे. या आजाराची लागण झालेल्यांचीही संख्या मोठी आहे. जवळपास आठवड्याच्या अवघीत 300 हून अधिक जणांना या एक्स नामक रोगाची लागण झाली आहे. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने संबंधित रुग्णांच्या रक्ताचे आणि थुंकीचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. काळजीचे कारण म्हणजे, कोरोनाची जी लक्षणे होती, तशीच लक्षणे यात असून गर्दीच्या ठिकाणी याचा फैलाव अधिक जलद गतीनं होत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं गर्दीच्या ठिकाणी लोकांनी वावरतांना काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. या आजाराची लक्षणे ताप आल्यासारखीच असतात. संक्रमित व्यक्तीला ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार होते. सुरुवातीला याकडे साधारण ताप म्हणून उपचार सुरु होतात. पण अगदी दोन दिवसातच या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होण्याची तक्रार वाढू लागते, आणि त्यात त्यांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे. (X)

========

हे देखील वाचा :  खजूर कोल्ड्रिंक !

=========

कॉंगोमध्ये या आजाराचे सर्वाधिक बळी किशोरवयीन पडले आहेत. वय वर्ष 15 ते वय वर्ष 18 असलेले मुले या रोगाला बळी पडल्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काँगोली नागरी समाजाचे नेते सिम्फोरियन मंझांजा यांनी संक्रमितामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्यानं चिंताजनक परिस्थिती असल्याचे सांगितले आहे. यामुळे या भागात आता गर्दिच्या ठिकाणी जाऊ नये, हात साबणानं स्वच्छ धुवावेत, तसेच पात्र आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय मृतदेहाला स्पर्श करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरुणांपाठोपाठ या एक्स रोगाला बळी पडलेल्या महिलांची संख्याही वाढत आहे. या भागातील महिला मोठ्या संख्येनं एक्सला बळी पडल्या असून त्यांना गंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे एक्समुळे अवघ्या कॉंगो शहरात खळबळ उडाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ञही येथे दाखल झाले आहेत. येथे पुरेशा औषधांचा अभाव असल्यामुळेही मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तत्पूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं कॉंगोमधून प्रवास करणा-यांनाही योग्य ती काळजी घेण्याची सूचना केली आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.