‘पाऊस आला कि सर्वात जास्त आनंद झालेला असतो तो झाडांना! उरलेल्या आठ महिन्यात त्यांना कितीही पाणी द्या, त्यांची कितीही मशागत करा, ती एवढी आनंदी कधीच दिसत नाहीत. पावसात झाडांकडे बघत बसलो की मला वेळेचे भानच राहत नाही.’
शं. ना. नवरे उर्फ शन्ना यांच्या कवडसे पुस्तकातील हा उतारा. यथार्थ शब्दात पावसाचे ‘आनंदी वर्णन’ यांत केले आहे, यांत तसूभरही शंका नाही!
दिलखुलास आणि प्रसन्न साहित्यिक अशी नवरे यांची ओळख. कथा, चित्रपट कथा, नाटक, ललित लेखन आणि स्तंभलेखन अशा सर्व लेखन प्रकारांत मनसोक्त हिंडत आपली लेखणी शेवटपर्यंत न थांबवणारे शन्ना नवरे. इतर अनेक लेखकांप्रमाणे आपले स्वतंत्र स्थान यांनी रसिकांच्या मनात निर्माण केलं होतं. ‘माणसांमध्ये रमणारे आणि माणसांवर लिहिणारे’ हे ज्येष्ठ साहित्यिक. कॉलेज जीवनापासून त्यांनी आपल्या कथा लेखनास सुरुवात केली. कथा लेखनाची भाषा अत्यंत साधी, सरळ आणि सोपी असायची. अवतीभवती वावरणाऱ्या माणसांवर आधारित पात्र त्यात होती. आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या लेखनासाठी उपयोग करून घेणारे हे पहिले लेखक नव्हेत! कॉलेजच्या वयात वाचनात आलेल्या ज्येष्ठ साहित्यिकांकडून त्यांनाही धडे मिळाले असावेत. परंतु गोष्टी सांगण्याची हातोटी आणि गप्पा मारण्याचा स्वभाव यामुळे त्यांनी अनेकांची मने जिंकली होती. याबाबत शन्ना इतर साहित्यिकांपेक्षा वेगळे होते! पण ते फक्त कथालेखनात गुंतून राहिले नाहीत. त्यांनी इतर लेखन प्रकारातही आपल्या प्रतिभेची छाप पाडली. सत्तर-ऐंशीच्या दशकात मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यथा आपल्या साहित्यातून मांडणारे शन्ना स्वप्नाळू, आनंदी आणि जगण्याचे बळ देणारे लेखन करत.
मध्यमवर्गीय वाचकांना जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारे हे शन्ना म्हणजेच शंकर नारायण नवरे. ते डोंबिवलीत राहत. डोंबिवलीतच ते लहानाचे मोठे झाले. लोकल बोर्ड शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण, तर डोंबिवलीच्या इंग्लिश स्कूलमध्ये आणि दादरच्या किंग जॉर्ज शाळेत यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. अस्सल डोंबिवलीकर असल्याने डोंबिवली आणि परिसरातील मध्यमवर्गीय माणसाच्या दैनंदिन बाबी त्यांनी जवळून पाहिल्या, अनुभवल्या आणि त्यावर लिखाण करत त्या इतरांसमोर आणल्या. डोंबिवलीत २००३ साली झालेल्या नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ‘गुंतता हृदय हे’ हे नाटक यांनी लिहिले आणि ते अमाप गाजले. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी कथा-पटकथा लेखनही केले आहे. ‘सत्यम शिवम सुंदरम’ या त्रिसूत्रीप्रमाणे लेखनानुभव मिळवून देणारे हे आघाडीचे साहित्यिक होते. आपल्याला मिळणारा आनंद साहित्याच्या माध्यमातून इतरांना देण्याचे मोलाचे आणि पुण्यात्मक कार्य यांनी केले.
‘मला जिथे जिथे आनंद मिळत गेला, तो आनंद मी इतरांना वाटत गेलो’, या त्यांच्या शब्दांतूनच त्यांची अन् त्यांच्या साहित्याची महती लक्षात येते. असा हा सदोदित आनंदी साहित्यिक! २०१३ मध्ये त्यांचे डोंबिवलीतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यावेळेस ते ८६ वर्षांचे होते. जन्मभूमी आणि कर्मभूमीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला!
अशा या ‘साहित्यातून आनंद साजरा करणाऱ्या लेखकाला’ सलाम !