Home » शुभस्य शीघ्रम!

शुभस्य शीघ्रम!

by Correspondent
0 comment
Tourism | K Facts
Share

रोजच्या दगदगीतून, धावपळीतून मनाला शांतता मिळावी म्हणून लोक एक मार्ग स्वीकारतात.. त्या मार्गाला कोणत्याही मर्यादा नसतात.. कोणताही ताण तणाव नसतो.. महिन्याला फोनचा रिचार्ज जसा गरजेचा असतो, तसाच हा मार्ग देखील!.. हा मार्ग म्हणजेच ‘पर्यटन’! मात्र पर्यटनक्षेत्र निवडताना काही नियम व अटी पाळाव्या लागतात. त्या अटी म्हणजे ते क्षेत्र खिशाला परवडणारे असावे आणि आरोग्यालाही! नियमांबद्दल आता न बोललेलं बरं; कारण आपण भारतीय ती गोष्ट कधीच गंभीरपणे घेत नाही. नियमांचं राहूदे, सध्या घराबाहेर पडण्याच्या कल्पनाही नकोत. चला तर मग घरबसल्या एक फेरफटका मारुया..

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, हे शालेय वयापासून आपण ऐकतच आहोत. पण कधी शांतपणे बसून (हातात मोबाईल न घेता) भारतातल्या पर्यटनाच्या ठिकाणांबद्दल म्हणजेच सर्वसामान्यांच्या भाषेत फिरायला जायच्या ठिकाणांबद्दल विचार केलाय का हो तुम्ही? दहापैकी आठ जण ‘नाही’ असंच उत्तर देतील. उरलेले दोन जण म्हणतील की कोरोना मध्ये कुठे पर्यटनाचा विचार करायचा? असो!

तर मुद्दा असा की पुढची युरोप ट्रीप कॅन्सल करून तुम्ही भारत-भ्रमण करायचं आहे! भारताच्या प्रत्येक टोकावरची टोकाची विविधता आणि समृद्धता तुम्हाला तिथे जायला भाग पाडेल, हे नक्की. त्या परदेशांच्या भानगडीत आपण आपल्या प्रदेशाचा इतिहास, भूगोलच विसरून गेलोय. त्यासाठी आपल्याला थेट इसवी सन पूर्व काळात जायचंय.. थेट..!

चंद्रगुप्त मौर्य आणि सेल्यूकस निकेटर (अलेक्झांडरचा भारतातील प्रतिनिधी) यांच्यातील करारामुळे ग्रीकांचा राजदूत म्हणून मेगास्थनेस भारतात आला तो इ. स. पू. ३०२ साली. राजदूत म्हणून काम करत असताना भारताच्या सौंदर्याने त्याचे लक्ष वेधून घेतले. मौर्य साम्राज्याच्या काळातील भारत, भारतातली जमीन, लोक, हवामान, माती अशा सूक्ष्म घटकांवर निरीक्षणात्मक लेखन करणारा मेगास्थनेस हा ‘इंडिका’ हे पुस्तक लिहिणारा थोर इतिहासकार ठरला. नंतरच्या काळातही अनेकांनी भारताविषयी उत्तमोत्तम लेखन केले. भारतातील पर्यटन वाढीसाठी देशांतर्गत पर्यटन विकास कार्यांनी हातभार लावला. प्रत्येक राज्यात पर्यटन वाढीसाठी स्वतंत्र आयोगही स्थापन करण्यात आले. पण म्हणतात ना ‘काखेत कळसा नि गावाला वळसा’.. तशी मानसिकताच तयार झालीय आपली. या सगळ्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी असणारा भारत देश पाहायचा राहून जाता कामा नये इतकंच. परदेशातून भारत पाहण्यासाठी अनेक मंडळी दरवर्षी येत असतात. पण आपल्याला तर परदेशाचे वेध लागलेले असतात. हेसुद्धा भारतात जन्मलेल्या योगसाधनेसारखेच झाले, नाही का?

एखाद्या प्रदेशाला पूर्णपणे जाणून घेण्यासाठी पर्यटनाशिवाय पर्याय नाही, हे अनेक उदाहरणांवरून लक्षात येईल. त्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जाहिरात क्षेत्रातलं. या क्षेत्रातही पर्यटन खूप महत्त्वाचे आहे, हे पियुष पांडे यांच्या ‘पांडे पुराण’ पुस्तकातून प्रत्ययास येते. राजस्थानच्या धर्तीवर एक जाहिरात बनवण्यासाठी त्यांनी चक्क राजस्थान गाठले! ती जाहिरात कुठेही सेट उभारून करता आली असती, पण शेवटी तिला राजस्थानचा ‘फील’ नसता आला. हा राजस्थानी टच मिळवण्यासाठी त्यांनी राजस्थानची सैर केली. कमाल ना!

भारतीय पर्यटनाबाबत काही गमतीजमती आहेत. त्यातल्या काहींचा संदर्भ इथे घेऊयात.

– २०१४ मध्ये असे निदर्शनास आले की, जगभरातील पर्यटनवाढीत भारताचा नंबर पहिला येतो.

– पर्यटनामुळे २०१४ ते २०२४ या दरम्यान जीडीपीत सरासरी ६.४% वार्षिक वाढ होण्याचा अंदाज होता (कोरोना नसता तर…..).

– गेले काही वर्ष भारतातील पर्यटनात झपाट्याने वाढ होत होती. एखाद्या भूप्रदेशावर गर्दी असेल तर ती स्पेस मधून ठिपक्यांच्या स्वरूपात दिसेल, बरोबर? २०११ च्या कुंभमेळ्यात इतकी गर्दी झालेली की स्पेस मधून ठिपके न दिसता तो पूर्ण भाग सपाट दिसत होता. स्वतंत्र ठिपके दिसण्यासाठी आवश्यक गॅपच नव्हता. इतकी भयंकर गर्दी!

– भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांमध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका पहिल्या स्थानी, बांगलादेश दुसऱ्या स्थानी तर युनायटेड किंगडम तिसऱ्या स्थानी आहे.

परदेशातले पर्यटक आहेत, पर्यटन क्षेत्रातले जॉब आहेत, पर्यटनाची गुणवत्ता आहे, मात्र कुठेतरी नियोजनाची कमतरता जाणवते. कोरोना आला तसं सगळं ठप्प झालं. गोव्यासारखे पर्यटनकेंद्रित राज्य दरवाजे बंद करून बसलं. आर्थिक गोष्टी बिघडल्या, सामाजिक प्रश्न उभे राहिले. विकास खुंटला. एकंदरीत काय तर प्रदेशाच्या विकासासाठी पर्यटन गरजेचं आहे. पर्यटनामुळे त्या त्या प्रदेशाची, त्या त्या समाजाची उन्नती होते. चहाच्या टपरी पासून ते टॅक्सीवाल्या पर्यंत सगळ्यांचाच पोटापाण्याचा प्रश्न सुटतो. पण कोरोनामुळे सगळंच बोंबललय. यातून मार्गही निघत आहेत. ‘फ्लाइट्स टू नोवेअर’ सारखे प्रकल्प मोठ्या कंपन्यांना पुन्हा स्थिरस्थावर करतीलही.. पण प्रादेशिक पर्यटनामुळे रोजगार बंद झालेल्या सर्वसामान्यांचा प्रश्न मात्र आणखी गुंतत चालला आहे.’घरबसल्या पर्यटन’ हा तसा बरा उपाय वाटतो. त्यामुळेही पर्यटन सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल.. बाकीच्यांचं माहित नाही! ६ महिने पाहुणचार करवून घेतलेला कोरोना काही इतक्या लवकर जाणार नाही. मग प्रादेशिक पर्यटनाचे आणि तिथल्या लोकांच्या रोजगाराचे काय होईल? खूप प्रश्न आहेत. उत्तरही मिळावीत लवकरच, अशी आशा आहे. शुभस्य शीघ्रम!

हुश्श.. दमला असाल भटकंती करून.. फेरफटका कसा वाटला, हे नक्की सांगा.. बरं का!

  • सोनल सुर्वे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.