टीव्ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग हे. आज आपल्या हातातल्या मोबाइलमध्येच टीव्ही देखील उपलब्ध आहे. मात्र घरी बसून सगळ्यांसोबत टीव्हीवर एखादा जुना सिनेमा, क्रिकेट मॅच, मालिका आदी अनेक गोष्टी बघण्याची मजा काही औरच आहे. टीव्हीची सर कोणत्या दुसऱ्या उपकरणाला नाही. असा हा टीव्ही सगळ्यांच्याच घरात असतो. टीव्हीशिवाय आता जगाची कल्पना देखील केली जात नाही. असा हा टीव्ही खूपच खास बर का. कारण टीव्ही हा फक्त मनोरंजन करत नाही, तर तो जगाला जोडण्याचे काम करतो.
टीव्हीला अनन्यसाधारण महत्व आहे. या टीव्हीचेच महत्व अधोरेखित करण्यासाठी २१ नोव्हेंबरला जागतिक दूरचित्रवाणी दिन अर्थात वर्ल्ड टेलिव्हिजन डे साजरा केला जातो. जगभर क्रांती घडवून आणणारा शोध म्हणजे टीव्ही. टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक गोष्ट जाणून घेऊ शकता. टीव्ही हे माहितीचे मोठे माध्यम आहे ज्याने समाजात परिवर्तन आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. आज जागतिक दूरचित्रवाणी दिनाच्या निमित्ताने आपण या टेलिव्हिजनचा इतिहास काय आहे?, भारतात त्याची सुरुवात कशी झाली? आणि हा जागतिक दूरचित्रवाणी दिवस का साजरा केला जातो ते जाणून घेऊ या.
आज प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे. कदाचित काही घरांमध्ये एकापेक्षा जास्त देखील टीव्ही असतील मात्र एक काळ असा होता जेव्हा एका गल्लीत, चौकात, परिसरात एकच टीव्ही असायचा. तो देखील एक छोटा ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा. त्या एका टीव्हीवर संपूर्ण आजूबाजूचा परिसर रामायण, महाभारत, बातम्या, मॅच पाहायचा. जुन्या काळात टीव्ही घरात असणे खूपच मोठी आणि मानाची बाब समजली जायची. हळू हळू काळ बदलला आणि टीव्हीचे स्वरूप देखील बदलले.
जागतिक दूरदर्शन दिनाची सुरुवात संयुक्त राष्ट्रांनी १९९६ मध्ये केली. त्याच वर्षी, संयुक्त राष्ट्रांनी पहिल्या जागतिक दूरदर्शन मंचाचे आयोजन केले होते. या फोरममध्ये जगातील सर्वच मोठ्या मीडियामधील व्यक्तिमत्त्वांनी टेलिव्हिजनच्या वाढत्या महत्त्वावर चर्चा केली. तेव्हा या माध्यमाचे भविष्यातील महत्व जाणून घेऊन संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने दरवर्षी २१ नोव्हेंबर हा जागतिक दूरदर्शन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
टीव्हीचा शोध कधी लागला?
टेलिव्हिजनचा शोध १९२७ मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन लोगी बेयर्ड यांनी लावला होता. परंतु, त्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूप देण्यासाठी ७ वर्षे लागली आणि १९३४ मध्ये टीव्ही पूर्णपणे तयार झाला. त्यानंतर २ वर्षातच अनेक आधुनिक टीव्ही स्टेशन्स सुरू झाली आणि टीव्ही हे लोकांच्या मनोरंजनाचे साधन बनले. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, २०२३ पर्यंत टेलिव्हिजन असलेल्या कुटुंबाची संख्या अंदाजे १.७३ अब्ज इतकी होती.
भारतातील टीव्हीचा इतिहास
भारतातल्या घरांमध्ये टेलिव्हिजन येण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागली. UNESCO च्या मदतीने १५ सप्टेंबर १९५९ रोजी नवी दिल्ली इथे टेलिव्हिजनची सुरुवात झाली. ‘ऑल इंडिया रेडिओ’ अंतर्गत टीव्ही सुरू झाला. ‘आकाशवाणी भवना’त टीव्हीचे पहिले सभागृह बांधण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्या सभागृहाचे उदघाटन करण्यात आले होते. तर भारतात टेलिव्हिजनचं पहिले रंगीत प्रसारण १५ ऑगस्ट १९८२ रोजी इंदिरा गांधींच्या भाषणाने झाले. यानंतर ऐंशीच्या दशकात बुनियाद, हमलोग, ये जो है जिन्दगी, नुक्कड सह रामायण, महाभारत या प्रेक्षकप्रिय मालिका सुरु झाल्या.
टीव्हीचं महत्त्व
ओटीटी प्लॅटफॉर्म असूनही लोकांचं टीव्हीवरील प्रेम आजही कमी झालेलं नाही. दैनंदिन जीवनात टीव्हीचे खूप महत्त्व आहे. हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर त्याद्वारे तुम्ही जगभरातील बातम्याही जाणून घेऊ शकता. या टीव्हीमुळे वेळ, पैसा, कष्ट आदी अनेक गोष्टी वाचल्या आहेत. आजच्या डिजिटल क्रांतीतही टीव्ही आपलं अस्तित्व टिकवून आहे.