Home » World Happiness Index 2022: फिनलँड ठरला आहे जगातील सर्वात आनंदी देश 

World Happiness Index 2022: फिनलँड ठरला आहे जगातील सर्वात आनंदी देश 

by Team Gajawaja
0 comment
World Happiness Index 2022
Share

जगात सर्वात सुखी कोण हा प्रश्न विचारला की, एक उत्तर नक्की झाले आहे, ते म्हणजे फिनलॅंडचे नागरिक.  गेल्या पाच वर्षापासून फिनलॅंड या देशाला जगात सर्वाधिक आनंदी देश म्हणून बहुमान मिळत आहे.  (World Happiness Index 2022)

गेल्या दहा वर्षापासून जगातील सर्वात आनंदी देश कोण… याचा शोध जागतिक स्तरावर काम करणाऱ्या काही संघटना घेत आहेत. त्यात गेली पाच वर्ष फिनलॅंड पहिल्या स्थानावर विराजमान आहे.  फिनलॅंडपाठोपाठ डेन्मार्क, आइसलॅंड, स्विझरलॅंड आणि नेदरलॅंड या देशांनीही आनंदी देशात नंबर मिळवला आहे. अमेरिका आणि ब्रिटन या यादीत अनुक्रमे 16व्या आणि 17व्या स्थानावर आहेत. अर्थात आपला देश, भारत या यादीत 139 स्थानावर आहे. आरोग्य आणि शिक्षण या दोन प्राथमिक गरजा मोफत देणाऱ्या फिनलॅंडचे वातावरण बघूया. (World Happiness Index 2022)

Nordiske-flag

गेल्या दहा वर्षापासून जगातील आनंदी देशांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यात जगभरातील 150 देशांचा अभ्यास करण्यात येतो. त्यात देशातील आर्थिक आणि सामिजीक जीवनमानाचा आढावा घेण्यात येतो. यासाठी संबंधित देशातील तीन वर्षांची आकडेवारी तपासली जाते. संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकाराने होणाऱ्या या गणतीमध्ये शून्य ते दहा पर्यंतचे गुण देशांना देण्यात येतात.  

फिनलॅंड देशच गेली पाच वर्ष आनंदी देश म्हणून बहुमान का मिळवत आहे, हे जाणण्यासाठी येथील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती बघणेही महत्त्वाचे आहे. फिनलॅंड हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संपन्न देश आहे. विशाल आणि घनदाट जंगले आणि त्यात असलेले उंच, फेसाळते धबधबे हे या देशाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शिवाय भ्रष्ट्राचार, लाचखोरी, गुन्हेगारी देशात अत्यल्प प्रमाणात आहे. 

फिनलॅंड उत्तर युरोपमधील युरोपियन युनियनचा सदस्य आहे. या देशाच्या पश्चिमेला स्विडन, पूर्वेला रशिया, उत्तरेला नॉर्वे आणि पश्चिमेला बोथनियाचे आखात आहे. फिनलॅंडची लोकसंख्या 5.5 दशलक्ष असून 338,455 चौरस किलोमीटर (130,678 चौरस मैल) असे एकूण क्षेत्रफळ या देशाचे आहे. हेलसिंकी ही देशाची राजधानी आणि देशातील सर्वात मोठे शहर आहे.   

एस्पू, काउनियानेन आणि वांता ही त्यापाठोपाठ मोठी शहरे येथे आहेत. फिनलॅंडमध्ये दोन भाषा अधिकृत मानल्या जातात. त्यामध्ये फिन्निश आणि स्विडीश भाषेचा समावेश आहे. 1906 मध्ये, फिनलॅंड हा सार्वत्रिक मताधिकार देणारा पहिला युरोपीय देश झाला. त्याचबरोबर प्रौढ नागरिकांना सार्वजनिक पदासाठी निवडणूक लढविण्याचा अधिकार देणारा जगातील पहिला देश ठरला. (World Happiness Index 2022)

रशियाचा शेवटचा झार निकोलस दुसरा याने फिनलॅंडला रशियन बनवण्याचा आणि या देशाची राजकीय स्वायत्तता संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु 1917 च्या रशियन क्रांतीनंतर फिनलॅंडने रशियापासून स्वतःला स्वातंत्र्य घोषित केले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, फिनलॅंडने सोव्हिएत युनियन आणि जर्मनीबरोबर लढा दिला. युद्धांनंतर, फिनलॅंडने आपल्या प्रदेशाचा काही भाग गमावला, ज्यात सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण शहर वायबोर्गचा समावेश आहे.  

१९५० च्या दशकापर्यंत फिनलॅंड हा जवळपास शंभरटक्के कृषीप्रधान देश होता. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर फिनलॅंडने वेगाने विकास केला. औद्योगिकीकरण केले. प्रगत अर्थव्यवस्था विकसित केली. याचा परिणाम म्हणून देशाच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली.  

नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारला. 1955 मध्ये फिनलॅंड संयुक्त राष्ट्रात सामील झाला. शिक्षण, आर्थिक, नागरी स्वातंत्र्य, जीवनाचा दर्जा आणि मानवी विकासासह राष्ट्रीय कामगिरीच्या असंख्य मापदंडामध्ये फिनलॅंडने  पहिले स्थान मिळवले. (World Happiness Index 2022)

====

हे देखील वाचा: व्हेटो पॉवर (Veto Power) – आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता गाजवण्यासाठी वापरलं जाणारं साधन! 

====

1960 च्या उत्तरार्धात फिनलॅंडमध्ये हृदयविकारामुळे मृत्यूचे प्रमाण जगात सर्वाधिक होते. या समस्येचा सामना करण्यासाठी नॉर्थ करेलिया प्रकल्प नावाचा दीर्घकालीन राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम तयार करण्यात आला. या प्रयत्नाने लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने लोकप्रिय यश मिळवून दिले आहे.  हृदयविकाराचे रुग्ण कमी झाले. 

आता हा फिनलॅंडचा प्रयोग अन्य देशातही वापरण्यात येऊ लागला आहे. देशात साधारण तीनशे नागरिकांमागे एक डॉक्टर असतो. वैद्यकीय सुविधा मोफत असल्यातरी त्यांचा कर नागरिकांकडून घेण्यात येतो. पण त्याचे प्रमाण अल्प आहे. (World Happiness Index 2022)

फिनलॅंडची शिक्षण प्रणालीही खास आहे. देशात 7 ते 16 वयोगटातील सर्वांसाठी शिक्षण अनिवार्य आहे. माध्यमिक शाळेनंतर, पदवीधर एकतर थेट कर्मचारी वर्गात प्रवेश करू शकतात किंवा ट्रेड स्कूल किंवा व्यायामशाळेत (उच्च माध्यमिक शाळा) अर्ज करू शकतात. ट्रेड स्कूलमध्ये व्यावसायिक शिक्षण देण्यात येते. अंदाजे चाळीस टक्के नागरिक माध्यमिक शाळेनंतर व्यावसायिक शिक्षणाचा पर्याय स्विकारतात.   शिक्षणाचा सर्व खर्च हा सरकारचा असतो.  

====

हे देखील वाचा: Expo 2020: आकाशातील फिरते गार्डन, 360 डीग्रीमध्ये फिरते घर… दुबई एक्सपोची अदभूत दुनिया

====

सर्व शिक्षण संस्थातील अभ्यासक्रमाची वार्षिक तपासणी करण्यात येते. त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतात. फिनलॅंडमध्ये 15 विद्यापिठे असून 24 विज्ञान विद्यापिठे आहेत. येथील हेलसिंकी विद्यापीठ जागतिक सर्वोच्च विद्यापीठ क्रमवारीत 75 व्या स्थानावर आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनेही फिनलॅंडच्या शिक्षणाला जगात प्रथम क्रमांक दिला आहे. येथील तेहतीस टक्के नागरिक हे उच्चविद्याविभूषीत आहेत. (World Happiness Index 2022)  

प्रौढ मंडळीही शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर आहेत. व्यावसायिक शिक्षण घेण्याकडे त्यांचा अधिक कल दिसून आला आहे. संशोधनाच्याबाबतीतही फिनलॅंड आघाडीवर आहे. वैज्ञानिक विषयांवरील लेख आणि संशोधन पेपर या देशातून सर्वाधिक प्रमाणात प्रकाशित होतात. तसेच 2007 मध्ये फिनलॅंडमध्ये तब्बल 1801 पेटंट दाखल करण्यात आले. (World Happiness Index 2022)

येथे इंग्रजी भाषेलाही तेवढेच महत्त्व देण्यात आले आहे.  येथील विद्यापिठांमध्ये इंग्रजीमध्ये शिकवले जाणारे अनेक पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय देशातील विद्यार्थ्यांना इतर देशांतील विद्यापिठांमध्येही उच्चशिक्षण घेण्यासाठी पाठवले जाते. अर्थातच शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा मोफत दिल्यास भारताचाही नंबर पहिल्या पन्नासमध्ये तरी येईल हे नक्की…

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.