मनुष्याला जगण्यासाठी तीन महत्वाच्या गरजा असतात. यातली पहिली आणि सर्वात जास्त आवश्यक असलेली गरज म्हणजे अन्न. अन्नाशिवाय माणूस जगूच शकत नाही. आपल्याला दोन वेळा नीट जेवायला मिळावे यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपड करत असते. पंचपक्वान्न नाही मात्र पोट भरेल इतके जरी मिळाले तरी सगळ्यांना समाधान असते. परंतु आज जिथे काळ चंद्रावर, मंगळावर पोहचत आहे, त्याच काळात जगात लाखो करोडो लोकं उपाशी झोपत आहे. ही तफावत मोठी दुर्दैवी आहे. एकवेळ अन्नासाठी मारामार करणारे आणि दुसरीकडे सर्रास अन्नाची नासाडी करणारे लोकं हेच या आधुनिक काळाचे सत्य आहे.
पुरेसे अन्न न मिळाल्याने जगात कुपोषणाची मोठी समस्या उद्भवत आहे. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये देखील हे चित्र भयाण आहे, अनेक लोकांचा मृत्यू भुकेमुळे होत आहे तर अनेक मुलं कुपोषणाला बळी पडत आहे. आज १६ ऑक्टोबर जागतिक अन्न दिन. आजचा दिवस संपूर्ण जगात अन्न दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. अन्न जपून वापरावे आणि उरलेले, अधिकचे अन्न फेकून न देता गरजू व्यक्तीला देत तिची भूक शमवावी हा या मागचा हेतू आहे.
जागतिक अन्न दिन दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. १९८१ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांना उपासमारीची जाणीव करून देणे हा तर आहे. सोबतच पौष्टिक आणि सकस आहार घेतल्यामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती करून देणे देखील आहे. आपल्या शरीराला अन्नातूनच सर्व आवश्यक पोषक गोष्टींचा पुरवठा होतो. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आरोग्यावर त्याचे नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
जागतिक अन्न दिन १६ ऑक्टोबर रोजी जगभरात एकत्रितपणे साजरा केला जातो. या दिवशी १९४५ मध्ये FAO ची स्थापना झाली. FAO चे पूर्ण नाव अन्न आणि कृषी संघटना आहे. ही संस्था अन्न सुरक्षा आणि पोषण संदर्भात काम करते. या अंतर्गत लोकांना अन्नाबद्दल आणि त्यातील पोषक गोष्टींबद्दल जागरूक केले जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळे १९७९ साली FAO च्या काँग्रेसने जागतिक अन्न दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.
सध्या जगातील अनेक देश दारिद्र्यरेषेखाली असून अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत. त्या देशांतील लोकांना दररोज नीटसे जेवायला देखील मिळत नाही त्यामुळे संतुलित आहार तर खूप दूर आहे. हेच कारण आहे की अशा देशांमध्ये कुपोषित लोकांचे प्रमाण मोठ्या संख्येने आहे आणि त्यात वाढ होत आहे. शिवाय असे लोकं इतरही अनेक आजारांना बळी पडत आहे. कुपोषणामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होतो. यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात जागतिक अन्न दिन साजरा केला जातो.
======
हे देखील वाचा : उमर बिन लादेनला फ्रान्सने केले गेट आऊट
======
दरवर्षी अन्न आणि कृषी संघटना (FAO) द्वारे जागतिक अन्न आव्हाने अधोरेखित करण्यासाठी एक थीम तयार करते आणि तिची घोषणा करते. यंदा २०२४ वर्षाची अन्न दिनाची थीम आहे ‘उत्तम जीवन आणि चांगल्या भविष्यासाठी अन्नाचा अधिकार’ अशी ठेवण्यात आली आहे. या थीमचा उद्देश लोकांना अन्न आणि निरोगी जीवनाबद्दल जागरूक करणे हा आहे. सोबतच अन्न हे फक्त मानवांसाठीच नाही तर प्रत्येक सजीवासाठी आवश्यक आहे कारण त्याद्वारे आपण जगू शकतो. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर आपल्याला अन्न मिळाले नाही तर आपण केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही आजारी पडतो.