Home » World Cancer Day: दरवर्षी वाढणारा कॅन्सरचा विळखा आणि जागतिक कर्करोग दिन

World Cancer Day: दरवर्षी वाढणारा कॅन्सरचा विळखा आणि जागतिक कर्करोग दिन

by Team Gajawaja
0 comment
World Cancer Day Marathi info
Share

दरवर्षी, फेब्रुवारीमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’च्याही आधी आणि ४ तारखेला ‘जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day)’ जगभरात साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनासाठी (World Cancer Day) एक थीम निश्चित करण्यात येते. यावर्षीची थीम आहे ‘Close the Care Gap’. जगभरातील कॅन्सर रुग्णांची काळजी घेताना त्यामध्ये येणारे अडथळे, त्यामधल्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करणे, हा या थीमचा अर्थ आहे. 

यावर्षी २०२२ च्या अर्थसंकल्पात  सिगारेट आणि तंबाखूचे भाव वाढवण्यात आले. त्यामुळे सिगारेट ओढणाऱ्या आणि तंबाखू खाणाऱ्यांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. तोंडाचा कर्करोग होण्यास हातभार लावणाऱ्या तंबाखूचे भाव वाढल्यामुळे का होईना हा विषय चर्चेत आला. दरवर्षी ४ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या जागतिक कर्करोग दिनाच्या (World Cancer Day) आधी तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेटचे भाव वाढवले जातात, पण व्यसन करणारी मंडळी काय तंबाखूजन्य पदार्थ खाणं सोडत नाहीत. 

जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास पहिला तर कळून येते की, सन १९३३ या वर्षी ‘युनिअन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल’ या संस्थेने स्वित्झर्लंड देशातील जिनिव्हा शहरातून ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या कमी करणे आणि यामुळे होणारे मृत्यू आटोक्यात आणून, या रोगाबद्दल जनजागृती करणे, हा मुख्य हेतू या दिवसामागे आहे. 

युनिअन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामधून कॅन्सरच्या संदर्भातील माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी कॅन्सर या एका आजारातून किती रुग्णांचा मृत्यू होतो याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या सर्वेक्षणानुसार – तंबाखू उत्पादनामधून जानेवारी २०२० मध्ये थोड्या- थोडक्या नव्हे, तर ६३ टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातूनही ५४ टक्के लोकांचा मृत्यू सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे झालेल्या कॅन्सरमुळे, तर २८ टक्के रुग्णांना व्यायामाच्या अभावामुळे कर्करोगाची लागण झाली होती. 

=====

हे देखील वाचा: रतन टाटांनी असा घेतला होता फोर्डने केलेल्या अपमानाचा बदला (TATA’S way of Revenge)

=====

कर्करोग या आजाराबद्दल अनेकांच्या मनात भीती आणि गैरसमज आहेत. काही लोकांना असं वाटतं की, कर्करोग हा श्रीमंत आणि वृद्ध लोकांना होणार आजार आहे. पण हा समज संपूर्णतः चुकीचा आहे. हा आजार कोणालाही होऊ शकतो. काही लोकांना असेही वाटते की, कर्करोग झाला म्हणजे, आता आपलं आयुष्य संपलं, आता आपला मृत्यू होणार. पण या आजारातून पूर्णपणे बरे होऊन आपलं आयुष्य पूर्ववत सुरु करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्णपणे बरे झालेले कर्करोगाचे रुग्ण सर्वसामान्यांप्रमाणे समाजात वावरू शकतात आणि त्यांचे आयुष्य सुखाने जगू शकतात. 

काही वर्षांपूर्वी क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने कॅन्सरवर मात करून आपले क्रिकेट करिअर पुन्हा सुरु केले. प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला हिला २०१२ मध्ये या आजाराची लागण झाली होती. त्यावेळी केमोथेरपी दरम्यान तिच्या डोक्यावरचे संपूर्ण केस निघून गेले होते. तिचे हे फोटो सर्वत्र  होते. तिला चौथ्या स्तरावरील कर्करोगाची लागण झाली होती. त्यामुळे तिने जवळपास ४ महिने केमोथेरपीसाठी अमेरिकेत उपचार घेतले आणि त्यानंतर मोठ्या दिमाखात २०१५ साली या जीवघेण्या आजारावर मात करून संपूर्णतः बरी झाली. अलीकडेच सोनाली बेंद्रेनेही असेच फोटो पोस्ट केले होते. डोक्यावरचे केस निघून गेलेले  तिचे  फोटोज, तिने कॅन्सरवर केलेली मात आणि एकूणच तिच्या कॅन्सर लढ्याची, सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांमध्येही भरपूर चर्चा झाली होती. तिने जिद्दीने आणि संयमाने आजाराचा सामना केला.

कर्करोगाच्या लढाईत सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. ४ फेब्रुवारी या दिवशी जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्त (World Cancer Day) जगभरात सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या माध्यमातून रॅली, व्याख्याने घेऊन वेग वेगळे उपक्रम राबवले जातात. कर्करोगापासून कसा बचाव करता येईल याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाते.

सामान्य लोकांना या माध्यमातून आजारापासून लांब कसे राहता येईल याबाबत प्रामुख्याने माहिती दिली जाते. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे महिलांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. जगभरात लोकांना कर्करोगापासून लांब कसे राहता येईल यावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात. 

World Cancer Day

तंबाखूचा वापर, जास्त वजन, आहारात भाज्या आणि फळांचा कमी वापर, व्यायाम न करणे, जास्त प्रमाणात अल्कोहोल घेणे, वायुप्रदूषण, धूम्रपान आणि प्रखर उन्हात जास्त वेळ राहिल्याने कर्करोग होण्याचा धोका असतो. या रोगाच्या बाबतीत लोकांनी अनेक गैरसमज करून घेतले असून त्याबाबत समाजात जागृती होणे गरजेचे आहे. 

समाजात कर्करोग झालेल्या रुग्णांकडे बघायचा दृष्टिकोन समाजाने बदलायला हवा. या आजारपणात रुग्णाला मानसिक आधाराची नितांत गरज असते. जेव्हा आपल्या पाठीशी कोणीतरी आहे असा विश्वास मिळतो तेव्हा आजाराशी लढण्याचे बळ लाखमोलाने वाढते. कर्करोगाचा लढा हा तुम्हा आम्हा सर्वांचा आहे, त्याच्याशी मिळून लढूया. 

– विवेक पानमंद 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.