दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर एकामागोमाग एक असे धक्कादायक खुलासे होत आहेत. या बॉम्बस्फोटातील आरोपी डॉ. शाहीन हिच्याबाबत झालेल्या खुलाशांमुळे अवघ्या देशाला धक्का बसला आहे. डॉक्टरी पेशात असलेली शाहीन ही जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेची महिला ब्रिगेड भारतात उभी करत होती. जैशचा प्रमुख मसूद अझहरच्या बहिणीच्या संपर्कात शाहीन होती. त्यावरुनच जैश-ए-मोहम्मद आता भारतीय महिलांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करत असल्याचे उघड झाले. या बातमीला दुजोरा मिळणारी आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा जमात-उल-मोमिनत पाकव्याप्त काश्मिरमध्ये सक्रिय आहे. खुद्द दहशतवादी मसूद अझहरनेच हा खुलासा केला असून या महिला शाखेत ५,००० महिला जिहादींची भरती करण्यात आली आहे. शिवाय या महिलांना आत्मघातकी बॉम्बर बनण्यासाठी तयार करण्यात येत असल्याचीही माहिती स्वतः मसूदने दिली आहे. यामुळे भारतासह जगभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. (Jaish-e-Mohammed)

भारताची राजधानी दिल्लीमध्ये १० नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६:५० वाजता झालेल्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे डॉक्टर शाहीनसोबत जोडले गेले. त्यानंतर या शाहीनची चौकशी झाल्यावर त्यातून मिळालेल्या माहितीमुळे देशभरात अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. शाहीन ही जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा जमात-उल-मोमिनतची भारतात उभारणी करत होती. डॉक्टर असलेल्या शाहीनने अनेक महिलांच्या यासाठी भेटी घेतल्याचे उघड होत आहे. अद्यापही या सर्व प्रकरणाचा तपास सुरु असतांनाच आता जैशचा प्रमुख मसूद अझहरनं महिला दहशतवादी ब्रिगेड संदर्भात केलेल्या खुलाशामुळे चिंता व्यक्त होत आहे. (International News)
दहशतवादी मसूद अझहर पाकिस्तानमध्ये असून जिहादच्या नावाखाली आता त्यानं महिलांनाही दहशतवादी बनवण्यास सुरुवात केली आहे. जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेचे नाव ‘जमात-उल-मुमिनत’ आहे. मसूदला आपल्या या महिला दहशतवादी शाखेचा एवढा अभिमान आहे की, त्यानं यासंदर्भात स्वतः या संदर्भात सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे. या महिला दहशतवादी ब्रिगेडमध्ये थोड्याथोडक्या नव्हे तर ५ हजार महिलांची भरती झालेली आहे. आता या महिलांचे ब्रेनबॉश करुन त्यांना आत्मघातकी प्रशिक्षण दिले जात आहे. या महिला दहशतवादी बॉम्बर बनून स्वतःसोबत इतरांना मारण्यास तयार होत असल्याचे मसूदने सांगितले आहे. सोबतच महिला दहशतवाद्यांची संख्या एवढी वाढली आहे की, आता जमात-उल-मुमिनतच्या शाखा प्रत्येक जिल्ह्यात उघडण्याची गरज भासणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ही महिला ब्रिगेड दहशतवादी होण्याचे प्रशिक्षण घेत आहे. या महिलांचे ब्रेनवॉश करण्यात येत असून दहशतवादी म्हणून त्यांना मरण आल्यास त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल, शिवाय त्यांच्या कुटुंबाला त्यांचा अभिमान वाटेल, असेही सांगण्यात येत आहे. (Jaish-e-Mohammed)

वास्तवामध्ये ज्या महिला या जमात-उल-मोमिनत मध्ये सामिल झाल्या आहेत, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती दहशतवादी म्हणून मरण पावली आहे. बहुतांशी महिलांचा नवरे जैशमध्ये दहशतवादी होते. हे दहशतवादी मारले गेल्यावर त्यांच्या विधवांची अवस्था ही अतिशय दारुण झालेली आहे. त्यांच्यावर कुटुंबाचा भार आहे. मुलांची जबाबदारी आहे. पण पैसे कमवण्याचे कुठलेही साधन नाही. अशा महिला पैसे मिळवण्यासाठी आणि आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी कुठल्याही थराला जाण्यास तयार आहेत. अशाच महिलांना हेरुन जमात-उल-मोमिनतमध्ये सामिल करण्यात येते. याबदल्यात त्यांना भरपूर पैसे दिले जातात, आणि त्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागवल्या जातात. या महिलांना मग जिहादची माहिती देत, आत्मघाती बॉम्बर बनण्यासाठी शारीरिक प्रशिक्षण देखील दिले जात आहे. दहशतवादी संघटनेत दहशतवादी जेवढा कट्टर तेवढा त्याला मिळणारा मोबदला अधिक असतो. (International News)
========
हे देखील वाचा : Pakistan : वेटींग लिस्टवर मुनीर !
========
त्यामुळे अधिक पैशाच्या मोबदल्यात या महिला बॉम्बर बनण्यासाठीही तयार होत आहेत. दहशतवादी मसूद अझहरने त्याची बहीण सादिया अझहर हिच्यावर जमात-उल-मोमिनतची जबाबदारी सोपवली आहे. मिळालेल्या महितीनुसार मसूदची आणखी एक बहिण समायरा अझहर आणि पुलवामा हल्ला करणाऱ्या उमर फारूकची पत्नी आफिरा फारूक या सुद्धा जमात-उल-मोमिनतचे काम पहात आहेत. महिलांना ऑनलाइन जिहादचे व्याख्यान देत बॉम्बर बनून मरण आल्यास त्याचे किती फायदे आहेत, हे सांगत आहेत. जैशच्या या सर्व कारवाया पाकव्याप्त काश्मिरमध्ये चालत असून डॉक्टर शाहीनप्रमाणेच अन्य किती महिला या जमात-उल-मोमिनतच्या जाळ्यात अडकल्या आहेत, याचा तपास आता करण्यात येत आहे. (Jaish-e-Mohammed)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
