युद्धाच्या बातम्या येत असलेल्या युक्रेनमधून एक नवी बातमी आली आहे. ती म्हणजे, युलिया स्विरिडेन्को युक्रेनच्या नवीन पंतप्रधान झाल्या आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युलिया स्विरिडेन्को यांची युक्रेनच्या नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. याआधी युलिया या अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होत्या. युक्रेनच्या राजकारणात त्यांना महिलांच्या आणि तरुणांच्या प्रतिनिधी म्हणून बघितले जात आहे. अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही वाटाघाटी करतांना युलिया यांची भूमिका महत्त्वाची होती. संरक्षण उद्योगाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणा-या युलिया या भविष्यात युक्रेनमधील सर्वात शक्तिमान नेत्या असतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Yulia Sviridenko)
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युलिया स्विरिडेन्को यांची देशाच्या नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. युलिया या युक्रेनच्या उपपंतप्रधानही असून त्या तेथील प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आहेत. अमेरिका-युक्रेन खनिज कराराबाबत युलिया यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे अमेरिकेलाही झुकते घ्यावे लागले होते, त्यामुळे युक्रेनचे पुढचे भविष्य म्हणूनही युलिया स्विरिडेन्को यांच्याकडे बघितले जात आहे. आता युलिया युक्रेनच्या पंतप्रधान होणार आहेत, यामुळे रशिया-युक्रेन युद्धाबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. युक्रेनमध्ये 2019 पासून झेलेन्स्की यांचा पक्ष ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ 254 जागांसह बहुमतात आहे. त्यामुळे संसदेत युलिया यांच्या निवडीला पूर्णपणे पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. युलिया यांची ही निवड महत्त्वाच्या घडामोडींना चालना देणारी ठरणार आहे. युक्रेनला लष्करी, आर्थिक आणि राजनैतिक पातळीवर ताकद दाखवायची आहे. (International News)
यात प्रशासकीय अनुभव, आंतरराष्ट्रीय संबंधांवरची पकड योग्य निर्णय क्षमता असलेल्या युलिया या युक्रेनच्या राजकारणाचा नवा चेहरा ठरणार आहेत. युलिया यांच्या निवडीचे युक्रेनमध्ये स्वागत झाले आहे, तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांचे स्वागत केले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात झालेला वाद मिटवण्यात युलिया यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळेच अमेरिकेतही त्यांच्या या निवडीनं दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध दृढ होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. युलिया स्वीरिडेन्को यांचा जन्म 25 डिसेंबर 1985 रोजी युक्रेनमधील चेर्निहिव्ह येथे झाला. 2008 मध्ये त्यांनी कीवमधील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ट्रेड अँड इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. (Yulia Sviridenko)
त्यानंतर एका खाजगी रिअल इस्टेट कंपनीत अर्थशास्त्रज्ञ आणि सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी स्विकारली. त्यांच्या अभ्यासामुळे 2011 मध्ये त्यांना चीनच्या वूशी शहरात चेर्निहिव्हच्या व्यापार मोहिमेचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. येथूनच त्यांनी राजकीय जीवनात प्रवेश केला. 2015 मध्ये युलिया स्थानिक सरकारच्या सल्लागार म्हणून निवडल्या गेल्या. दोन वर्षातच, 2017 मध्ये त्यांना डेप्युटी गव्हर्नर बनवण्यात आले. या सर्व कालावधीत युलिया यांनी युक्रेनमध्ये सर्वात जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न केले. फक्त दोन वर्षाच्या कालावधीत युलिया यांनी देशात $340 दशलक्ष परकीय गुंतवणूक आणली. यामुळे आर्थिक वाढीच्या बाबतीत युक्रेनमध्ये प्रथम क्रमांकावर आला. यामुळे 2019 मध्ये राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी त्यांची आर्थिक व्यवहार उपमंत्री म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर वर्षभरातच त्या आर्थिक विकास, व्यापार आणि कृषी विभागाच्या पहिल्या उपमंत्री झाल्याच शिवाय राष्ट्रपती कार्यालयाचे उपप्रमुख म्हणूनही त्यांना नियुक्त करण्यात आले. (International News)
=============
हे ही वाचा : Britain : ब्रिटनचे आई-वडिल गुन्हेगारांच्या नावाच्या प्रेमात !
==========
2021 मध्ये जेव्हा रशियानं युक्रेनसोबत युद्ध सुरु केलं, तेव्हा युक्रेनची आर्थिक स्थिती बिघडणार अशी शक्यता जगभर व्यक्त होत होती. मात्र युलिया यांनी अत्यंत कुशलपणे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला सांभाळले, शिवाय परकीय गुंतवणुकही वाढवली. त्यामुळे झेलेन्स्की यांच्यापाठोपाठ युक्रेनमध्ये सर्वात शक्तिशाली नेत्या म्हणून युलिया यांचा उल्लेख होऊ लागला. अलिकडे युक्रेन आणि अमेरिका यांच्यात झालेला करारही युलिया यांच्यामुळेच पूर्ण झाला. यातून ग्रेफाइट, युरेनियम, टायटॅनियम, लिथियम यासह अनेक मौल्यवान आणि दुर्मिळ खनिजांचा वापर अमेरिकेला करता येणार आहे. यात अमेरिकेला या खनिजांच्या उत्खननावर कोणतेही बंधन नको होते. पण युलिया यांनी अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता युक्रेनलाही या करारातून फायदा मिळवून दिला आहे. तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वाची चर्चा जगभर सुरु आहे. (Yulia Sviridenko)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics