अफगाणिस्थानमध्ये तालिबानी शासनामध्ये गेलेलं बालपण…शिक्षणाची प्रचंड ओढ…मग तालिबानी अतिरेक्यांपासून वाचण्यासाठी मुलगा बनून दोन तासांचा पायी प्रवास…आसपास घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना जगाला समजाव्या म्हणून चक्क आपल्या साठलेल्या पैशातून एका न्यूज मिडीयाची निर्मिती आणि पत्रकार म्हणून काम…हे सगळं अशक्यप्राय वाटणारं आयुष्य आहे, अफगाणी पत्रकार जहरा जोया (zahra joya) हिचे.
टाईम मॅगजीनने ‘वुमेन ऑफ द ईयर’ म्हणून गौरविलेल्या ‘जहरा जोया (zahra joya)’ हिचे बालपण तालिबानी शासनामध्ये गेले. अर्थात त्यानंतर अफगाणी जनतेनं मोकळा श्वास घेतला…पण महिलांवरील अत्याचारात फरक पडला नाही. अशावेळी जहरानं आपलं स्वतःचं चॅनेचलच चालू केलं. आता परत अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यावर लंडनमध्ये स्थलांतरीत झालेली जहरा अजूनही आपल्या ध्येयावर ठाम आहे. अफगाणी महिलांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचा तिचा ध्यास आहे.

टाइम मॅगझीनने ‘वुमेन ऑफ द ईयर म्हणून केल्यावर जहरा जोया (zahra joya) हिचं नाव जाहीर केल्यावर तिचा लढा जगासमोर आला. अफगाणिस्थानमध्ये अल्पसंख्यक असलेल्या हजारा समुदायाच्या एका परिवारामध्ये जहराचा जन्म झाला.
तालिबानी शासनामध्ये महिलांना बाहेर पडायलाच बंदी होती. त्यात मुलीचे शिक्षण तर अशक्यप्राय होते. पण लहानपणापासून लढवय्या असलेली जहरा, शिक्षणासाठी मुलांचे कपडे घालून शाळेत जायची. यासाठी तिला रोज दोन तासांची पायपीट करावी लागायची.
अनेकवेळा तालिबानी अतिरेक्यांचा सामना व्हायचा. पण काहीतरी नवीन शिकायचे या ध्यासापोटी तिनं शालेय शिक्षण मुलगा बनून पूर्ण केलं. अफगाणिस्थानमध्ये महिलांना मिळत असलेल्या दुय्यम स्थानामुळे दुःखी झालेल्या जहरानं आपल्या खाऊच्या पैशातून ‘रुखसाना मिडीया’ नावाची एक न्यूज एजन्सी चालू केली.
====
हे देखील वाचा: या कारणासाठी वयाच्या ८० व्या वर्षीही डॉ भगवती ओझा यांना ‘यंग गर्ल’ म्हटलं जातं
====
‘रुखसाना मिडीया’च्या माध्यमातून अफगाणिस्थानमधील महिलांचे आयुष्य, त्यांच्यावर होणारे अत्याचार आदींची माहिती जगासमोर मांडायला तिने सुरुवात केली. अफगाणिस्थानमध्ये स्थापन झालेली ‘रुखसाना मीडिया’ ही संपूर्ण महिलांसाठी काम करणारी पहिली न्यूज एजन्सी ठरली.
तालिबानी शासन जेव्हा अफगणिस्थानवर लागू करण्यात आलं तेव्हाही जहरानं आपली पत्रकारीता चालू ठेवली होती. अर्थात यासाठी तिला अनेक धोक्यांना सामोरे जावे लागले.
काबूलवर तालिबानींनी आपला झेंडा रोवला तेव्हा या धाडशी 29 वर्षीय जहराला आणि तिच्या कुटुंबाला लंडनमध्ये आश्रय देण्यात आला. अर्थात जहरा लंडनमध्ये आता सुरक्षित असली तरी ती आपल्या मातृभूमीतील महिलांसाठी सतत झटत आहे. आत्ताही तिची एजन्सी चालू आहे. तिथे असणाऱ्या तिच्या सहकारी अत्यंत काळजीपूर्वक तिला माहिती देतात आणि जहरा ती बातमी जगासमोर मांडते.

====
हे देखील वाचा: ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे अमेरिकेन आर्मीमध्ये वकील
====
काबूलमधून अमेरिकन आणि नाटो सैन्य मागे आल्यावर विदेशी पत्रकारही सुरक्षेच्या कारणास्तव आपआपल्या देशात परतले. मात्र स्थानिक माहितीगारांच्या माध्यमातून अफगाणिस्थानच्या बातम्या ही मंडळी जगासमोर मांडत आहेत.
जहराही अफगाणिस्थानच्या महिलांचे दुःख, त्यांच्यावरील अत्याचाराच्या कहाण्या मांडत आहे. आपल्या देशातील महिलांसाठी पैसे गोळा करण्याचे कामही ती करते. आंतरराष्ट्रीय मंचावर व्याख्यानासाठीही तिला बोलवण्यात येतं. तिथे ती अफगाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची, त्यांच्या परिस्थितीची माहिती देते.
जहराला तालिबानकडून धोका असल्याचेही सांगण्यात येते. मात्र आपल्या मातृभूमिसाठी धडपडणाऱ्या जहराला त्याची पर्वा नाही. अफगाणिस्थानमधील महिला जेव्हा स्वतंत्र होतील तेव्हाच आपला महिला दिन साजरा होईल असे ती सांगते.
– सई बने