हिवाळा सुरु झाला की, काहीतरी मस्त चटकेदार खाण्याची इच्छा होते. एकतर हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. या ऋतूमध्ये खाण्याची मोठी चंगळ असते. गुलाबी थंडीमध्ये मस्त चमचमीत, गरम गरम खायला मिळाले की दुसरे सुख नाही. हिवाळ्यामध्ये काही ठराविक पदार्थ खाल्लेच जातात किंवा केलेच जातात. हिवाळ्यामध्ये असे ठराविक पदार्थ खाणे म्हणजे शास्त्र असते.
हिवाळ्याची चाहूल लागली की लगेच अनेक घरांमध्ये गृहिणींची चटपटीत, झणझणीत मिरची लोणचे करण्याची लगबग सुरु होते. कारण हिवाळ्यामध्ये मिरचीचे लोणचे खाणे म्हणजे केवळ आहाहा…अनेक घरांमध्ये तर हिवाळा आणि मिरची लोणचे हे समीकरणच बनलेले असते. आज याच हिवाळ्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला मिरचीच्या लोणच्याची रेसिपी सांगणार आहोत.
पद्धत १
साहित्य
हिरवी मिरची, बडीशेप, धणे, ओवा, मेथी, काळे तीळ किंवा कलौंजी, मोहरी, हळद, मीठ, हिंग, मोहरीचे तेल
कृती
हिरव्या मिरच्या चांगल्या प्रकारे धुवून घ्या. नंतर मधोमध कापून काही वेळ उन्हात वाळवायला ठेवा. मिरच्या वाळताय तोपर्यंत मसाला तयार करा. एका पॅनमध्ये बडीशेप, धणे, ओवा आणि मोहरी कोरडी भाजून घ्या आणि मिक्सरमधून बारीक करून घ्या. एका भांड्यात वाळलेल्या मिरच्या घ्या आणि त्यात बारीक केलेले मसाले घाला. आता त्यात मीठ, हळद, हिंग, मेथी, बडीशेप घालून चांगले एकजीव करून घ्या. आता त्यात मोहरीचे तेल घाला. हे सर्व नीट एकत्र करून घ्या. आता हे लोणचे एखाद्या काचेच्या बरणीत किंवा हवाबंद कंटेनरमध्ये काढा आणि नंतर काही वेळ उन्हात ठेवा. हे लोणचे दोन दिवस उन्हात ठेवता येते. उन्ह कडक असेल तर एक दिवस उन्हात ठेवा. आता चटपटीत, चमचमीत हिरव्या मिरचीचे लोणचे तयार आहे.
पद्धत २
साहित्य
लसूण १ वाटी, १ वाटी बारीक आलं, १ वाटी कापलेल्या मिरच्या, लोणचे मसाला, ४ चमचे ठेचलेली बडीशेप, ४ मोठे चमचे बारीक केलेली मोहरी, १ चमचे ठेचलेली सेलेरी, १ चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा हिंग, १ चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, मीठ, १ चमचे नायजेला बिया
कृती
सर्वप्रथम सोललेला लसूण १ वाटी, १ वाटी बारीक चिरलेले, किसलेले आलं आणि १ वाटी मिरचीचे काप घ्या. या सर्व गोष्टी एका पेपरवर पसरवा आणि ८ – १० तास तसेच राहूद्या. यामुळे या तिन्ही गोष्टींमधील ओलावा पूर्णपणे निघून जाईल आणि त्या कोरड्या होतील.
आता लोणचे बनवण्यासाठी बाजारातून आणलेला रेडिमेड लोणचे मसाला घ्या किंवा घरी करा.
लोणचे मसाला बनवण्यासाठी ४ चमचे ठेचलेली बडीशेप, ४ मोठे चमचे बारीक केलेली मोहरी, १ चमचे ठेचलेली सेलेरी, १ चमचे मेथी दाणे, अर्धा चमचा हिंग, १ चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, १ चमचा नायजेला बिया, २ चमचे मीठ घ्या. आता सर्व मसाले नीट मिक्स करा. यात एक वाटी मोहरीचे तेल टाका आणि आता या मसाल्यात किंवा रेडिमेड मसाल्यात मिरची, लसूण, आलं टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. यानंतर हे लोणचे काही दिवस मुरू द्या.