थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला ऊब मिळण्यासाठी आणि शरीर गरम ठेवण्यासाठी उष्ण गुणधर्म असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. हे उष्ण पदार्थ आपल्याला आतून गरम ठेवण्याचे आणि थंडीपासून वाचवण्याचे काम करतात. या उष्ण पदार्थांमध्ये सर्वात आधी नाव येते ते बाजरीचे. बाजरी हे एक धान्य असून अतिशय पौष्टिक आणि आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक समजले जाते.
बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्ब्स, प्रोटीन, लोह, जिंक, फायबर आणि अमिनो अॅसिडसारखे पोषक तत्व आढळतात. याशिवाय बाजरीमध्ये राबोफ्लेविन, फॉलिक अॅसिड आणि बिटा कॅरोटिन असतात. आपले आरोग्य चांगले राहावे वजन वाढू नये यासाठी अनेकदा बाजरीची भाकरी खाल्ली जाते.
पोट आणि आतड्यांच्या उत्तम आरोग्यासाठी बाजरी उत्तम आहे. या बाजरीचे सेवन केल्यास अॅसिडीटीपासून लवकर सुटका मिळते. तसेच बद्धकोष्ठतेची तक्रार देखील दूर होते. यामुळे कोलेस्ट्रॉलदेखील नियंत्रणात राहाते आणि हृदय अधिक चांगले राहण्यास मदत मिळते.
बाजरीपासून बहुतकरून भाकरी केली जाते. मात्र याच बाजरीचा वापर करत अनेक भागांमध्ये खिचडी देखील करतात. अतिशय चविष्ट, पौष्टिक असणारी ही खिचडी खाण्याची मजाच थंडीच्या दिवसांमध्ये येते. खूप लोकांसाठी बाजरीची खिचडी हा पदार्थ नवीन असेल काही लोकं हा लेख वाचताना पहिल्यांदाच या पदार्थबद्दल वाचत असतील. अशा लोकांसाठी आपण आज जाणून घेऊया या बाजरीच्या खिचडीची रेसिपी. ही खिचडी एकदा नक्की करा आणि खा तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल.
साहित्य
१/२ कप बाजरी, १ मूठ तांदूळ, १ मूठ, मूग डाळ, हिंग, तूप, जिरे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ
कृती
सर्वात आधी बाजरी स्वच्छ करून हलकीशी बारीक करून घ्यावी. आता बाजरी ५-६ तास पाण्यात भिजत ठेवावी. तसेच पाणी काढून टाकल्यानंतर मिक्सरमध्ये एकदाच फिरवा. आता कुकरमध्ये बाजरी, मूग डाळ, तांदूळ आणि मीठ आणि हळद घालून गॅसवर ठेवावे. कुकरमध्ये दोन वाट्या पाणी टाकून खिचडी ३ – ४ शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या. कढईत तूप गरम करून खिचडीसाठी फोडणी तयार करावी. तूप गरम झाल्यावर त्यात हिंग व जिरे घालावे. आता त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी. आता तयार केलेला फोडणी खिचडीवर घालावी. तर चला तयार आहे आपली बाजरीची खिचडी रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
बाजरीचा उपमा
आपण रव्याचा उपमा खातोच. पण बाजरीचा उपमाही अत्यंच चविष्ट लागतो आणि आरोग्यासाठी उत्कृष्ट ठरतो. बाजरी रात्रभर पाण्यात भिजवा आणि मग सकाळी धुऊन घ्या. एका पॅनमध्ये तूप, मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता घाला, मिरचीचे तुकडे आणि शेंगदाणे घालून परता. त्यानंतर त्यात बाजरी घाला आणि शिजवून घ्या. वरून दुप्पट पाणी घाला, कोथिंबीर, मीठ घालून मिक्स करा आणि पुन्हा झाकण घालून शिजवा. उपम्याच्या पद्धतीप्रमाणे केलेला बाजरीचा उपमा अत्यंत चांगला असून वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरतो.