Home » घशातील खवखव बरी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

घशातील खवखव बरी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sore Throat
Share

वातावरणात बदल झाला की, त्याचे परिणाम लगेच आपल्या शरीरावर दिसायला लागतात. याशिवाय आपल्या खाण्यापिण्यात बदल झाला तरी आपले शरीर काही परिणाम दाखवते. अशा विविध बदलांमुळे होणारा सर्वात सामान्य आणि थोडा त्रासदायक आजार म्हणजे सर्दी, खोकला. वातावरण थंड झाले, पाऊस पडला किंवा उन्हाळयात थंड खाल्ले की लगेचच सर्दी होते.

अनेकांसाठी तर सर्दी अगदी रोजचीच पाहुणी झाली आहे. मात्र या सर्दी, खोकल्यामध्ये खूपच असामान्य आणि जास्त त्रासदायक असणारा त्रास म्हणजे घशामध्ये होणारी खव खव. ही खव आपल्याला शांत बसूच देत नाही. सतत आपले लक्ष त्याकडे जाते आणि इच्छा असूनही आपण ती लवकरात लवकर बरी करू शकत नाही. घशाला होणारी खव खव आपल्याला सतत अत्यवस्थ करत असते. गळ्यातील इन्फेक्शनमुळेही अनेकदा मोठ्या स्वरूपाचा त्रास सहन करावा लागत असतो. औषधोपचार घेऊनही बरं होण्यास बराच काळ लागतो.

घशाच्या समस्यांसाठी घरगुती उपचार करणे देखील फायदेशीर असते. सध्या वातावरणात थंडी जाणवते आणि त्यामुळे सर्दी, खोकला, घशाला इन्फेक्शन आदी आजरा चांगलेच सतावत आहे. आज या लेखातून आपण घशाची खव खव घरगुती उपायांनी कशी बरी करू शकतो ते जाणून घेऊया.

गरम पाणी मिठाच्या गुळण्या
घसा खवखवत असेल तर त्यावर उत्तम घरगुती उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या. एक ग्लास गरम पाणी आणि त्यात मीठ घालून गुळण्या केल्यास लगेच आराम मिळतो. यामुळे घशाला आराम मिळतो तसेच घशाला आलेली सूज कमी होते.

Sore Throat

वाफ घेणे
घसा कोरडा झाल्याने कदाचित गळ्यात इन्फेक्शनची समस्या निर्माण झालेली असते. त्यामुळे एखाद्या मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन टॉवेलने आपला चेहरा झाकून त्या पाण्याची वाफ घ्यावी. असे केल्याने घशाला झालेले इन्फेक्शन कमी होते.

आलं
घशाची खवखव दूर करण्यासाठी आलं हा एक चांगला उपाय आहे. आल्यामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे इन्फेक्शन आणि घसा दुखी कमी होते. त्यासाठी एका कपात पाणी घ्यावे आणि त्यात अद्रक टाकून उकळावे. त्यानंतर त्यात मध मिसळा मग हे पेय दोन दिवसांत तीन वेळा घ्या.

मसाला चहा
लवंग, तुळस, अद्रक आणि काळी मिर्ची यांचे मिश्रण पाण्यात टाकून उकळावे. त्यानंतर चहा पावडर टाकून चहा बनवा. हा चहा गरम-गरम प्यावा.

काढा घ्यावा
घशात खवखव अथवा वेदना असतील तर काढा प्यावा. यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये दालचिनी, आलं, तुळशीची पाने आणि काळी मिरी घालून ते पाणी चांगले उकळावे. त्यानंतर त्यात थोडासा गूळ किंवा मध घालून प्यावे. हा काढा प्यायल्याने गळ्यातील खवखव तसेच खोकल्याची समस्या दूर होऊ शकते. सोबतच घसा बसलेला असल्यास तोही मोकळा होतो.

मध
गळ्यातील खवखव दूर करण्यासाठी मधाचा वापर करता येऊ शकतो. मधामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म हे घशातील खवखव आणि वेदना दूर करण्यात उपयुक्त ठरतात. यासाठी एक चमचा मध खाऊ शकता. मधाच्या सेवनाने घशाला आराम मिळतो.

मध आणि लिंबाचा रस
मध आणि लिंबाचा रस हे दोन्ही पदार्थ नैसर्गिक प्रतिजैविक म्हणून ओळखले जातात. मधामध्ये जंतुनाशक आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात, तर लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यासाठी, एका चमचामध्ये मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण हळूहळू आपल्या घशाने गिळल्यास घशातील खवखव कमी होते आणि आपल्याला थंडावा मिळतो.

तुळशीचा काढा
तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे घसा खवखवणे आणि अन्य संसर्ग कमी होतो. तुळशीचा काढा बनवण्यासाठी, काही तुळशीची पाने पाण्यात उकळा. पाणी उकळल्यानंतर त्यात चिमूटभर मीठ आणि थोडासे मध घाला. हे मिश्रण कोमट झाल्यावर ते थोडे थोडे प्या.

आलं आणि हळदयुक्त दूध
एक कप गरम दुधात एक चमचा हळद आणि चिमूटभर आल्याचा किस घाला. हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर पिण्याने घशातील सूज कमी होण्यास मदत होते आणि खवखव कमी होते. आल्यामध्ये आढळणारे अँटीइंफ्लेमेटरी घटक घशातील सूज कमी करतात.

जेष्ठमध
पाण्यात जेष्ठमध टाकून त्या पाण्याने गुळण्या करा. जेष्ठमधातील अॅस्पिरिनचे गुणधर्म पुरेसे आहेत. मात्र गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी हे घरगुती उपचार करू नये.

दालचिनी
दालचिनी सर्वोत्तम अँटिऑक्सिडंट आहे. त्यात अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म देखील आहेत. बदामाच्या दुधात दालचिनी मिक्स करून प्यायल्याने घशाच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

(टीप : वरील सर्व बाबी माहिती म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.