जगामध्ये ज्या निवडक देशांमध्ये राजघराणी होती, त्यातील एक देश म्हणजे सध्या आंदोलनाच्या ज्वाळांमध्ये धुमसत असलेले नेपाळ आहे. गोरखा राज्य अशी ओळख असलेले नेपाळ म्हणजे 1768 मध्ये नेपाळमधील गोरखा लोकांच्या एकत्रीकरणातून स्थापन झालेला देश आहे. राजा पृथ्वी नारायण शाह यांनी या देशात शाह राजघराण्याची सत्ता आणली. तेव्हापासून असलेली शाह घराण्याची सत्ता 2008 मध्ये एका रक्तरंजीत हत्याकांडानं संपुष्टात आली. तब्बल 240 वर्ष नेपाळमध्ये राजेशाही होती. मात्र गेल्या 17 वर्षात नेपाळच्या जनतेनं राजाविना राज्य अनुभवलं आहे. सत्तेत आलेल्या प्रत्येक नेत्यानं आपला स्वार्थ आधी साधला आणि त्यानंतर देशातील जनतेचा विचार केला. अगदी या देशाचा एकमेव हिंदू देश हा किताबही काढून टाकण्यात आला. यात नेपाळमध्ये भ्रष्टाचार एवढा वाढला की, आता येथील जनता राजसत्ताच बरी, या मानसिकतेमध्ये पोहचली. त्यामुळेच नेपाळमध्ये झालेल्या उठावानंतर आता राजेशाही नेपाळमध्ये परत येईल का, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. या उठावानंतर नेपाळचे राजघराणे नेपाळ वाचवण्यासाठी पुढे येईल का, याबाबतीतही चर्चा सुरु झाली आहे. (Nepal)
नेपाळमध्ये राजेशाही संपुष्ठात आली तरी, नेपाळच्या राजघराण्याबाबत आजही तेथील जनतेमध्ये आदराची भावना आहे. त्याचा प्रत्यय मार्च महिन्यात सरकारला आला. मार्चमध्ये माजी राजा ज्ञानेंद्र शाह काठमांडूमध्ये आल्यावर त्यांच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी ‘राजा परत या, देश वाचवा’, ‘राजासाठी राजेशाही राजवाडा रिकामा करा‘, ‘आपला प्रिय राजा अमर राहिला पाहिजे, आम्हाला राजेशाही हवी आहे‘ अशा आशयाचा घोषणा देत ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावेळी काही राजशाही समर्थकांनी काठमांडू येथील राजवाड्याच्या संकुलात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यात झालेल्या संघर्षात दोन जण ठार झाले आणि 100 हून अधिक जखमी झाले होते. त्यानंतर माजी राजा ज्ञानेंद्र हे पुन्हा आपल्या निवासस्थानी गेले. मात्र नेपाळमध्ये राजेशाही परत आणण्यासाठी ते गुप्तपणे कार्यरत असल्याची चर्चा सुरुच राहिली. (International News)
आता नेपाळमध्ये तरुणांचे आंदोलन सुरु झाल्यावर पुन्हा या राजेशाहीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नेपाळमध्ये अलिकडच्या वर्षात अशा अनेक घटना झाल्या आहेत, त्यावरुन येथील जनतेला राजेशाही पुन्हा हवी असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच तरुणांच्या आंदोलनामध्ये राजघराण्याची काय भूमिका आहे, हेही महत्त्वाचे ठरले. माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांनी या आंदोलनासंदर्भात सार्वजनिक निवेदन जारी केले आहे. त्यांनी आंदोलनात तरुणांच्या झालेल्या मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त करत निदर्शकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. शांतताप्रिय नेपाळी समाजाच्या आदर्शांच्या विरुद्ध असलेल्या या हिंसाचाराचा मी निषेध करतो असे सांगून त्यांनी सुशासन आणि आर्थिक शिस्तीच्या निदर्शकांच्या मागण्या वैध असल्याचेही या निवेदनातून म्हटले आहे. (Nepal)
माजी राजा ज्ञानेंद्र शाह हे 2008 मध्ये राजेशाहीच्या समाप्तीपासून देशात सामान्य नागरिकासारखे राहत आहेत. ज्ञानेंद्र शाह यांचे मुख्य निवासस्थान काठमांडूमधील निर्मल निवास आहे. परंतु ते पोखरा येथील निवासस्थानी रहात होते. मार्चमध्ये, ज्ञानेंद्र शाह पोखराहून काठमांडूला परतले पुन्हा राजेशाहीच्या चर्चा नेपाळमध्ये सुरु झाल्या. (International News)
मे महिन्यात त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि त्यांचा नातू हृदयेंद्र यांच्यासह नारायणहिटी राजवाड्याला भेट दिली. या भेटीदरम्यान राजघराण्यातील लोकांनी राजवाड्याच्या संकुलात पूजाही केली. यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले. अर्थात 2008 नंतर राजेशाही संपुष्टात आल्यावर माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांनी नेपाळमधील मंदिरे आणि तीर्थस्थळांना भेट दिली आणि जनतेच्या मनात राजेशाहीबद्दल काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना नेपाळच्या राजकारणात स्वारस्य आहे. त्यांना राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचा पाठिंबा आहे. मे महिन्यात, नवराज सुबेदी यांच्या नेतृत्वाखालील राजेशाही समर्थक गटांनी देशव्यापी निषेध मोहीम सुरू केली. त्यामागे माजी राजा ज्ञानेंद्र यांचीच निती असल्याची माहिती आहे. आरपीपीचा असा विश्वास आहे की, नेपाळमधील हिंदू राष्ट्र आणि राजेशाही एकमेकांना पूरक आहे. त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा शाह घराण्याची सत्ता आणणे हे या पक्षाचे उद्दीष्ट आहे. (Nepal)
2001 मध्ये राजा बिरेंद्र यांच्या निधनानंतर ज्ञानेंद्र शाह सिंहासनावर बसले आणि त्यांनी दोन वर्षे नेपाळचा राजा म्हणून राज्य केले. 2008 मध्ये नेपाळची 240 वर्षांची राजेशाही संपण्यात आली आणि नेपाळ संघराज्यवादी लोकशाही प्रजासत्ताक देश झाला. राजेपद सोडल्यावर माजी राजा ज्ञानेंद्र हे नेपाळच्या वेगवेगळ्या भागात धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. त्यांच्या मालमत्तेत अनेक हॉटेल्स आणि चहाच्या बागांचा समावेश आहे. सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली आहे. पण राजांचा वैयक्तिक पाठिराखा वर्ग मोठा असल्यामुळे आजही माजी राजा ज्ञानेंद्र यांना एखाद्या राजासारखा मान नेपाळमध्ये मिळत आहे. त्यातही राजमाता रत्न माजी राजवाडा संकुल महेंद्र मंझिलमध्ये राहतात. राजघराण्यातील तरुण सदस्य नेपाळ सोडून परदेशात राहत आहेत. माजी युवराज पारस आणि राजकुमारी हिमानी यांची मुलगी राजकुमारी कृतिका शाह हिने 2008 नंतर नेपाळ सोडून आपल्या कुटुंबासह सिंगापूरमध्ये स्थलांतर केले. राजकुमारी पूर्णिका शाह यांनीही याचवर्षी नेपाळमध्ये आपले कुटुंब हलवले आहे. (International News)
=========
Nepal : भारतावर ताबा मिळवणाऱ्या मुघलांना नेपाळ का जिंकता आला नाही?
Nepal : त्रिकोणी राष्ट्रध्वज असणारा एकमेव देश
=========
वास्तविक नेपाळमध्ये राजेशाही असतांना राजेशाही संपवण्यासाठी मोठी मोहीम सुरु झाली. परंतु गेल्या 17 वर्षात नेपाळमध्ये 10 सरकारं झाली. पण ही लोकशाही सरकारे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाहीत. तसेच, वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांना निराशा झाली. शिवाय वाढता भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणामुळे लोकांमध्ये राग वाढत गेला. त्यातच नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी घालण्याची घोषणा केली आणि जनता रस्त्यावर आली. यातूनच नेपाळमध्ये पुन्ह राजेशाही येणार का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Nepal)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics