लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या बेतात आहे. राज्यात सहा प्रमुख पक्ष (काँग्रेस, भाजप, दोन राष्ट्रवादी काँग्रेस व दोन शिवसेना) असले तरी खरी उत्सुकता एकाच पक्षाच्या दोन गटांबाबत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट, कारण शिवसेना फुटून तिचे दोन गट झाले असले तरी त्या गटांमध्ये आता स्पष्ट सीमा रेखा ओढली गेली आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाने जोरदार यश मिळविले असले, तरी खरी शिवसेना मिळालेल्या एकनाथ शिंदे यांनाही अगदीच नामुष्की पत्करावी लागलेली नाही. त्यांनाही बऱ्यापैकी यश मिळाले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंना आपले चंबुगबाळे आवरून परत शिवसेनेत जावे लागणार का, असा प्रश्न कोणी विचारत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकरण मात्र वेगळे आहे. (Pawar vs Pawar)
तिथे अजित पवार यांना पक्षाची ताबेदारी आणि चिन्ह मिळाले. परंतु लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात यश शरद पवार यांना मिळाले. नुसते यश नाही मिळाले तर अजित पवार यांना अत्यंत नामुष्कीला सामोरे जावे लागले. त्यांची स्वतःची पत्नी बारामतीत पराभूत झाली, तर पक्षाचा केवळ एक खासदार निवडून आला. तेव्हापासून अजित पवार यांचा पक्ष शाबूत राहणार की शरद पवार यांच्याकडे परत जाणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अजितदादांच्या अनेक समर्थकांनी तर अगोदरच मोठ्या साहेबांच्या शिबिरात जाणे पसंत केले आहे. त्यांच्या गटातील अनेक मंत्र्यांनीही वेगवेगळे सूर लावून या चर्चेला खतपाणी घातले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात केलेले वक्तव्य आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा नियोजन समितीतील भेटीचे विश्लेषण करावे लागेल.
पुण्यात गेल्या आठवड्यात पत्रकारांशी झालेल्या वार्तालापत शरद पवार यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले. अजित पवार यांना कुटुंबात नेहमीच जागा आहे, परंतु पक्षात जागा द्यायची की नाही हे पक्षातील लोक ठरवतील, असे शरद पवार म्हणाले. आता जो पक्षच मुळी शरद पवार यांच्या अवतीभवती बांधलेला आहे त्यात नेते किती? आणि विचारणार कोणाला? राष्ट्रवादी काँग्रेस हा मुळात राजकीय पक्ष नसून स्थानिक पातळीवर निवडून येणाऱ्या विविध नेत्यांची बांधलेली मोळी आहे, असे तर नेहमीच बोलले जाते. त्यात जे बलदंड आणि सातत्याने जिंकण्याची सवय लागलेले नेते आहेत त्यांच्यापैकी बहुतेक जण सध्या तरी अजितदादा सोबत आहेत. जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांचा अपवाद वगळला तर राज्य पातळीवरचा फार कोणी मोठा नेता शरद पवार यांच्यासोबत नाही. जे आहेत ते शरद पवारांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे उद्या अजितदादांना पक्षात परत घेऊ असे शरद पवारांनी सांगितले तर त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध, असे थोडेच आहे? (Pawar vs Pawar)
अजितदादांनी पवारांची साथ सोडली त्याच्या महिनाभर आधीचा प्रसंग जरा आठवून बघा. “आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असून नेते व कार्यकर्त्यांनी नवा नेता निवडावा,” अशी गुगली मे 2023 मध्ये शरद पवारांनी टाकली होती. त्यावेळी नेते व कार्यकर्त्यांनी दोन दिवस आकांत मांडला आणि पवारांना त्यांचा निर्णय मागे घ्यायला लावला. खरे तर त्या घटनेनंतरच अजित पवारांनी वेगळी चूल मांडण्याचा आपला निर्णय पक्का केला, असे मानले जाते. त्या घटनेनंतर बाकी काही नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेसवर शरद पवारांची किती पक्की मांड आहे, याची प्रचिती आली होती. त्यामुळे उद्या अजितदादांना पक्षात घ्यायचे शरद पवारांनी जाहीर केले तर कोण त्याला मोडता घालणार?
तरीही शरद पवार अजितदादांना कुटुंबातच जागा द्यायला तयार आहेत. पक्षात जागा द्यायची तर त्याला सशर्त परवानगी देतात आणि अडचणीच्या काळात जे माझ्यासोबत उभे राहिले त्या नेत्यांना विचारावे लागेल, असे म्हणतात. याचा अर्थ राजकीय पातळीवर अजितदादांना जे स्थान आपल्या काकांकडून हवे आहे ते स्थान द्यायला शरद पवार अजूनही तयार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीपासून तसेच त्यापूर्वीही 9-10 वर्षांपासून अजितदादा शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून पक्षासाठी काम करत आहेत. परंतु आपली कन्या सुप्रिया सुळे यांना पुढे आणण्याच्या नादात शरद पवारांनी आपल्याला दुय्यम स्थान दिले आणि अनेकदा राजकीय बळी दिला, ही अजितदादांची व्यथा आहे. काकांची साथ सोडून जवळपास एक वर्षांपूर्वी ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले तेव्हापासून विविध व्यासपीठावर त्यांनी हेच गाऱ्हाणे मांडले आहे. त्यामुळे शरद पवार आपल्याला बरोबरीचे स्थान देत नाहीत आणि आपला राजकीय वारस जाहीर करत नाहीत तोपर्यंत शरद पवारांकडे परतायचा आपला विचार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. (Pawar vs Pawar)
या एका वर्षात काका पुतण्यामध्ये विविध पातळीवर संघर्ष झाला. अगदी निवडणूक आयोग आणि न्यायालयापर्यंत प्रकरण गेले. त्यात आयोग आणि न्यायालयात अजितदादांनी बाजी मारली, तर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणमैदानात पवारांच्या पदरात यश पडले. हे सगळे झाले असताना काका पुतण्याच्या कौटुंबिक सौहार्दाचा कुठेही लवलेश दिसून आला नाही. अगदी ‘लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना लोक येतील आणि तुम्हाला भावनिक ब्लॅकमेल करतील’, असे अजित पवारांनी बजावले तर ‘अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा या पवार घराण्यातील नाहीत,’ असे म्हणण्यापर्यंत शरद पवारांनी मजल मारली. आपल्या विरोधात बंड करणाऱ्या पुतण्याला त्याची जागा दाखवून देण्याचा चंग पवारांनी बांधला होता आणि तो त्यांनी निवडणुकीत साध्य करून दाखवला.
त्या निकालानंतर या दोघांमध्ये पहिली सार्वजनिक भेट झाली ती नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत. या बैठकीत शरद पवार आधी आले, अजितदादा नंतर आले. पालकमंत्री या नात्याने अजितदादा या बैठकीचे अध्यक्ष होते. त्यावेळी अजितदादा आल्यानंतर शरद पवार उठून उभे राहिले. त्यांनी काही प्रश्नही विचारले आणि त्याला अगदी सरकारी छापाचे उत्तर अजितदादांनी दिले. या बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर टीका केली. हा सर्व प्रकार हेच सांगतो की या दोघांमध्ये अजूनही समेटाचे चिन्ह नाही. जी औपचारिकता या दोघांमध्ये दिसली त्यावरून तरी दोघ्यांमध्ये नात्याचे बंध नाजूक झाल्याचेच दिसून आले. (Pawar vs Pawar)
===================
हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंचं सिम्पथी कार्ड कि पवारांचं बेरजेचं राजकारण
====================
त्याला कारण अजितदादांना जे हवे आहे ते कदापी देणार नाही, हे शरद पवारांनी दाखवून दिले आहे. तर शरद पवार जे देऊ करत आहेत त्याच्याने आपले समाधान होणार नाही, हे अजितदादांनी स्पष्ट केले आहे. आता तुमचे वय झाले, आता तुम्ही निवृत्ती घ्या आणि पक्ष माझ्या ताब्यात द्या, हे अजितदादांनी कुठलाही आडपडदा न ठेवता सांगून झाले आहे. दुसरीकडे, आपल्या हयातीतच नव्हे तर आपल्या नंतरही आपला पक्ष अजितदादांच्या हातात सोपवणार नाही, हे शरद पवारांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. शरद पवारांच्या कुटुंबात जागा मिळणे हा अजित पवारांचा जन्मसिद्ध हक्क आहे. पण त्यांच्या पक्षाची कमान हातात येणे, हा अजित पवारांचा जन्मसिद्ध हक्क नाही. शरद पवार त्यांना आपल्या पक्षात एक जागा द्यायला तयार आहेत, पण जे स्थान अजित पवारांना हवे आहे ते द्यायला शरद पवार तयार नाहीत. या काका पुतण्याच्या संघर्षाचा हाच अर्थ आहे.