Home » कॉंग्रेससाठी महाराष्ट्राचा हरियाणा होणार का?

कॉंग्रेससाठी महाराष्ट्राचा हरियाणा होणार का?

by Team Gajawaja
0 comment
Vidhansabha Election
Share

अखेर येता येता म्हणता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येऊन धडकली आहे. गेले काही दिवस केवळ शाब्दिक बाण सोडणारी नेतेमंडळी आता पुढील काही दिवस प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी नेते फिरणार आहेत. या सगळ्या धामधुमीत महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व मात्र वेगळ्याच गडबडीत गुंतले आहे. बैठका, जागावाटप, जाहीरनामे या सोबत त्यांचं आणखी एका गोष्टीवर लक्ष आहे, ते म्हणजे महाराष्ट्रचा हरियाणा होऊ द्यायचा नाही. हरियाणात निवडणुकांपूर्वी कॉंग्रेसचीच हवा होती, पण प्रत्यक्ष निकाल काही वेगळाचं लागला. महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती कॉंग्रेसवर ओढवणार का? जाणून घेऊया. (Vidhansabha Election)

महाराष्ट्र काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे सर्वेसर्वा व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी दिल्लीत पार पडली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीत राज्याचे प्रतिनिधित्व केले. विधानसभा निवडणुकीतील संभाव्य जागावाटप आणि जाहीरनाम्याच्या शिफारशीबाबत या बैठकीत मंथन झाले, असे सांगण्यात आले. (Political Updates)

माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करायचा नाही, यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आपोआपच बंदोबस्त होणार आहे. याचसोबत हरियाणा निवडणुकीतून धडा घेऊन तिथे झालेल्या चुकांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये, याची काळजी घेतली जावी, अशी भूमिका काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचेही सांगितले जात आहे. महाराष्ट्राचा हरियाणा होऊ द्यायचा नाही, असे म्हणे काँग्रेस श्रेष्ठींनी ठरवलं आहे. (Vidhansabha Election)

यात एक गंमत आहे. हरियाणात ज्या चुका झाल्याचं म्हणून सांगितले जातं, त्यात काँग्रेसने जाट समाजाच्या मतांवर आपली संपूर्ण भिस्त ठेवली आणि अन्य समाज घटकांकडे दुर्लक्ष केलं. त्याच समाज घटकांना भाजपने सोबत घेतले व विजय खेचून आणला, असे विश्लेषण केलं जात आहे. म्हणून मराठा, ओबीसींसह इतरही सर्व समाजांमध्ये समन्वय राहण्याची काळजी घ्या, असा सल्लाही पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना दिल्याची चर्चा आहे. (Political Updates)

निवडणुकीच्या दृष्टीने यात काही तथ्य असेलही, परंतु ते संपूर्ण सत्य नाही. एकाच समाज घटकाला लक्ष करून अन्य सर्व समाज घटकांना बाजूला सारणे, ही काँग्रेसची एकमेव चूक नाही. बायबलमध्ये ॲडम आणि ईव्ह हे जगातले पहिले पुरुष आणि स्त्री मानले जातात. त्यांना निर्माण करताना ईश्वराने नंदनवनात ठेवलं होतं. परंतु त्यानंतर नंदनवनातील सफरचंदाच्या झाडावरील फळ खाण्याची त्यांना मनाई केली होती. परंतु सापाच्या वेशात आलेल्या सैतानाच्या बोलण्याला भुलून ईव्हने ते सफरचंद खाल्लं आणि तिच्या मनात लज्जा निर्माण झाली. तिथून मनुष्याच्या पापाला सुरुवात झाली, असे मानलं जातं. त्यामुळे सफरचंद खाण्याच्या या कृतीला पहिले पाप असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे एका समाज घटकासाठी सर्व समाज घटकांची उपेक्षा करणे, हे काँग्रेसचं दुय्यम पाप आहे. भाजपला कंटाळलेले लोक किंवा नाराज असलेले लोक आपोआप आपल्याला जिंकून देतील, हा समज बाळगणे हे काँग्रेसचे मूळ पाप आहे. (Vidhansabha Election)

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव 2004 मध्ये झाला. त्यानंतर 10 वर्षे भाजप चाचपडत होता आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता होती. पु़ढे 2012 पासून राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी यांचा उदय होऊ लागला. गुजरातमध्ये सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकून मोदी यांनी स्वतःला सिद्ध केले होते. त्याच आधारावर राष्ट्रीय पातळीवर ते स्वतःला सादर करत होते. राजकीय विश्लेषकांनी याला ब्रॅण्डिंग असे नाव दिले होते. मोदी जे काही करतात ते मार्केटिंग आहे, असा शेरा अनेक विश्लेषकांनी मारला होता. स्वतः राहुल गांधी यांनीही तीच भाषा वापरली होती. पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून मोदी यांचा बोलबाला झाला होता. त्यावेळी, साधारण 2013 मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना राहुल गांधी यांनी एक मजेशीर उपमा वापरली होती. ते म्हणाले होते, “आपले विरोधक म्हणजे नरेंद्र मोदी विक्री करण्यामध्ये एवढे तरबेज आहेत की ते संपूर्ण टक्कल असलेल्या माणसालाही कंगवा विकू शकतात.” त्यांचे शब्द खरे ठरले आणि लोकांना आपल्यावर विश्वास ठेवायला भाग पाडण्यात मोदी यशस्वी झाले. (Political Updates)

त्या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला यश मिळत गेलं. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा एक ब्रँड तयार झाला. भाजपला लोकं मत देतात, याचा अर्थ ते नरेंद्र मोदींना मत देतात, हे टीकाकारही मान्य करू लागले. लार्जर दॅन लाइफ अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. आता त्यांना टक्कर द्यायची म्हणजे राहुल गांधी यांचाही एक ब्रँड तयार झाला पाहिजे, असे काँग्रेसवाल्यांना वाटू लागले. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने तसे प्रयत्न होऊ लागले. गुजरात विधानसभेच्या 2017 मधील निवडणुकीच्या वेळेस राहुल गांधी यांनी निरनिराळ्या मंदिरांना भेटी देण्याचा जो सपाटा लावला होता, तो याचाच भाग होता. सॉफ्ट हिंदुत्व असलेल्या नेता असा त्यांचा ब्रँड तयार करण्याचा तो एक मार्ग होता. परंतु तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर राहुल यांनी दोन वर्षांपूर्वी भारत जोडो यात्रा काढली. त्यातून मोदी यांच्या सत्तेला आव्हान देणारा एक नेता म्हणून ते पुन्हा पुढे आले. यावेळी ते काही अंशी यशस्वी झाले आणि लोकसभेत त्यांच्या जागा वाढल्या. (Vidhansabha Election)

परंतु काँग्रेसची खोड अशी की थोड्याशा यशाने त्यांना लगेच कैफ चढतो. स्वातंत्र्यानंतर जवळपास चार दशकं आपली अनिर्बंध सत्ता होती, हा काँग्रेसचा गंड काही उतरत नाही. तो काँग्रेसचा एक प्रकारचा हँगओव्हरच आहे. त्यामुळे आपण या देशाचे बाय डिफॉल्ट सत्ताधारी आहोत, हा काँग्रेसचा तसेच त्या पक्षाच्या नेतृत्वाचा गोड गैरसमज आहे. साधारण चार-पाच वर्षांपूर्वी “काँग्रेस या देशाच्या डीएनएमध्ये आहे,” असे एक वक्तव्य केले होते. त्याचा अर्थ तोच आहे. (Political Updates)

शिवाय काँग्रेसला यश मिळाले की ते राहुल गांधीचे आणि अपयश आले की ती पक्षाची सामूहिक जबाबदारी, हाही एक ठरलेला साचा आहे. त्यामुळे जरा कुठे यश मिळाले की आता राहुल गांधी मोदी यांच्या बरोबरीला आले, अशी हवा निर्माण केली जाते. पंजाब विधानसभेची 2016 ची निवडणूक, राजस्थान व मध्य प्रदेशातील 2018 ची निवडणूक ही याची उदाहरणे आहेत. या प्रत्येक निवडणुकीनंतर राहुल आता मोदींना टक्कर द्यायला सज्ज झाले आहेत आणि भाजपचा पाढा ठरलेला आहे, अशी हवा तयार करण्यात आली. दरवेळी त्यांच्या नेतृत्वाचा फुगा फुगविण्यात आला. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील एका विधानसभा निवडणुकीच्या निकालाने त्या फुग्याला टाचणी लागली. जनता भाजपवर नाराज आहे, त्यामुळे आपल्याला निवडण्यावाचून लोकांना दुसरा पर्याय नाही, या विचारात काँग्रेस नेते मश्गुल राहिले. त्यांचा तो आत्मसंतुष्टपणा शेवटी पक्षाला भोवला. त्यातही निकालानंतर लगेचच मतदान यंत्रावर खापर फोडून काँग्रेसने स्वतःचे हसे करून घेतले. आता महाराष्ट्रातही तेच होताना दिसत आहे. (Vidhansabha Election)

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांचे दोन शकले झाली आहेत. प्रमुख विरोधक असलेल्या भाजपला मुख्यमंत्रीपदापासून वंचित रहावे लागले आहे. मराठा व ओबीसी आरक्षण तसेच अन्य अनेक प्रश्नांमुळे आपोआपच सरकार विरोधात वातावरण तयार झालेले. या सर्वांचा फायदा आपल्याला होणारच आणि सत्तेच्या सोपनावर आपण चढणारच, याची काँग्रेस नेत्यांना प्रचंड खात्री पटलेली आहे. म्हणून लोकसभेत 13 खासदार निवडून आल्यानंतर काँग्रेसला आनंदाचे भरते आले आणि पक्षबांधणी किंवा निवडणुकीची रणनीती हे विषय मागे पडले आहेत. या खासदारांच्या बळावर मुख्यमंत्रीपदावर आपला दावा ठोकायचा आणि जागा वाटपात जास्तीत जास्त जागा वाटायला येतील, याची बेगमी करायची यावर त्यांचे सर्व लक्ष केंद्रित झाले. (Political Updates)

======

हे देखील वाचा :  परळीत मुंडेंना पर्याय नाही?

======

तसे नसते तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस नेते व कार्यकर्ते आपल्याच सहकारी पक्षांशी वाद घालत बसले नसते. “आपण एकमेव सत्तेचे दावेदार आहोत आणि आपल्याला वगळून जनतेचे चालणार नाही,” हा समज त्याला कारणीभूत आहे. हेच काँग्रेसचे मूळ पाप आहे, हीच मूळ चूक आहे. त्याचे सर्वात आधी निराकरण व्हायला हवे. मूळ धडा तो शिकायला हवा. बाकी सगळी वरवरची मलमपट्टी आहे. (Vidhansabha Election)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.