सर्व जगात शक्तीमान असलेल्या अमेरिकेला (America) कोणी हरवू शकेल असा देश अद्याप तरी नाही. अमेरिकेचे जगातील अस्तित्व मिटवू इच्छिणारे अनेक देश आहेत, मात्र अमेरिकेची सुरक्षा प्रणाली एवढी मजबूत आहे की, अमेरिकेबरोबर (America) युद्ध अशक्य आहे, याची जाणीव त्या देशांना आहे. मात्र तरीही अमेरिकेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आता नाही, मात्र काही वर्षांनी अमेरिकेचे जगातील अस्तित्वच धोक्यात येईल अशी शक्यता आहे. सुपरकॉप असलेल्या अमेरिकेला (America) हा धोका निर्माण झाला आहे, तो बदलत्या हवामानामुळे. वाढत्या उष्णतेचा फटका अमेरिकेला बसणार असून त्यामुळे तेथील अनेक शहरे पाण्याखाली जातील असा धक्कादायक निष्कर्ष हवामान तज्ञांनी काढला आहे. गेल्या काही काळात अमेरिकेतील कॅलिफोर्नियात येणा-या वादळांनी हवामान तज्ञांनाही आश्चर्य चकीत केले होते. कॅलिफोर्नियाच्या काही भागात जिथे पाऊस पडत नव्हता, तो भाग आता बर्फाखाली जात आहे. तसेच अचानक येणा-या जोरदार वादळांनी अमेरिकेची हवामान यंत्रणाही कोलमडून पडली आहे. काही भागात तर अशी परिस्थिती आहे की, तेथील मुळ रहिवाशांना वादळाच्या फटक्यांनी राहती घरं सोडावी लागली आहेत. हे सर्व बदलत्या हवामानाचे परिणाम असून भविष्यात या वादळांचे प्रमाण वाढून अमेरिका (America) पाण्याखाली तर जाणार नाही ना अशी शंका आता तेथील हवामानतज्ञांना सतावत आहे.
वाढत्या उष्णतेमुळे अमेरिकेतील (America) अनेक शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही भागातील समुद्राच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या शहरांचे अस्तित्वच नष्ट होईल की, काय अशी भीती व्यक्त होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका जगभरातील सर्वच देशांना बसत आहे. भारतातील अनेक भागातील समुद्र किना-यावरही हा धोका दिसू लागला आहे. पण भारतासोबत अमेरिकेतील (America) अनेक शहरेही या धोक्याच्या विळख्यात आल्याचे आता स्पष्ट होत आहे. याबाबत योग्य काळजी घेतली नाही तर जगातील अनेक शहरे भविष्यात पाण्याखाली असतील असा इशारा पर्यावरणतज्ञांनी दिला आहे.
जागतिक तापमानात 1880 पासून, सरासरी एक अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे. 2035 पर्यंत त्यात 0.3 ते 0.7 अंश सेल्सिअसने आणखी वाढ होण्याची भीती शास्त्रज्ञांना आहे. वास्तविक, उष्णता वाढल्यामुळे किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे म्हणा, हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका समुद्राकिनारी असलेल्या शहरांना बसणार आहे. गेल्या वर्षीच सर्वाधिक मोठा हिमनग विलग होऊन तो समुद्रात फिरत आहे. अशाच प्रकारे हिमनग विलग होत, समुद्रात येऊ लागले तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल. त्यातून समुद्राच्या सीमा वाढून समुद्रकाढी राहणाऱ्या मानवी वस्त्या धोक्यात येणार आहेत.
उष्णतेच्या वाढीमुळे पृथ्वीवरून पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन वातावरणात जाते. ते मुसळधार पावसाच्या रूपात जमिनीवर येते आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. उष्णता वाढली की, अशा घटना वाढतील. यासोबतच चक्रीवादळ, वादळ यांसारख्या घटनांमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढण्याबरोबरच निसर्गाचा कोपही अनेक शहरांना बसणार आहे.
=======
हे देखील वाचा : श्रीलंकेतील महाबोधी वृक्षावर मोठे संकट
=======
अमेरिकेमधील (America) हवामान बदलामुळे 1970 पासून देशाचे तापमान 2.6 अंशानी वाढले आहे. हवामान बदलामुळे, अमेरिकेत व्यापक बदल झाले आहेत. अमेरिकेतील अनेक राज्यात पूर येण्याच्या घटना वाढल्या आहेत. हवामान बदलाचा अमेरिकेच्या पर्यावरणावर आणि समाजावर लक्षणीय परिणाम होत आहे. यामध्ये कृषी, अर्थव्यवस्था, मानवी आरोग्य आणि स्थानिक लोकांवर परिणामांचा समावेश आहे. अमेरिकेच्याच (America) कॅलिफोर्नियामधील बदलत्या हवामानामुळे अलिकडे सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. कॅलिफोर्नियाचे हवामान उष्ण वाळवंटापासून अल्पाइन टुंड्रापर्यंत, अक्षांश, उंची आणि पॅसिफिक कोस्टच्या सान्निध्यावर अवलंबून असते. कॅलिफोर्नियाचा किनारी प्रदेश, आणि मध्य व्हॅलीचा बराचसा भाग भूमध्यसागरीय हवामान आहे. येथे उन्हाळ्यात उबदार, कोरडे हवामान आणि हिवाळ्यात थंड हवामान असते. मात्र अलिकडे आलेल्या वादळांमुळे येथे चक्क बर्फाची आच्छादने बघायला मिळाली. त्यामुळे बदलत्या हवामानाचा मोठा फटका अमेरिकेला भविष्यात बसणार अशी शक्याता पर्यावरणतज्ञ व्यक्त करीत आहेत. यासाठी काळजी म्हणून समुद्रकिना-यावर वाढणारी मानवी वस्ती कमी करणे आणि झाडांची काळजी घेऊन उष्णतेचे प्रमाण समतोल ठेवण्याचा प्रयत्न करणे आदी उपाय पर्यावरण वाद्यांनी सुचवले आहेत.
सई बने