जगातील मोठे मोठे शोध हे चुकीने किंवा अपघातातून लागले आहेत. न्यूटनच्या डोक्यात सफरचंद पडून गुरुत्वाकर्षाणाचा शोध लागणं हे त्यातील एक मोठं उदाहरण आहे. असाच लागलेला एक शोध म्हणजे एक्सरे. आजच्या काळात संपूर्ण जगात एक्सरेचा वापर केला जातो. छोटासा जरी मुका मार लागला तरी एक्सरे काढण्याचा डॉक्टर सल्ला देतात. जगात प्रत्येक सेकंदाला साधारणत: १२५ X-ray काढले जातात, म्हणजेच वर्षभरात ४ बिलियनहून अधिक X-ray संपूर्ण जगभरात काढले जातात. यावरून आपण अंदाज लावू शकतो की X-ray किती महत्त्वाचा शोध आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, X-ray चा शोध चुकून लागला.. नेमका कसा ? जगातील काढलेला पहिला X-ray कोणता होता? हे सर्व जाणून घेऊ. (Wilhelm Rontgen)
१८९५ ची गोष्ट आहे, एक जर्मन मेकॅनिकल इंजिनियर आणि फिजिसिस्ट डॉ. विलहेल्म रोएंटजेन आपल्या प्रयोग शाळेत प्रयोग करत बसले होते. ते कॅथोड रेवर प्रयोग करत होते आणि त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास करत होते. यासाठी त्यांनी क्रुक्स ट्यूबचा वापर केला, जी एक व्हॅक्यूम – सील्ड काचेची ट्यूब असते, ज्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. ज्यामध्ये पॉजिटिव आणि नेगेटिव इलेक्ट्रोड जोडलेले असतात. जेव्हा त्यातून रोएंटजेन यांनी इलेक्ट्रिसिटी पास केली तेव्हा ट्यूबमधून फ्लोरेसेंट किरणं बाहेर येतं होती. ते किरणं अडवण्यासाठी म्हणजे रिफ्लेक्ट करण्यासाठी त्यांनी समोर एक कार्डबोर्ड ठेवला. पण ते किरणं रिफ्लेक्ट न होता कार्डबोर्ड पार करून त्यांचा प्रकाश इतर गोष्टींवर पडला. रोएंटजेन आश्चर्यचकित झाले, त्यांना समजलं नाही की त्या किरणांचा प्रकाश त्या कार्डबोर्डच्या आरपार कसा गेला. हे सगळं होतं असताना पूर्ण प्रयोगशाळेत अंधार होता. त्या निघणार्या किरणांचा कोणत्या प्रकार काय आहे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला ‘X-ray’ नाव दिलं.
विलहेल्म रोएंटजेन (Wilhelm Rontgen) यांनी ज्याचा शोध लावला होता, त्याचं महत्त्व त्यांना सुद्धा तेव्हा माहिती नव्हतं. रोएंटजेन यांनी कार्डबोर्डच्या ऐवजी आपला हात त्या किरणांच्या समोर ठेवला. तेव्हा त्यांनी पहिलं की ती किरणं त्यांची त्वचा पार करत आहेत, पण ते हाडांमधून पार होत नाही आहेत. ज्यामुळे त्यांच्या हाडांची सावली पडली. (Wilhelm Rontgen)
रोएंटजेन(Wilhelm Rontgen) यांनी अनेक दिवस प्रयोगशाळेत काम करत एक्सरेवर संशोधन सुरू ठेवलं. ते विविध धातू, वस्त्र आणि रबर यांचा वापर करून एक्सरेला पार करण्याचा प्रयत्न करत होते, २२ डिसेंबर १८९५ रोजी, रोएंटजेन यांनी स्वत:च्या पत्नीला प्रयोग शाळेत बोलावलं. त्यांचा हात क्रुक्स ट्यूबच्या समोर ठेवून एक्सरेचा प्रयोग केला. जेव्हा त्यांच्या पत्नीच्या हाडांची इमेज दिसली, तेव्हा रोएंटजेन यांनी फ्लोरोसेंट स्क्रीन आणि फोटोग्राफिक प्लेटचा वापर करून पहिली एक्सरे इमेज तयार केली आणि हाच जगातील पहिला काढलेला एक्सरे होता.
जानेवारी १८९६ मध्ये, रोएंटजेन यांनी आपल्या एक्सरेच्या प्रयोगांचे डॉक्युमेंट्स इतर वैज्ञानिकांना पाठवले. त्यानंतर, त्यांच्या शोधाचं महत्त्व संपूर्ण जगाला कळालं, वर्तमानपत्रं, मासिकं आणि जाहिरातींमध्ये रोएंटजेन आणि एक्सरेबद्दल लेख छापले जाऊ लागले. युरोप आणि अमेरिकेत एक्सरे मशीनच्या बूथ ठिकठिकाणी लावल्या गेल्या, आणि हे लोकांसाठी एक मनोरंजनाचं साधन बनलं. लोकं उत्सुकतेने आपला हात आणि शरीर एक्सरे मशीनमध्ये घालून पाहत होते. एक्सरे बूथच्या बाहेर लांब लांब रांगा लागायच्या. इतकं की, चपला विकणाऱ्यांनी देखील एक्सरे मशीन लावलं होतं. लोक आधी आपल्या पायाचा एक्सरे काढायचे मग चपला खरेदी करायचे. १९०१ मध्ये, रोएंटजेन (Wilhelm Rontgen) यांना त्यांच्या या अद्वितीय शोधासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले फिजिसिस्ट होते.
=============
हे देखील वाचा : Vanuatu : हा वानुआतु नावाचा देश नेमका आहे तरी कुठे..
=============
रोएंटजेन फक्त एक महान शास्त्रज्ञ नव्हे, तर एक अत्यंत दयाळू आणि उदार व्यक्तिमत्व होते. त्यांनी एक्सरे मशीनचं पेटंट घेण्यापासून नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं की, मेडिकल सायन्स आणि इतर क्षेत्रातील लोक फ्रीली या एक्सरेचा वापर करू शकतात. याशिवाय, नोबेल पुरस्काराची रक्कम देखील त्यांनी ते शिकवत असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये दान केली.
पुढे एक्सरेचा वापर हळूहळू कमी होऊ लागला. कारण त्याच्या वापरामुळे लोकांचे केस गळण्याची तक्रार येत होती. काही लोकांची त्वचा लाल पडत होती. तर काहींच शरीर आणि डोक यामुळे दुखत होतं. १९०३ साली क्लेरेन्स डेली यांचा स्किन कॅन्सरामुळे मृत्यू झाला. ते एक्सरे वर प्रयोग करत होते आणि त्याच्या अति exposure मुळे. त्यांना कॅन्सर झाला होता. यानंतर लोकांनी एक्सरेचा वापर मजा आणि मनोरंजन म्हणून करणं थांबवले. पुढे या टेक्नॉलॉजीला आणखी advance आणि safe केलं. १० फेब्रुवारी १९२३ रोजी डॉ. विलहेल्म रोएंटजेन (Wilhelm Rontgen) यांचा ७७ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांनी जगासाठी एक असा शोध लावला ज्याचा वापर त्यांच्या मृत्यूनंतर १०० वर्षांनीही सुरू आहे. आणि भविष्यात सुद्धा त्याचा वापर सुरू राहीलं.