Home » Mahashivaratri: महाशिवरात्री का साजरी केली जाते?

Mahashivaratri: महाशिवरात्री का साजरी केली जाते?

by Team Gajawaja
0 comment
Mahashivaratri: महाशिवरात्री
Share

दरवर्षी भारतभर महाशिवरात्री (Mahashivaratri) साजरी केली जाते. महाशिवरात्री म्हणजे शिव भक्तांसाठी एक मोठा उत्सव असतो. तसं बघायला गेलं तर, दर महिन्याला शिवरात्री येते. पण महाशिवरात्री (Mahashivaratri) मात्र वर्षातून एकदाच येते. यावर्षी म्हणजेच २०२२ मध्ये १ मार्चला महाशिवरात्री आहे. 

महाशिवरात्री म्हणजे शिव आराधना, दिवसभरीचा उपास या गोष्टी तर आपल्याला माहितीच आहेत, पण महाशिवरात्री (Mahashivaratri) का साजरी केली जाते, हे तुम्हाला माहिती आहे का?

धर्मग्रंथानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव शंकर या विश्वामध्ये प्रगट झाले होते. शिवाचे स्वरूप ज्योतिर्लिंगाच्या म्हणजेच अग्नीच्या शिवलिंगाच्या रूपात होते. एक असं शिवलिंग ज्याला ना आरंभ होता ना अंत. एका आख्यायिकेनुसार शिवलिंग शोधण्यासाठी ब्रह्मदेवांनी हंसाचे रूप घेतले होते. परंतु, खूप प्रयत्न करूनही शिवलिंगाच्या सर्वोच्च भागापर्यंत काही ते पोहचू शकले नाहीत. तर, भगवान विष्णूने वराहाचे रूप घेऊन शिवलिंगाच्या आकारमानाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण त्यांनाही अपयशच आले. 

शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी बारा ज्योतिर्लिंग पृथ्वीवर प्रकट झाले होते. यामुळेच महाशिवरात्रीला १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा उत्सव असेही म्हटले जाते. ही १२ ज्योतिर्लिंगे म्हणजे – सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, ज्योतिर्लिंगेश्वर, रामनाथ, वैद्यनाथेश्वर. 

महाशिवरात्री (Mahashivaratri) बाबत अनेक आख्यायिका आहेत. एका पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीने शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. अखेर तिची तपश्चर्या फळास आली आणि भगवान शंकरानी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केले. माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा विवाह फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला झाला. या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन झाले म्हणून फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. 

भारतामध्ये विविध ठिकाणी महाशिवरात्रीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. परंतु, संपूर्ण भारतातले शिवभक्त महाशिवरात्रीचा आवर्जून उपास करतात. परंतु, उपास करताना प्रकृतीची काळजी घेणं आवश्यक आहे. 

महाराष्ट्रात तर संपूर्ण दिवस महाशिवरात्रीचा उपास केला जातो. याच काळात उन्हाळ्याची सुरुवात झालेली असते. त्यामुळे बदलत्या वातावरणात पित्ताचा त्रास जाणवू शकतो. म्हणून उपासाचे पदार्थ खाताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. काही ठिकाणी शंकराच्या उपासाला भगर (वरई) चालत नाही. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे म्हणजे पित्ताला आमंत्रण. त्यामुळे उपासाला काय खावे याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला ‘टेस्टी आणि हेल्थी’ रेसिपी सांगणार आहोत. 

१. शिंगाड्याचे लापशी  

डाएटची काळजी असणाऱ्यांनी शिंगाड्याच्या पिठात ताक, जीरे किंवा जीरेपूड, किंचितसं आलं, थोडेसे दाण्याचे कूट (ऐच्छिक), मिरची, कोथिंबीर (चालत असल्यास) आणि मीठ मिक्स करून छान उकळी काढून त्याची लापशी करून पिऊ शकता. साधरणतः एका माणसाला १ ते २ चमचे पिठास १ वाटी ताक हे प्रमाण घेता येईल.  

डाएटची चिंता नसणाऱ्यांनी दूध, साखर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स मिक्स करून त्याची गोड लापशी करून खायला हरकत नाही. 

====

हे देखील वाचा: Pashupatinath Temple ‘या’ कारणामुळे पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन केल्याशिवाय केदारनाथाची यात्रा पूर्ण होत नाही

====

२. राजगिरा पिठाचे थालीपिठ 

राजगिरा पिठात आलं मिरची- जिरे पेस्ट, दाण्याचे कूट (ऐच्छिक), किसलेला बटाटा किंवा रताळं आणि मीठ घालून थालीपीठे करावीत आणि तुपावर खमंग भाजून घ्यावीत. यामध्ये आवडत असल्यास शिंगाडा पीठही वापरू शकता. 

राजगिरा पिठाचीही शिंगाड्याच्या पिठासारखी लापशी करता येईल. 

====

हे देखील वाचा: भीमाशंकर

====

३. रताळ्याची भाजी 

उपासाची बटाट्याची भाजी करण्याऐवजी रताळ्याची भाजी करून बघा. यासाठी रताळी उकडून घेऊन चौकोनी फोडी करून घ्या. तुपा-जिऱ्याची फोडणी करून त्यामध्ये मिरची रताळ्याची फोडी, दाण्याचं कूट ((ऐच्छिक), ओलं खोबरं आणि मीठ घालून खमंग परतून घ्या. 

उपासाच्या दिवशी भरपूर पाणी प्या. शक्यतो फलाहार करावा. संध्याकाळी लवकर फराळ करा किंवा शक्य असल्यास फक्त दूध प्या. उपासाच्या काळात शक्य असल्यास कमी बोलायचं प्रयत्न करा आणि भगवान शंकराचे नामस्मरण करा.  


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.