धरतीवर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला एक दिवस ही धरती सोडून जायचंच असतं. थोडक्यात काय तर, इथे जसा जन्म होतो तसाच एक दिवस आपला मृत्यू अटळ आहे. मनुष्य जीवन जगत असताना, अनेक चालीरीती, संस्कृती आणि वेगवेगळ्या धर्मात आपले जीवन व्यथित करत असतो. मृत्यूनंतरही हा धर्म माणसाची पाठ सोडत नाही. धर्माचं लेबल घेऊन जन्माला आलेला मनुष्य अखेर स्मशानापर्यंतही धर्माला सोबत घेऊन जातो.
मेल्यानंतरही धर्म पाठ सोडत नाही कारण मृत्यूनंतरही आजही अनेक लोकांना वेगवेगळ्या धर्मानुसार मूठमाती दिली जाते. म्हणजे हिंदू धर्मात अग्नी दिला जातो, तर मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात जमिनीत दफन केले जाते. मात्र असे असले तरी देखील आजही हिंदू धर्मात दुर्दैवाने एखादं लहान मूल मृत्यू पावल्यास त्याला अग्नी न देता त्याला दफन केले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिंदू धर्मात मोठ्यांना अग्नी आणि लहान मुलांना दफन का करतात? काळजी करू नका, याचं उत्तर तुम्हाला या लेखात मिळेल.
गरुड पुराणानुसार दोन वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीच्या शरीराला, अग्नी देऊन ते शरीर नष्ट करावे लागते व लहान मुलांना दफन करावे लागते. कारण लहान बालके या जगापासून तसेच जगातील चांगल्या वाईट भावनांपासून मुक्त असतात. मोहमायेत ती गुंतलेली नसतात. त्याला कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा लोभ नसतो. म्हणून जेव्हा लहान बालकांचा मृत्यू होतो तेव्हा आत्मा त्या शरीराचा ताबा तत्काळ सोडतो आणि पुन्हा त्या शरीरात प्रवेश करू इच्छित नाही. म्हणून, लहान मुलांचा मृत्यू झाल्यास ते मृत शरीर दफन केले जाते.
याउलट जसजसे मानवाचे वय वाढत जाते. तस-तसे मनुष्य या जगातील मोहमायेत गुरफटत जातो. या मोहमायेत तो फसत जातो आणि त्यामुळे त्याच्या आत्म्याला त्या शरीराचा मोह होतो. त्याच्या शरीराविषयी आसक्ती निर्माण होते आणि मृत्यूनंतर आत्मा वारंवार शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत राहतो. जोपर्यंत त्या शरीराला अग्नी देऊन ते शरीर नष्ट केले जात नाही. तोपर्यंत आत्मा शरीरात प्रवेश करण्याचे मार्ग शोधत राहतो. म्हणून हिंदू धर्मात मृत शरीरास लवकरात लवकर अग्नी देऊन ते शरीर नष्ट केले जाते. म्हणजे तो आत्मा त्या शरीरापासून अलिप्त होऊन पुढच्या प्रवासास निघून जातो.
हे ही वाचा: तुम्हालाही पोटाची चरबी कमी करायची असेल तर वापरा ‘या’ सोप्प्या टिप्स; चार नंबरची टीप तर आहे खूपच सोपी
‘या’ माणसाने फक्त व्यवसायासाठी ‘हिंदू’ धर्म बदलून इस्लाम स्वीकारला आणि पाकिस्तानात गेला
आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून, हिंदू धर्मात लहान मुलांना दफन का करतात, या प्रश्नाचे उत्तर पाहूया. वैज्ञानिकदृष्ट्या पहायला गेले तर, जसजसे माणसाचे वय वाढते तसतसे आपले शरीर हे जड बनू लागते. आणि अशा शरीराचे एखाद्या मातीत लवकर विघटन सुद्धा होत नाही. परंतु एखाद्या लहान बालकाचे शरीर हे कोवळे असते आणि ते मातीत लवकर विघटित होते. परंतु, मोठे शरीर लवकर नष्ट होत नाही. ते सडते कुजते जीव-जंतूचे घर बनते आणि त्यामुळे अनेक आजार पसरू शकतात. म्हणून हिंदू धर्मात लहान मुलांना दफन करतात व त्यांच्यावर अग्नी वा इतर मृत्यूपश्चात केले जाणारे संस्कार केले जात नाहीत.
(टीप:- सदर लेखात दिलेली माहिती ही धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास दुजोरा देण्याचा आमचा उद्देश नाही.)
-निवास उद्धव गायकवाड